INDvsENG : उत्तम अभ्यासाचा फायदा : रोहित शर्मा

सुनंदन लेले
Saturday, 13 February 2021

फिरकीला खेळताना त्यांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यापेक्षा आपणच ‘कृती’ करावी, असे ठरवले होते.

दुसऱ्या कसोटी सामन्याकरिता खेळपट्टी कशी असणार, याचा अंदाज आल्याने आम्ही सराव तसाच केला होता. या उत्तम अभ्यासाचा फायदा झाला. जम बसल्यावर संघाकरिता मोठी खेळी करू शकलो, हे महत्त्वाचे. त्यातून सामना बघायला आपल्या संघाचे चाहते बऱ्याच काळानंतर मैदानात हजर होते, याचे समाधान वाटते, असे  दीड शतक करून पहिला दिवस गाजवणारा रोहित शर्मा म्हणाला.

सामन्याच्या दोन दिवस अगोदरच आम्हाला चेपॉकची खेळपट्टी कशी असेल, हे बघून समजू लागले होते; मग आम्ही फलंदाजांनी सरावादरम्यान तशी तयारी चालू केली. फिरकीला खेळताना त्यांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यापेक्षा आपणच ‘कृती’ करावी, असे ठरवले होते. त्याकरिता पायाचा वापर करणे आणि स्वीपचा फटका अस्त्र म्हणून करणे ठरवले होते. आखलेली योजना राबवता आली, याचा आनंद मोठा आहे, असे रोहित म्हणाला. 

INDvsENG : रोहित-रहाणे याचा ‘आर’ फॅक्‍टर

अजिंक्‍य रहाणेच्या खेळीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, अजिंक्‍यच्या खेळाबद्दल उगाच चर्चा का होते समजत नाही. कारण मला एकच माहीत आहे, की संघ अडचणीत असताना आणि संघाला गरज असताना तो हमखास विकेटवर उभा राहतो. त्याने आज मस्त फलंदाजी केली. आम्ही भागीदारी करताना सतत एकमेकांशी संवाद साधत होतो. वेगवान गोलंदाजाला काहीसे क्रिज सोडून पुढे उभा राहा, असा सल्ला त्याने मला दिला, ज्याचा मला फायदा झाला; तर मी त्याला फिरकीला खेळताना स्वीपचा वापर कर असा सल्ला दिला.

INDvsENG : आखाड्यातील ‘ट्रेलर’चा रोहित हिरो

आम्ही स्ट्राईक सतत बदलत ठेवल्याने गोलंदाज स्थिरावू शकले नाहीत. मला वाटते या प्रकारच्या खेळपट्टीवर नंतरच्या काळात चेंडू खूप फिरणार आहे, त्याचा विचार करता पहिल्या डावात ३५० चा टप्पा गाठला तर चांगले होईल. तिसऱ्या आणि चौथ्या डावात फलंदाजांची तारांबळ उडणार आहे हे नक्की, असे 
रोहित शर्माने भाकीत केले.
 


​ ​

संबंधित बातम्या