INDvsENG : टीम इंडियाच्या पराभवामागची पाच कारणे

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 16 March 2021

 नजर टाकूयात अशा चुकांवर ज्या टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. 

पहिल्या पराभवानंतर दिमाखदार कमबॅक करणारा भारतीय संघ टी-20 मालिकेत पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला आहे. टॉप ऑर्डर कोलमडल्यानंतर कर्णधाराला साजेसा खेळ करत विराट कोहलीने डाव सावरला पण इंग्लिश फलंदांना रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. परिणामी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ज्यावेळी संघ जिंकतो तेव्हा खेळाडूंच कौतुक होत असते आणि ज्यावेळी संघ पराभवाचा सामना करतो त्यावेळी टीमच्या चुकांची जाणीव होते. नजर टाकूयात अशाच चुकांवर ज्या टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या.  

टॉप ऑर्डरचा फ्लॉप शो!

हिटमॅन रोहित शर्मा विश्रांतीनंतर परतला पण नावाला साजेसा खेळ करण्यात तो अपयशी ठरला. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुलच्या अपयशातील सातत्य पुन्हा पाहायला मिळाले. मागील सामन्यात खाते न उघडू शकलेला लोकेश राहुलने या सामन्यात नॉन स्ट्राईकवर खेळणं पसंत केले. मात्र तरीही त्याच्यावरील शुन्यावर बाद होण्याची नामुष्की टळली नाही. सलामीवीरांच्या अपयशानंतर युवा ईशान किशनलाही उपयुक्त योगदान देता आले नाही. पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा ईशान किशन मोजक्या धावा करुन परतला आणि टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. 

INDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा!​

पंतची विकेट महागात पडली 

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. विकेट न गमवता धावफलक हलता ठेवण्याचे तंत्र त्याने आजमवले. पंतच्या साथीने त्याने डावाला आकारही दिला. कोहली-पंत जोडी फोडण्यात इंग्लंडचे गोलंदाज अयपशी ठरल्याचे दिसले. चोरटी धाव घेण्याच्या नादात टीम इंडियाने पंतची विकेट फेकली. बाराव्या षटकात भारतीय संघाने ही विकेट गमावली नसती तर धावफलकावर आणखी धावा दिसल्या असत्या आणि कदाचित रिझल्टही वेगळा लागला असता.  

फिल्डिंगमध्ये आक्रमकता दिसली नाही

इंग्लंडसारखी तगडी बॅटिंग लाईनअप असलेल्या संघाला रोखण्यासाठी फिल्डिंगने दबाव टाकण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. चहल, शार्दुल ठाकूरसह विराटनेही एक कॅच सोडला. याव्यतिरिक्त धावा रोखताना फिल्डिंगमध्ये जिंकण्यासाठी खेळत आहोत, असे तेवर दिसले नाहीत. तोकड्या टार्गेटला फिल्डिंगमुळे आणखी तोकडे केले.

INDvsENG : रोहित IN पण; KL राहुलसाठी सूर्या झाला बळीचा बकरा!​

बटलरला रोखण्याची रणनितीचं दिसली नाही 
भारतीय संघाला चहलने पहिले यश मिळवून दिले. जेसन रॉयने चुकीचा फटका खेळल्यामुळे तो बाद झाला. त्याच्याप्रमाणेच बटलरही विकेट फेकेल, असाच काहीसा अभिर्भावात टीम इंडिया दिसली. बटलरला आउट करण्यासाठी काही रणनिती दिसली नाही. त्याचे आक्रमक रोखण्यासाठी फिल्डिंग प्लेसमेंट आणि गोलंदाजीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न झाला नाही. तेच टीम इंडियासाठी धोक्याचं ठरले. 
 

आणखी एका प्रमुख गोलंदाजाची उणीव भासली 

भारतीय संघात फलंदाजीसह गोलंदाजीतही बदलाचे वारे वाहत आहेत. याच अनुषंगाने काही नवे प्रयोग गोलंदाजी विभागात पाहायला मिळाले. भारतीय संघ दोन जलदगती गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरला. पाचवा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याने जबाबदारी पार पाडली. कंमरेच्या दुखापतीपासून हार्दिक पांड्या पुर्वीप्रमाणे गोलंदाजी करत नाही. त्यामुळे त्याच्याकडून सक्षम गोलंदाजीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. महत्त्वाच्या सामन्यात असे प्रयोग संघाला अडचणीत आणू शकतात याचा विचार संघ व्यवस्थापनाने केलेला दिसत नाही. परिणाम भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पाच गोलंदाजांसह खेळलो असतो तर कदाचित बटलरला रोखण्यासाठी काही रणनिती आखणे सोपे झाले असते.  

 


​ ​

संबंधित बातम्या