INDvsENG : ईशानच्या दुखापतीनंतर सूर्याचं 'ग्रहण' सुटलं

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 March 2021

ईशान  किशन दुखापतग्रस्त असल्याचे कोहलीने नाणेफेकीदरम्यान सांगितले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ विनिंग कॉम्बिनेशनसह मैदानात उतरला आहे. दुसरीकडे विराट कोहलीने संघात दोन बदल केले आहेत. ईशान किशनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली पण बॅटिंगची वेळच त्याच्यावर आली नव्हती. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा संघात आल्यानंतर सुर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. सामन्यात तो कसा कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ईशान  किशन दुखापतग्रस्त असल्याचे कोहलीने नाणेफेकीदरम्यान सांगितले.

टीम इंडियात दुसरा बदल करण्यात आलाय तो म्हणजे गोलंदाजीमध्ये. फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या ऐवजी राहुल चाहरला संधी मिळाली आहे. ईशान किशनने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली होती. दुसरीकडे सुर्यकुमार यादवने देखील दुसऱ्या टी -20 सामन्यातून ईशान किशनसोबतच पदार्पण केले. मात्र  या सामन्यात त्याच्यावर बॅटिंगचा नंबरच आला नव्हता. तरी देखील तिसऱ्या सामन्यात त्याला बाहेर बसवण्यात आले. या निर्णयावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.   

विराट भावा, तुझं नेमकं चाललंय तरी काय?

युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीने सुर्यकुमारने सर्वाचे लक्ष वेधले होते. आयपीएल स्पर्धेपासून त्याला संघात घेण्याची मागणी जोर धरु लागली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्याला खेळवण्याची इच्छा व्यक्त करत असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला स्थान मिळाले नाही. इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात अखेर त्याला स्थान मिळाले. बॅटिंगला उतरल्यानंतर तो आपल्या भात्यातील झलक दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

India (Playing XI): रोहित शर्मा,  केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव,  रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर,  शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, राहुल चाहर 

England (Playing XI): जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेविड मलान, जॉनी बेयरस्ट्रो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम कुरेन, क्रिस जार्डन, जोफ्रा आर्चर, अदिल राशिद, मार्क वूड.  


​ ​

संबंधित बातम्या