INDvsENG 1st Test Day 3 : बेसच्या फिरकीची जादू; भारत 6 बाद 257 धावा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

मोठी धावसंख्या उभारुन घरच्या मैदानात टीम इंडियाला कोंडित पकडण्याचा प्लॅन पाहुण्या इंग्लडकडून सुरु आहे.

India vs England  1st Test Day 3 : आघाडी कोलमडल्यानंतर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  रोहित शर्मा (6), शुभमन गिल (29), विराट कोहली (11), अजिंक्य रहाणे (1) धावा करुन माघारी फिरल्यानंतर पंत-पुजारा जोडीने आपला शो दाखवला. डॉम बेसने या दोघांना माघारी धाडत इंग्लंडला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 6 बाद 257 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर 33 (68) तर रविंचंद्रन अश्विन 8 (54) धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून डॉम बेसने सर्वाधिक चार गडी टिपले. तर जोफ्राने दोन्ही सलामवीरांना माघारी धाडले. 

इंग्लंडचा पहिला डाव आटोपल्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाला सुरुवात केली. जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला एका अप्रतिम चेंडूवर बाद केले. रोहित अवघ्या 6 धावा करुन माघारी फिरला. लयीत दिसणाऱ्या शुभमन गिलच्या रुपात जोफ्राने टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. त्याने 28 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 29 धावांची खेळी केली.  कर्णधार विराट कोहली आणि पुजारा डाव पुढे सरकवत असताना कोहली डॉम बेसच्या फिरकीत अडकला. कोहलीने 48 चेंडूत 11 धावा केल्या. कर्णधाराची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला अजिंक्य रहाणेही माघारी फिरला. ज्यो रुटने त्याचा उत्तम झेल टिपला. 

INDvsENG: अजिंक्यला फेल ठरवणारा रुटचा अप्रतिम झेल पाहिलात का?

आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर पंत-पुजाराने संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. डॉम बेसनं ही जोडी फोडली. पुजारा 143 चेंडूत 73 धावा करुन परतला. पुजारा बाद झाल्यानंतर शतकाकडे वाटचाल करत असलेल्या पंतच्या पदरी पुन्हा निराशा आली. शतकाच्या उंबरठ्यावर 91 धावांवर त्याला डॉम बेसने लीचकरवी झेलबाद केले. 

INDvsENG : पंत-पुजाराची शतकी भागीदारी थोडासा दिलासा देणारी

तत्पूर्वी इंग्लंडच्या संघाने 8 बाद 555 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. इंग्लंडच शेपूट पुन्हा भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान करतानाचे चित्र दिसत होते. पहिल्याच सत्रात जसप्रित बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर बेसला बाद करत इंग्लंडला 9 वा धक्का दिला. त्यानंतर अश्विनने अँड्रसनची विकेट घेत इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आणला. अँड्रसनने संघाच्या धावसंख्येत अवघ्या एका धावेची भर घातली. 

भारताकडून बुमराह अश्विनने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या तर नदीम आणि ईशांत शर्माने प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळवल्या. भारतीय संघाचे फलंदाज डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना कोणती रणनिती अवलंबणार हे पाहण्याजोगे आहे. 


​ ​

संबंधित बातम्या