'हिटमॅन खेळणार नसेल तर टीव्ही बंद'; विराटच्या निर्णयावर सेहवागची नाराजी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाइन
Saturday, 13 March 2021

भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या टी20 सामन्यात मोठा बदल केला होता. त्यामुळे संघावर पराभवाची वेळ आली अशी चर्चा आता होत आहे.

नवी दिल्ली - इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून कसोटी मालिकेत भारताने 3-1 ने विजय मिळवला आहे. त्यानंतर सुरु झालेल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात श्रेयस अय्यरशिवाय इतर कोणताही खेळाडू फारसी चमक दाखवू शकला नाही. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात मोठा बदल केला होता. त्यामुळे संघावर पराभवाची वेळ आली अशी चर्चा आता होत आहे. तो बदल म्हणजे संघात रोहित शर्माच्या जागी शिखर धवनला संधी दिली. 

सामना सुरु होण्याआदी विराट कोहलीने सांगितले होते की, रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीवीर म्हणून उतरतील तर शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. मात्र प्रत्यक्षात पहिल्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आणि त्याच्याजागी धवन खेळला. कर्णधार कोहलीच्या या निर्णयावर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. 

हे वाचा - अखेर ठरलं! संजनानंच काढली बुमराहची विकेट

रोहित शर्माला बाहेर बसवल्यावरून विरेंद्र सेहवागनं प्रतिक्रिया देताना म्हटलं की, विराट कोहलीने सांगितलं की रोहित शर्मा सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नाही. पण भारत पहिला आणि दुसऱा सामना पराभूत जाल्यास हीच रणनिती असेल का? पराभवाने संघावर मोठा फरक पडतो. मी जर कर्णधार असतो तर माझी बेस्ट प्लेइंग 11 टीम खेळवली असती. रोहित शर्मा जर उपलब्ध आहे तर त्याला खेळवायलाच हवं. चाहतेसुद्धा रोहित शर्मासारख्या खेळाडूंना पाहण्यासाठी येतात. मीसुद्धा रोहित शर्माचा चाहता आहे. जर तो खेळत नाही तर माझा टीव्ही बंद राहील. सामना पाहण्याची माझी इच्छा होणार नाही. 

सेहवाग म्हणाला की, भारत जर टी20 वर्ल्ड कपच्या आधी सलामीच्या खेळाडूंची चाचपणी करत असेल तर धवन, रोहित आणि राहुल या तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवायलाच हवं. राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तर टी20 मध्ये चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. याशिवाय धवनला तिसऱ्या नंबरवर पाठवून विराट स्वत: चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो असाही सल्ला सेहवागने दिला आहे. 

पाहा व्हिडीओ - पंतचा इश्कवाला रिस्की शॉट; तोही जोफ्राला 

सलामीवर ठरले फ्लॉप
पहिल्या टी 20 सामन्यात  इंग्लंडच्या गोलंदाजीची सुरुवात फिरकीपटू आदिल राशिदने केली. त्यानं भारताचा कर्णधार विराट कोहलीला शून्यावर बाद केलं. तर सलामीवीर केअल राहुलला एका धावेवर जोफ्रा आर्चरनं तंबूत धाडलं. भारताची अवस्था तीन बाद 20 अशी झाली होती. रोहित शर्माच्या जागी संघात संधी मिळालेल्या धवनला याचा फायदा घेता आला नाही. मार्क वूडने त्याला 4 धावांवर बाद केलं.


​ ​

संबंधित बातम्या