INDvsENG : श्रेयसऐवजी सूर्यकुमार?, मॉर्गनही मुकणार

 सुनंदन लेले  : सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 March 2021

दुसऱ्या सामन्यासह आज मालिका जिंकण्याची भारताला संधी
 

पुणे : येत्या रविवारी होळीचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्याच दिवशी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा सामना होणार आहे, परंतु त्याअगोदर म्हणजेच उद्या होणारा दुसरा सामना जिंकून मालिका विजेतेपदाची आरोळी ठोकण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. भारतीयांनी पहिल्या सामन्यात केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ टीम इंडियाला रोखण्याचा मार्ग शोधत आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतीयांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाला भारतीय संघाने दमदार उत्तर दिले म्हणूनच शेवटच्या दोन टी-20 सामन्यांत आणि पहिल्या एकदिवसीय सामना मिळून एकूण गेल्या तीन सामन्यांत भारतीय संघाला घवघवीत यश मिळाले आहे. आता भारतीयांना कसे रोखायचे याची चिंता इंग्लंड संघाला लागली आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघ 5 बाद 205 धावांवर अडखळला होता. के. एल. राहुल आणि कृणाल पंड्याच्या शतकी भागीदारीने भारतीय संघ अडचणीतून बाहेर आला. पाठलाग चालू झाल्यावर जॉन बेअरस्टो-जेसन रॉयने केलेला हल्ला प्रेक्षणीय होता. इंग्लंड संघ अपेक्षित धावांचा पाठलाग दिमाखात करणार असे वाटत असताना गोलंदाजांनी परत उचल खाल्ली आणि इंग्लंड फलंदाजीची मधली फळी कापून काढली. भारताच्या हाती 66 धावांचा मोठा विजय लागल्यावर लक्षात आले, की दरवेळी भारतीय संघाच्या तंबूतून वेगळेच हिरो उभे राहतात जे संघाला यशाचा मार्ग दाखवतात.

प्रतिकूल परिस्थितीत शांत राहणे फायदेशीर - राहुल

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने तयार केलेली खेळपट्टी स्पोर्टिंग होती. केवळ फलंदाज खेळपट्टीवर राज्य करताना दिसले नाहीत, तर वेगवान गोलंदाजांनाही खेळपट्टीने योग्य साथ दिली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याकरता तयार केली गेलेली खेळपट्टी पहिल्या सामन्यापेक्षा वेगळी नसणार असे समजले आहे. कसोटी मालिकेपासून इंग्लंड फलंदाजीच्या मधल्या फळीला सुमार कामगिरीचा लागलेला आजार अजून बरा झालेला नाही.

श्रेयसऐवजी सूर्यकुमार?, मॉर्गनही मुकणार

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्याची जागा सूर्यकुमार यादवला दिली जाऊ शकते. गोलंदाजीत योग्य गोलंदाजी करू न शकलेल्या कुलदीप यादवला विराट कोहली अजून किमान एका सामन्याची संधी देईल असे वाटते. इंग्लंड संघाच्या सॅम बिलिंग्ज्‌ आणि कप्तान मॉर्गनला पहिल्या सामन्यात दुखापत झाली. दोघांनीही पहिल्या सामन्यात दुखापतीनंतर फलंदाजी केली तरीही मॉर्गन पुढील दोन्ही सामन्यास तर बिलिंग्ज दुसऱ्या सामन्यास मुकणार आहे. मॉर्गनऐवजी जॉस बटलर इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे.
-


​ ​

संबंधित बातम्या