INDvsENG : वादामुळे खेळपट्टीवर जास्त पाणी मारले तसेच ती जास्त रोल केली, पण..

 सुनंदन लेले  : सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 March 2021

चेन्नईतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 578 धावा केल्यापासून इंग्लंडने एकही अर्धशतकी भागीदारी केलेली नाही. लोकल हिरो अक्षर पटेलने 4 तर अश्‍विन 3 आणि सिराजने दोघांना बाद केले.

अहमदाबाद :  भारतीय फिरकी गोलंदाजांनी निर्माण केलेल्या दडपणातून बाहेर पडणे इंग्लंड फलंदाजांना जमले नाही. गोलंदाजीस पूर्ण साथ न देणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंड फलंदाजांना चुका करण्यास अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्‍विन या भारताच्या हुकमी फिरकी गोलंदाजांनी भाग पाडले. त्यामुळे चांगल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा फायदा इंग्लंडला घेता आला नाही. 
एका आठवड्यापूर्वी अहमदाबाद कसोटीत दोन डावात मिळून केलेल्या धावांपेक्षा जास्त धावा इंग्लंडने पहिल्या डावात केल्या, पण प्रत्येक वेळी जमणारी भागीदारी फोडण्यात भारतीयांना यश आले. बेन स्टोक्‍सनेच अर्धशतक केले, इंग्लंड डावातील सर्वोत्तम भागीदारी 48 धावांची होती,

चेन्नईतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 578 धावा केल्यापासून इंग्लंडने एकही अर्धशतकी भागीदारी केलेली नाही. लोकल हिरो अक्षर पटेलने 4 तर अश्‍विन 3 आणि सिराजने दोघांना बाद केले. पहिल्या दिवसअखेर एकच विकेट गमावल्याने भारताचे वर्चस्व कायम राहिले.  ज्यो रूटने अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. तिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्याने संयोजकांनी खेळपट्टीवर जास्त पाणी मारले तसेच ती जास्त रोल केली होती. तिसऱ्या कसोटीच्या तुलनेत खेळपट्टी चांगली होती. तरीही इंग्लंड फलंदाजांनी चुका केल्या. अक्षर पटेलचा आत येणारा चेंडू खेळताना डॉम सिबली चुकला. झॅक क्रॉलीने हवेतून फटका मारायचा प्रयत्न केला. 

Road Safety World Series T20 : दिग्गजांचा कसून सराव, पाहा खास फोटो

अक्षरला मारा करायला आल्यावर लगेच दोनदा यश आले. उपाहारापूर्वी सिराजच्या वेगाने आत आलेल्या चेंडूवर ज्यो रूट चकला. चांगल्या खेळपट्टीवर इंग्लंडने स्वःला अडचणीत आणले होते. बेन स्टोक्‍सने खेळपट्टीबद्दलची धास्ती दूर करताना बचाव आणि आक्रमणाचा मिलाफ साधला. त्याने कधी हवेतून तर कधी रिव्हर्स स्वीप मारत गोलंदाजांना बुचकळ्यात टाकले. त्याला जॉनी बेअरस्टोची साथ लाभत होती. पण सिराजच्या इनकटरने बेअरस्टो पायचित झाला, मग  स्टोक्‍सला सुंदरने चकवले. चेंडूला फिरक देणाऱ्या सुंदरच्या राँग-वनवर स्टोक्‍स चकला. 
पोप-लॉरेन्सने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. 

मात्र ठराविक अंतराने भारतीय विकेट घेत होते. त्यामुळे इंग्लंड मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. अक्षर पटेल-अश्‍विन जोडीने पुन्हा करामत करीत इंग्लंडचा डाव 205 धावांवर संपवला. शुभमन गिल पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला, पण त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्‍वर पुजाराने इंग्लंडला यशापासून रोखले. दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज प्रदीर्घ फलंदाजी करून पहिल्या डावात मोठी आघाडीकडे वाटचाल करतील.

स्टोक्‍सची सिराजला शिवीगाळ?

बेन स्टोक्‍सने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मोहम्मद सिराजने केला. स्टोक्‍सने हे केल्यानंतर मी विराट भाईला सर्व काही सांगितले. त्यानंतर त्याने स्टोक्‍ससह चर्चा केली. स्टोक्‍स जे काही शेवटचे बोलला ते मी ऐकले नाही, असे सिराजने सांगितले. सिराजने रुटला बाद केल्यानंतरच्या लगेच आलेल्या स्टोक्‍सला उसळता चेंडू टाकला. त्यानंतर स्टोक्‍स सिराजला उद्देशून अपशब्द बोलला. सिराजने कोहलीस हे सांगितले. कोहली आणि स्टोक्‍समध्ये बाचाबाची झाली. पंचांनी त्यांना दूर केल्याचे यावेळी दिसले. कोहलीने त्यानंतर रिषभ पंतला जास्त बडबड करीत राहण्याची सूचना केली.

खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल आहे. येथे खेळताना संयम महत्त्वाचा असेल, तसेच एखादा चेंडू वेगाने आत येऊ शकतो. दोनच वेगवान गोलंदाज अंतिम संघात असल्याने त्यांना रोटेट करावे लागेल, असे विराटने सामन्यापूर्वीच सांगितले होते. इशांतने ज्या बाजूने मारा केला, त्या बाजूने मारा करताना माझे चेंडू चांगले मूव्ह झाले. 
- मोहम्मद सिराज


​ ​

संबंधित बातम्या