INDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 February 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी 4 मार्चपासून अहमदाबादला होणार आहे. 

मुंबई : भारताने इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी दोन दिवसांतच जिंकली. या पराभवामुळे भारताने जागतिक कसोटी क्रिकेट विजेतेपदाच्या स्पर्धेच्या गुणतक्‍त्यात अव्वल क्रमांक मिळवला आणि इंग्लंडला अंतिम फेरी गाठण्याच्या स्पर्धेतून बाद केले.

भारतास इंग्लंडमध्येच होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम लढतीतील प्रवेश निश्‍चित करण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटीत हार टाळणे आवश्‍यक आहे. याच वेळी चौथी कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ट्रान्स टास्मानियन प्रतिस्पर्ध्यांत जागतिक कसोटी विजेतेपदासाठी लढत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी 4 मार्चपासून अहमदाबादला होणार आहे. 

INDvsENG विराट BCCI ची वकिली करतोय का? कूकचा संतप्त सवाल

दरम्यान, चेन्नईतील दुसरी कसोटी जिंकून चौथ्यावरून दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या भारतीय संघाने प्रकाशझोतातील कसोटी जिंकत अव्वल क्रमांक मिळवला. भारताचे आता सरासरी गुण 71 आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे 70 आहेत. दुसरी कसोटी गमावल्याने इंग्लंडला अंतिम लढतीस पात्र ठरण्यासाठी अहमदाबादच्या दोन्ही कसोटीत विजय आवश्‍यक होता. आता पराभवामुळे ते चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. चौथी कसोटी जिंकली, तरी ते तिसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियास मागे टाकू शकणार नाहीत; मात्र इंग्लंड जिंकल्यास भारताची पीछेहाट होईल. 

भारतावर टांगती तलवार

भारताने दोन दिवसांत कसोटी जिंकल्यामुळे खेळपट्टीच्या दर्जाबाबत शंका घेतली जात आहे, हीच बाब भारताच्या वाटचालीत अडथळा ठरू शकेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. स्पर्धेच्या नियमानुसार खेळपट्टी अथवा मैदान खेळण्यास अयोग्य होते, असा निर्णय आयसीसीच्या मैदान आढावा समितीने दिल्यास त्या सामन्यातील विजयाचे गुण पाहुण्या (इंग्लंड) संघास देण्यात येतील, तर यजमान (भारत) संघ पराजित झाला असल्याचे मानले जाईल. 


​ ​

संबंधित बातम्या