IND vs ENG 1st Test Day 1 : चेन्नईत जो रुटचा लुंगी डान्स; टीम इंडिया बॅकफूटवर

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

पहिल्या दिवशी भारताकडून अश्विनने 1 तर बुमराहने दोन विकेट घेतल्या. दुखापतीतून सावरुन संघात पुनरागमन केलेल्या ईशांत शर्माला विशेष छाप सोडता आली नाही.  

गेल्याच महिन्यात श्रीलंकेत धावांचा वटवृक्ष उभा करणाऱ्या इंग्लंड कर्णधार ज्यो रूटने भारतातही मालिकेतील पहिल्याच खेळीत आपली मुळे खोलवर रुजवण्यास सुरुवात केली. शंभराव्या कसोटीत शतक करण्याचा पराक्रम त्याने केला; तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या भारताची गोलंदाजी मायदेशात पहिल्याच दिवशी निष्प्रभ ठरली. 
चेन्नईत आजपासून सुरू झालेल्या भारत- इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस निर्विवाद इंग्लंडचा ठरला. ज्यो रूटने नाबाद 128 करताना डॉमनिक सिबलेसह 200 धावांची भागीदारी केली. सिबले अखेरच्या षटकांत 87 धावांवर बाद झाला. दिवसभरातील 90 षटकांत भारताने तीनच फलंदाज बाद करता आले. यातील दोघे पहिले सत्र संपताना आणि तिसरे यश दिवसाचा खेळ संपताना मिळाले.

भारतीय जमिनीवर...

ऑस्ट्रेलियात दिमाखदार यश मिळवणाऱ्या भारतीयांसाठी आजचा दिवस हिरमोड करणारा ठरला. ब्रिस्बेन कसोटीत खेळलेला वॉशिंग्टन सुंदर हा एकमेव गोलंदाज या कसोटीत आहे. बुमरा, ईशांत शर्मा, अश्‍विन आणि नदीम या चौघांनी महम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि नटराजन यांची जागा घेतली. बुमराने आगळावेगळा विक्रम केला. परदेशात अधिक कसोटी सामने खेळल्यानंतर भारतात तो पहिला सामना खेळत आहे आणि त्यानेच तीनपैकी दोन विकेट मिळवल्या. खेळपट्टीकडून न मिळणारी साथ आणि चेंडू जुना झाल्यावर भारतीय गोलंदाज अधिकच निष्प्रभ ठरले. 

अखेरच्या सत्रात वेग वाढला

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या कामगिरीची दखल घेत इंग्लंडने फारच सावध सुरुवात केली; पण बुमरा आमि ईशांत प्रभावी ठरत नाही, हे लक्षात येताच बर्न्स आणि सिबले यांनी गिअर बदलण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात एकाही भारतीयांच्या हाती एकही विकेट लागली नाही. त्यामुळे रूट आणि सिबले यांनी 32 षटकांत चार धावांच्या सरासरीने 123 धावा केल्या.

रूटची भारतातील पाळेमुळे
ज्यो रूट इंग्लंडचा खेळाडू असला, तरी त्याची पाळेमुळे भारतात घट्ट रोवलेली आहेत. 2012 मध्ये नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळलेल्या रूटने 50 वा कसोटी सामना विखाशापट्टणम येथे खेळ आणि आज 100 वा सामना चेन्नईत खेळताना शानदार शतक झळकावून आपल्या वर्चस्वाची मोहोर उमटवली. विशेष म्हणजे लॅंडमार्क ठरणाऱ्या या कसोटीत त्याने किमान अर्धशतक केले आहे. भारतात येण्याअगोदर गेल्या महिन्यातील श्रीलंका दौऱ्यात रूटने द्विशतक आणि दीड शतक केले होते. आता 98, 99 आणि 100  वी कसोटी अशा सलग तीन कसोटीत शतक करणारा तो क्रिकेटविश्‍वातील पहिला फलंदाज ठरला.

इंग्लंडकडून स्वीपचे अस्त्र

खेळपट्टीवरील गवत कमी करण्यात आल्यामुळे ती उत्तरोत्तर फिरकीस साथ देण्याच्या अंदाजानुसार भारतीयांनी अश्‍विन, वॉशिंग्टन सुंदर आणि शाबाज नदिम असे तीन फिरकी गोलंदाज खेळवले; परंतु तिघेही अपयशी ठरले. सुंदरची इकोनॉमी तर ४.६० एवढी ठरली. अश्‍विनला बर्न्सची विकेट मिळाली; परंतु ती चांगला चेंडू टाकल्यामुळे नव्हे, तर त्याने विनाकारण रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. हा अपवाद वगळता रूट आणि सिबले यांनी स्वीप आणि रिव्हर्स स्विपचा मुक्तपणे वापर करून भारतीयांना लय मिळू दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लेगसाईडचा ट्रॅप लावला होता. इंग्लंडने त्यावर स्वीपचा उतारा शोधला. 
 


​ ​

संबंधित बातम्या