INDvsENG : भारतासाठी गोलंदाजीत बदल अनिवार्य

सुनंदन लेले; सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 March 2021

फिरकीचे अपयश चिंताजनक; सुरूवातीच्या फलंदाजांकडूनही आक्रमकतेची गरज
 

पुणे : तब्बल 336 धावा करूनही भारतीय गोलंदाज त्याचे संरक्षण करू शकले तर नाहीच, पण इंग्लंडने हे आव्हान 43.3 षटकांत पूर्ण करून भारतीयांच्या उणिवा स्पष्ट केल्या. परिणामी उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला गोलंदाजीत बदल करणे अपिहार्य ठरणार आहे, त्याचबरोबर सहाव्या गोलंदाजाचाही विचार करावा लागणार आहे. कसोटी आणि ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेकडे वेगळ्या विचाराने पहात आहे. एरवी पाच प्रमुख आणि एक अष्टपैलू अशी गोलंदाजीची रचना असते, परंतु यावेळी हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे पाचच गोलंदाज हाती असतात, त्यात एकाची धुलाई झाली की अडचणीत वाढ होते. 

कृणाल, कुलदीप महागडे

कृणाल पंड्याने आपल्या फलंदाजीची क्षमता सिद्ध केली; परंतु गोलंदाजीत तो फारच दुबळा ठरला आहे. त्याचबरोबर कुलदीपचेही अपयश ठळकपणे पुढे आले. कालच्या सामन्यात कृणालने 6 षटकांत 72, तर कुलदीपने 10 षटकांत 84 धावा दिल्या. इंग्लंड फलंदाजांनी या दोघांवर हल्ला चढवला होता. त्यामुळे उद्या कुलदीपऐवजी युझवेंद्र चहल असा बदल निश्‍चित आहे. कृणालऐवजी टी. नटराजन असा बदल अपेक्षित आहे.

INDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ

कालच्या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी फलंदाजीला खूप पोषक होती, पण तरीही आम्ही गोलंदाजी करताना माऱ्यात थोडी सुधारणा करू शकलो असतो. समोरच्या फलंदाजांनी चढवलेल्या अभूतपूर्व हल्ल्यातून सावरणे कठीण गेले हे मान्य करावे लागेल, भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने कबुली देताना सांगितले. संजय मांजरेकरने मुद्दा मांडला की पहिल्या सामन्यात भारतीय संघाला यशाचा मार्ग शोधता आला, कारण शार्दूल ठाकूरने योग्य मारा करून तीन फलंदाजांना बाद केले. दुसऱ्या सामन्यात शार्दूलला मार पडला, ज्या धक्‍क्‍याने भारतीय संघ कोलमडला. 

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर भगव्या लायनिंगची शायनिंग (VIDEO)

इंग्लंड फिरकी प्रभावी

फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी धावगतीचा वेग वाढवायला जास्त वेळ घेतल्याची चूक काही क्रिकेट जाणकारांनी बोलून दाखवली. विशेष करून इंग्लंडचे फिरकी गोलंदाज मोईन अली आणि आदील रशीद यांना काहीसे सांभाळून खेळताना भारतीय फलंदाजांनी फक्त तीन चौकार आणि तीन षटकार मारले. इंग्लंडच्या फिरकीवर जास्त अगोदर हल्ला चढवणे शक्‍य होते, हा मुद्दा चर्चेला आला. सुरुवातीला दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने विराट कोहली आणि के एल राहुलने काहीसा बचावात्मक पवित्रा घेतला होता.
सव्वा तीनशेच्या पुढची धावसंख्या कागदावर मोठी दिसत असली तरी त्याचे कोणतेही दडपण समोरच्या फलंदाजांना पाठलाग करताना येत नाही, असेच दुसऱ्या सामन्यातील विजयाने दिसून आले आहे. मालिका 1-1 बरोबरीत असल्याने तिसऱ्या सामन्याचे महत्त्व वाढले आहे. निरर्थक वाटणाऱ्या एक दिवसीय मालिकेत अचानक सकारात्मक क्रिकेट ‘खुन्नस’ ची किनार आली आहे. 

वाढत्या उन्हात कस लागणार

काहिली करणाऱ्या उकाड्याने महाराष्ट्र भाजून काढत आहे. त्यात उद्या होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या सत्रात गोलंदाजी करणे आव्हानात्मक ठरणार आहे. गहुंजे हे स्टेडियम मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसजवळ असल्याने उन्हाचा त्रास अधिकच जाणवत असतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या 38-39 अंश सेल्सियस तापमान असण्याची शक्‍यता आहे. सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होत असल्याने उन्हाचे चटके घेऊनच खेळाडूंना मैदानात उतरावे लागणार आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या