INDvsENG : क्रिकेटच्या इतिहासात किती कसोटी सामन्यांचा निकाल दोन दिवसांत लागला माहितेय?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 25 February 2021

भारतीय संघाने दोन दिवसांत संपवलेला हा दुसरा सामना आहे. तर क्रिकेटच्या इतिहासातील हा 22 वा सामना आहे ज्याचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला. 

INDvsENG Test Matches Record :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील दिवस-रात्र रंगलेला सामना 48 तासांच्या आताच संपला. भारतीय संघाने हा सामना जिंकला असला तरी कसोटी रसिकाच्या पदरी घोर निराशा आली हे मात्र निश्चित. क्रिकेटच्या मैदानात पांढऱ्या पोशाखात पाच दिवस रंगणारा सामना दोन दिवसांत संपण्याची ही काही पहिली वेळ नाही. भारतीय संघाने दोन दिवसांत संपवलेला हा दुसरा सामना आहे. तर क्रिकेटच्या इतिहासातील हा 22 वा सामना आहे ज्याचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला. 

19 व्या शतकात 9 सामन्यांचा निकाल दोन दिवसांत

28 ऑगस्ट  1882 क्रिकेटच्या इतिहासातील नववा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत निकाली लागलेला पहिला सामना होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात  ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 63 धावांत आटोपला होता. इंग्लंडने 101 धावा करुन सामन्यात अल्प आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 122 धावा करुन इंग्लंडसमोर 85 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 77 धावांत ऑल आउट झाला होता.  1888 मध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा इंग्लंडला दोन दिवसांत पराभव दाखवला होता. 

INDvsENG 'वेड्या'चे घर उन्हात; नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अंदर की बात'​

इंग्लंडने सात सामन्यात मारली बाजी

1888 मध्ये ओव्हल आणि मँचेस्टरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात इंग्लंडने दोन दिवसात पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची परतफेड केली. एवढेच नाही तर 1889 मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांनी दोन वेळा दिवसांत आटोपून कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. 1890 मध्ये ओव्हलच्या मैदानात इंग्लंडने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला दोन दिवसांतच पराभूत केले. 1896 मध्ये इंग्लंडने आणखी दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या दोन दिवसांत गारद केले. 

20 व्या शतकात 6 सामन्यांचा निकाल दोन दिवसांत लागला

1912 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला होता. यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. याच वर्षी ओव्हलच्या मैदानात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला दोन दिवसांत पराभूत केले होते. 1921 मध्ये नाँटिंघमच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला होता. यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. 1931 मध्ये मेलबर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा खेळ दोन दिवसांतच खल्लास केला होता. 1936 मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर दोन दिवसांत पराभूत केले होते.  29 मार्च 1946 मध्ये ऑस्ट्रेलियाने वेलिंग्टनच्या मैदानात न्यूझीलंडला दोन दिवसात पराभव दाखवला होता.

20 व्या शतकात एकमेव कसोटी सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला

2000 मध्ये लीड्सच्या मैदानात इंग्लंडने वेस्ट इंडिजला पराभूत केले. 2002 मध्ये शारजाच्या मैदानात रंगलेला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना दोन दिवसांत आटोपला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

21 व्या शतकात सहा सामने दोन दिवसांत संपले

2005 मध्ये दोन सामने दोन दिवासांत निकाली लागले. यातील पहिला सामना हा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बावे यांच्यातील होता. केपटाऊनच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या झिम्बाब्वेचा खेळ खल्लास केला होता. हरारेच्या मैदानात न्यूझीलंडकडून झिम्बाब्वेवर दोन दिवसांत पराभूत होण्याची वेळ आली होती. 2017 मध्ये पोर्ट एलिझाबेथच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेला दुसऱ्या दिवशी गुंडाळले होते. 2018 मध्ये भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्धचा कसोटी सामना दुसऱ्या दिवशीच खिशात टाकला होता. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 474 धावा कुटल्या होत्या. फॉलोऑनची नामुष्की ओढावलेल्या अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 तर दुसरा डाव 103 धावांत आटोपला होता. त्यानंतर अहमदाबादच्या मैदानात रंगलेला सामन्यातील निकाल दोन दिवसांत लागला.
 


​ ​

संबंधित बातम्या