IND vs ENG: पाहुण्या इंग्लंडला मोठा धक्का; गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र जायबंदी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 11 February 2021

त्याच्या अनुपस्थितीचा इंग्लंडला मोठा फटका बसू शकतो. चेन्नईत रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने 227 धावांनी दमदार विजय नोंदवला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी  इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रमुख गोलंदाजाशिवाय त्यांना मैदानात उतरावे लागणार आहे. जोफ्रा आर्चरच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली असून तो दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.  आर्चरच्या कोपराला इन्फेक्शन झाल्याचे वृत्त आहे.

त्याच्या अनुपस्थितीचा इंग्लंडला मोठा फटका बसू शकतो. चेन्नईत रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने 227 धावांनी दमदार विजय नोंदवला होता. मालिकेतील आघाडी भक्कम करुन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. 

INDvsENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, भरवशाचा गडी मालिकेतूनच आउट

जोफ्रा आर्चरने पहिल्या कसोटी सामन्यात संघासाठी उपयुक्त कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात त्याने तीन महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या होत्या.  त्याने सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना तंबूत धाडले होते. आर्चरने भारतीय फलंदाजांना खुलून खेळण्याची संधी दिली नव्हती. याचा फायदा इतर गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी झाला.  आर्चरशिवाय , जेम्स अँड्रसनने दुसऱ्या डावात तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडचा फिरकीपटू बेसने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात लीचने घेतलेल्या चार विकेटमुळे इंग्लंडला यश मिळाले. 

ज्यो रुटने 100 व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली. त्याला सिब्ले आणि बेन स्टोक्स यांनी उत्तम साथ दिली. पहिल्या डावात त्यांनी केलेल्या 578 धावा भारतीय संघाला चांगल्याच महागात पडल्या. इंग्लंडसमोर भारतीय संघाला चेन्नईच्या मैदानात 22 वर्षांनंतर पराभवाचा सामना करावा लागला होता. जोफ्राची जागा भरुन काढण्यासाठी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 
 


​ ​

संबंधित बातम्या