INDvsENG : शतकी दुष्काळ कायम; पण कोहलीची 'विराट' विक्रमाला गवसणी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 26 March 2021

विराट कोहलीने 94 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करताना 5442  धावा केल्या आहेत. ग्रॅहम स्मिथने 150 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना  5416 धावा केल्या होत्या. 

India vs England, 2nd ODI: इंग्लंड विरुद्धच्या पुण्यातील दुसऱ्या वनडेत सलामीच्या जोडीने हताश केल्यानंतर किंग कोहलीने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेसा खेळ केला. अर्धशतकी खेळीवर अडखळलेल्या विराट कोहलीने या सामन्यातही एक खास विक्रम आपल्या नावे केला. वनडे क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक धावा करण्याचा ग्रॅहम स्मिथचा विक्रम  विराट कोहलीच्या नावे झाला आहे.  विराट कोहलीने 94 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करताना 5442  धावा केल्या आहेत. ग्रॅहम स्मिथने 150 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना  5416 धावा केल्या होत्या. 

संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग याच्या नावे आहे. त्याने 234 सामन्यात  8497 धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.  दुसऱ्या वनडे सामन्यात शिखर धवन (4) आणि रोहित शर्मा (25) धावा करुन बाद झाल्यानंतर विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने 121 धावांची भागीदारी केली. यात त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 चेंडूत 66 धावांची खेळी केली. कोहली या सामन्यात शतकाचा दुष्काळ संपवेल, असे वाटत होते मात्र अदिल रशिदच्या गोलंदाजीवर विकेटमागे बटलरने त्याचा झेल टिपला आणि त्याच्या खेळीला ब्रेक लागला. 

तो कृष्णा नाही तर 'करिश्मा'; अख्तरने थोपटली प्रसिद्धची पाठ

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने दुसऱ्या टी-20 सामन्यात नाबाद 73, तिसऱ्या टी-20 सामन्यात नाबाद 77 आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाबाद 80 धावा करुन वनडेत शतकी खेळीचे संकेत दिले होते. पहिल्या वनडेत त्याने 60 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी. आणि दुसऱ्या वनडेतही त्याला अर्धशतकावरच माघारी फिरावे लागले. त्याच्या चाहत्यांना 'विराट' शतकासाठी पुढच्या वनडे सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या