INDvsENG : ..अन् जगातील सर्वात मोठ्या मैदानात रात्री 'सूर्य' चमकला!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 March 2021

त्याने आपल्या खेळीतील फटकेबाजीचा धमाका दाखवत 28 चेंडूत आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले-वहिले अर्धशतक पूर्ण केले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवला संघात स्थान मिळाले. पण आपल्यातील कसब दाखवण्यासाठी त्याचा बॅटिंगला नंबरच आला नाही. भारतीय संघाने हा सामना जिंकला असला तरी सूर्याची बॅटिंग पाहण्याची अनेकांची प्रतिक्षा पुन्हा लांबणीवर पडली. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा संघात आला आणि त्याच्यावर थेट बाहेर बसण्याची वेळ आली. बॅटिंगचा नंबर न येता त्याला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अखेर चौथ्या आणि निर्णायक सामन्यात दुखापतग्रस्त ईशान किशनच्या जाग्यावर त्याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. 

विशेष म्हणजे रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आली. त्याने षटकाराने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. जोफ्रा आर्चरला त्याने लगावलेला षटकार सूर्याच्यातील क्षमता दाखवणारा ट्रिजरच होता. यापुढे त्याने आपल्या खेळीतील फटकेबाजीचा धमाका दाखवत 28 चेंडूत आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले-वहिले अर्धशतक पूर्ण केले. यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार खेचले.  

विराट भावा, तुझं नेमकं चाललंय तरी काय?

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात षटकाराने खाते उघडणाऱ्या मोजक्या फलंदाजामध्ये सुर्यकुमार यादवच्या नावाचा समावेश झाला आहे. पाकिस्तानचा सोहेल तन्वीर, वेस्ट इंडिजच्या संघातून खेळणाऱ्या जेरोम टेलर, मार्शल, केरन पॉलार्ड, टिनो बेस्ट, दक्षिण आफ्रिकेचा मंगालिसो मोशेले आणि मार्क अदर यांच्यानंतर आता सूर्याचा नंबर लागतो. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताकडून षटकाराने सुरुवात करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. या यादीत वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक चार जणांचा सहभाग आहे.  


​ ​

संबंधित बातम्या