INDvsENG : अक्षर-अश्विनने विणले फिरकीचे जाळे; रोहितच्या अर्धशतकाने भारताला वर्चस्वाची संधी

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 February 2021

बुधवारपासून सुरू झालेल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर झाला. अक्षर आणि अश्विन यांनी चेन्नईत विणलेले फिरकीचे जाळे येथेही टाकले त्यात इंग्लंडचा फलंदाज अलगत अडकत गेले.

अहमदाबाद : नवे स्टेडियम... नवी खेळपट्टी, परंतु भारतीय फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व कायम राहिले. अक्षर पटेलचे सहा तर अश्विनचे तीन विकेट यामुळे भारताने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत गुंडाळला त्यानंतर पहिल्या दिवस अखेर 3 बाद 99 अशी सुरूवात केली.

बुधवारपासून सुरू झालेल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर झाला. अक्षर आणि अश्विन यांनी चेन्नईत विणलेले फिरकीचे जाळे येथेही टाकले त्यात इंग्लंडचा फलंदाज अलगत अडकत गेले.
दुसऱ्या कसोटी सामन्यात दीडशतकी खेळी करून भारताला वर्चस्व मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने फलंदाजी सोपी नसलेल्या खेळपट्टीवर  कसलेली फलंदाजी करत नाबाद 57 धावा केल्या. रोहितने शुभमन गिलसह 33 धावांची सलामी दिली. त्यानंतर गिल पाठोपाठ पुजारा लवकर बाद झाला. रोहित आणि कोहली यांनी 64 धावांची भागीदारी केली मात्र दिवसाच्या अंतिम क्षणी कोहली चुकीचा फटका मारून बाद झाला.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

ईशांतची शानदार सुरुवात

शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांत शर्माला भारतीय खेळाडूंनी प्रथम मैदानात जाण्याचा मान दिला. ज्याची परतफेड ईशांतने डोमनिक सिबलीला झेलबाद करून केली. नव्याने संघात दाखल झालेल्या जॉनी बेअरस्टोला अक्षर पटेलचा पहिलाच चेंडू समजला नाही आणि तो पायचित होऊन परतला. दोनही फलंदाजांना भोपळा फोडता आला नाही.

तिसऱ्या विकेटकरता ज्यो रूटने चांगल्या खेळणाऱ्या झॅक क्रॉलीसोबत अर्धशतकी भागीदारी केली. झॅक क्रॉली कठीण खेळपट्टीवर आक्रमक फलंदाजी करत होता. त्याला चेंडूचा चांगला अंदाज येत होता. अश्विनच्या पुढ्यात पडलेल्या चेंडूला उगाच मागे सरकून खेळताना ज्यो रूट पायचित झाला आणि चित्र बदलले. पाठोपाठ चांगले अर्धशतक करणारा क्रॉली बाद झाला. अक्षर पटेलचा चेंडू वळेल या अंदाजाने खेळताना क्रॉली चकला.

INDvsENG 'वेड्या'चे घर उन्हात; नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अंदर की बात'

20 मिनिटांच्या ब्रेकनंतर इंग्लंडचे फलंदाज मैदानात आले आणि परत एकदा घसरगुंडी बघायला मिळाली. ऑली पोपला अश्विनने फसवून बोल्ड केले आणि तगड्या बेन स्टोकस्ला अक्षरने चेंडू वळवून पायचित केले. फलंदाजाला बाद केल्यावर अक्षर पटेलला प्रत्येक वेळी प्रेक्षकांनी आवाजी पाठिंबा दिला.
अक्षर पटेलला खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडाली. एक ना दोन 6 फलंदाजांना तंबूत पाठवून अक्षर पटेलने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर गुंडाळला. अगदी खरे बोलायचे तर प्रथम फलंदाजी करताना 112 धावांवर बाद होण्याइतके नवीन मैदानाचे विकेट खराब वाटत नव्हते.

 लक्षवेधक

 • सर्वाधिक विकेटच्या भारतीय क्रमवारीत रवीचंद्रन अश्वीनने झहीर खानला (507) मागे टाकले. अनिल कुंबळे (953) अव्वल
 • सर्वाधिक एकंदर विकेटच्या भारतीय क्रमवारीत अव्वल पाचमध्ये कपिलच केवळ मध्यमगती गोलंदाज. कुंबळेपाठोपाठ हरभजन (707), कपिलदेव (687), रवीचंद्रन अश्वीन (598) आणि झहीर खान (597)
 •  सलग दुसऱ्या डावात अक्षर पटेलकडून निम्मा संघ बाद. चेन्नईच्या दुसऱ्या डावात 60 धावांत 5 आणि अहमदाबादला पहिल्या डावात 38 धावांत 6 विकेट
 • भारताविरुद्धच्या नीचांकी नोंद अहमदाबादला टाळण्यात इंग्लंडला यश. मुंबईतील कसोटीत 102 धावांत बाद
 • भारतीय उपखंडातील कसोटीत पहिल्या तीनपैकी दोन फलंदाजांनी भोपळा न फोडण्याची ही पहिलीच वेळ
 •  जॉनी बेअरस्टॉ 39 व्यांदा पायचीत नाही, तर त्रिफळाचीत पद्धतीने बाद. 2016 पासूनचे एका फलंदाजाबाबत हे सर्वाधिक
 •  झॅक क्रॉलीचे अर्धशतक 60 चेंडूत.
 •  इंग्लंड सलामीवीराचे कसोटीच्या पहिल्या डावातील हे वेगवान शतक. यापूर्वी मार्कस ट्रेस्कॉथिक (61 - वि. वेस्ट इंडिज 2004)
 •  शंभर कसोटी खेळलेला इशांत सत्तरावा खेळाडू
   

​ ​

संबंधित बातम्या