IND vs ENG: विराट शून्यावर बाद; उत्तराखंड पोलिसांनी केलं ट्रोल

सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 13 March 2021

भारतीय संघाला पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडने ८ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला.

मुंबई: भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडवर ३-१ अशी दमदार मात केली. या विजयाच्या जोरावर भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. पण त्यानंतर सुरू झालेल्या टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १२४ धावाच केल्या. अहमदाबादच्या मैदानावर रोहित शर्माने कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पण तरीदेखील त्याला टी२० सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि वरच्या फळीतील धावा करण्याची महत्त्वाची जबाबदारी होती, पण विराट मात्र धावा काढण्यात अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाल्याने त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. त्यातही उत्तराखंड पोलिसांनी त्याला ट्रोल करण्यासाठी केलेलं ट्रोल विशेष चर्चेचा विषय ठरला.

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीला आलेला लोकेश राहुल केवळ १ धाव काढून त्रिफळाचीत झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. पण त्याला एकही धाव काढता आली नाही. ५ चेंडू खेळून झाल्यावर तो शून्यावर बाद झाला. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्यावरून उत्तराखंड पोलिसांनी विराटला ट्रोल केलं. "केवळ हेल्मेट घालणं पुरेसं नाही. आपली सद्सदविवेकबुद्धी वापरून गाडी चालवणंदेखील तितकंच आवश्यक आहे. नाहीतर तुम्हीदेखील कोहलीसारखेच शून्यावर बाद होऊ शकता", असं कॅप्शन लिहून त्यासोबत विराटचा शून्यावर बाद झालेला फोटो उत्तराखंड पोलिसांनी ट्वीट केला होता. पण त्यांच्यावर टीका झाल्याने काही वेळाने त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.

पाहा काय होतं ट्वीट-

विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव ऋषभ पंत आणि शिखर धवन सांभाळतील असं वाटत होतं. पण आधी धवन ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत २१ धावा काढून माघारी परतला. मुंबईकर श्रेयस अय्यरने पंतसोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पंत बाद झाल्यावरही अय्यरने फटकेबाजी सुरू ठेवली. त्याने ८ चौकार आणि १ षटकार खेचत ४८ चेंडूत ६७ धावा केल्या. पण हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यांना फारशी कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे भारताला २० षटकात केवळ १२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना जेसन रॉयने दमदार ४९ धावा केल्या. जोस बटलरनेही २८ धावा केल्या. त्यानंतर डेव्हिड मलान (२४) आणि जॉनी बेअरस्टो (२६) या दोघांनी नाबाद राहत इंग्लंडला विजय मिळवून दिला.


​ ​

संबंधित बातम्या