IND vs ENG: पुण्याच्या मैदानात कोरोना नियमाचं उल्लंघन, स्टोक्सला मिळाली वॉर्निंग

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 26 March 2021

 कोरोनाच्या नियमाचा बेन स्टोक्सला विसर पडल्याचे दुसऱ्या वनडेत पाहायला मिळाले. 

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन केले आहे. मैदानातील अंपायर्संनी त्याला वॉर्निंग दिली असून यापुढे असे न करण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही नियम केले आहेत. यात चेंडूला चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमाचा बेन स्टोक्सला विसर पडल्याचे दुसऱ्या वनडेत पाहायला मिळाले. 

भारताच्या डावातील चौथ्या षटकात हा प्रकार घडला. स्टोक्स चेंडूला थुंकी लावताना पाहायला मिळाले. त्यानंतर अंपायर नितीन मेनन आणि विरेंद्र शर्मा यांनी त्याला चेतावणी दिली. बेन स्टोक्सने याच षटकात रिसे टॉप्लीच्या गोलंदाजीवर शिखर धवनचा झेल टिपला होता. स्टोक्सला दुसऱ्यांदा यासंदर्भात वॉर्निंग मिळाली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या पिंक चेंडुवरील कसोटी सामन्यातही बेन स्टोक्सकडून ही चूक घडली होती.  

तो कृष्णा नाही तर 'करिश्मा'; अख्तरने थोपटली प्रसिद्धची पाठ

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची मालिका पुण्यातील मैदानात खेळवण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याच्या अटीवर सामन्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सर्व सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येत आहेत. 23 मार्च रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे.


​ ​

संबंधित बातम्या