INDvsENG : इंग्लंडला रोखण्यासाठी यॉर्कर स्पेशलिस्टला पसंती

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 28 March 2021

दुसऱ्या वनडेत कुलदीप यादव चांगलाच महागडा ठरला होता. त्याच्या जागी निर्णायक सामन्यात टी नटराजनला संधी मिळाली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक सामन्यात विराट कोहलीने संघात एकमात्र बदल केला. दुसऱ्या वनडेत धुलाई झालेल्या कुलदीप यादवला बाकावर बसवत त्याच्या जागी टी-नटराजनला संधी देण्यात आली. टी-नटराजनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यानंतर तो ट्रेंडिगमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. दोन वनडेतील एका डावात त्याने 10 षटकांचा कोटा पूर्ण केला आहे. यात त्याने 70 धावा खर्च करुन दोन विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडच्या फलंदाजांना रोखून टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्याला बजावावी लागणार आहे.  

दुसऱ्या वनडे सामन्यात कुलदीप यादव चांगलाच महागडा ठरला होता. आपल्या 10 षटकात त्याने 8.40 च्या सरासरीने 84 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे त्याचा पत्ता कट होणार याची चर्चा रंगली होती. निर्णायक सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर विराट कोहलीने टी-नटराजनला संधी देण्याचे स्पष्ट केले. त्याच्यासोबत भारतीय गोलंदाजीची मदार ही भुवनेश्वर कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर असेल. कृणाल पांड्या पाचव्या गोलंदाजाची भूमिका कशी साकारणार हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरेल. 

IPL 2021 : रात्रीच्या जमावबंदीचा मुंबईतील आयपीएलवर परिणाम होणार?

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने हार्दिक पांड्याचा वापर केला नव्हता. त्याच्या या निर्णयावरुन प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. या सामन्यात कोहली हार्दिक पांड्याचा वापर करणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. ज्यो रुटच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका गमावलेल्या इंग्लंडने इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेतही पराभवाचा सामना करावा लागला होता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली पहिला वनडे सामना गमावल्यानंतर दुखापतीमुळे मॉर्गनने माघार घेतली. कार्यवाहू कर्णधार जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लिश ताफ्याने दुसरा वनडे सामना जिंकून मालिका बरोबरीत आणली असून विश्वविजेत्या संघ मालिका जिंकून शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल.


​ ​

संबंधित बातम्या