INDvsENG स्टेडियमची नवलाई, 28 पैकी 21 फलंदाज न वळलेल्या चेंडूवर झाले बाद

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 February 2021

प्रकाशझोतातला सामना भारताने 10 विकेटने जिंकला; मालिकेत 2-1 आघाडी, अक्षर सर्वोत्तम
 

अहमदाबाद : क्रिकेटविश्‍वातील सर्वांत भव्य आणि मोठे स्डेडियम असा गाजावाजा करत कालच उद्‌घाटन झालेल्या स्टेडियमवरचा प्रकाशझोतातील पहिला कसोटी सामना दोन दिवस पूर्ण होण्याच्या आतच संपला. फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचायला लागणाऱ्या खेळपट्टीवर भारताने 10 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. यामुळे कसोटी अजिंक्‍यपद अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशा अधिक उंचावल्या.

प्रत्येक दिवसाला किमान 90 षटकांचा खेळ अशा हिशेबाने कसोटी सामन्याचा खेळ होत असतो, पण हा सामना केवळ 140.2 षटकांतच संपला. आज सकाळी बाद झालेला रोहित शर्मा सायंकाळच्या सत्रात पुन्हा फलंदाजीस आला. दोन्ही संघांच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही, अशी नवलाई घडलेल्या या सामन्यात अक्षर पटेलने दोन्ही डावांत मिळवलेले 11 विकेट निर्णायक ठरले. तोच सामन्याचा मानकरी ठरला.

या पराभवामुळे कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या इंग्लंडच्या आशा संपल्या आहेत. आता मालिकेतला अखेरचा सामना भारताला एक तर जिंकावा लागेल किंवा अनिर्णित ठेवावा लागेल.पहिल्या दिवशी 13 आणि आज दुसऱ्या दिवशी 17 फलंदाज बाद झाले. यातील दोन फलंदाज केवळ वेगवान गोलंदाजांना बाद करता आले. फिरकीचा आखाडा असे खेळपट्टीला संबोधण्यात येत असले, तरी फिरकीसमोर बाद झालेल्या 28 पैकी 21 फलंदाज जो चेंडू वळला नाही त्यावर बाद झाले.

INDvsENG : क्रिकेटच्या इतिहासात किती कसोटी सामन्यांचा निकाल दोन दिवसांत लागला माहितेय?

 ३ बाद ९९ वरून  डाव सुरू करणाऱ्या भारताचा डाव १४२ धावांत संपला. 33 धावांची आघाडी मिळालेल्या भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात 81 धावांत गारद केले, त्यानंतर मिळालेले 49 धावांचे आव्हान रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 7.4 षटकांतच पार केले. दुसऱ्या डावातही इंग्लंडचा डाव गडगडला तेव्हा लोकल हिरो अक्षर पटेल आणि अश्विनने मिळून सलग 30 षटकांचा मारा करून परत एकदा फलंदाजांना कोड्यात टाकले. इंग्लंडचा दुसरा डाव 81 धावांवर संपवताना अक्षरने पाच; तर अश्विनने चार फलंदाजांना बाद केले. दोघे सोडून दुसऱ्या डावात कोणी गोलंदाजी केली नाही ही कमाल झाली. दोन दिवसांतील पाच सत्रांच्या खेळात मिळून 30 फलंदाजांनी नव्या स्टेडियमच्या विकेटवर गुढगे टेकले.

इंग्लंडला दुसऱ्या डावात सावरण्याची संधी विराटने दिलीच नाही. नव्या चेंडूवर अक्षर पटेल आणि अश्‍विन असा मारा सुरू केला. अक्षरने पहिल्याच चेंडूवर झॅक क्रॉलीला आणि तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टॉच्याही यष्टी हलवल्या. ज्यो रूट आणि बेन स्टोकस्ने माफक प्रयत्न तग धरण्याचे केले जे अक्षर-अश्विनने मोडून काढले.
 

अक्षर, अश्‍विनचे पराक्रम
 

अक्षरने सामन्यात 10400 फलंदाजांना बाद करायचा; तर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील 400 बळींचा टप्पा गाठला. दोघा फिरकी गोलंदाजांना तोंड देणे इंग्लंडच्या फलंदाजांना जमले नाही. नव्या चेंडूपासून सुरुवात करताना प्रत्येकी 15 षटके दोघांनी टाकली आणि मग ९ फलंदाज बाद झाले असताना विराट कोहलीने वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीला आणले. इंग्लंडचा डाव 81 धावांवर आटोपला जेव्हा अँडरसनला सुंदरने बाद केले.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होत असताना लक्ष दोन मुंबईकर फलंदाजांवर होते. रोहित शर्मा आणि रहाणेने चांगली भागीदारी करणे अपेक्षित होते. फिरकी गोलंदाजांना अडखळत खेळणाऱ्या अजिंक्‍य रहाणेला जॅक लिचने बाद केले आणि भारताचा डाव कोसळू लागला. एकमेव आशास्थान रोहित शर्मा स्वीपचा फटका मारताना लिचला बाद झाला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर संघात एकच फिरकी गोलंदाज घेण्याची चूक मनोमन मान्य केल्यावर ज्यो रूटने जबाबदारी आपल्या हाती घेत गोलंदाजी करणे चालू केले. रूटने पंत आणि वॉशिंग्टन सुंदरला लगोलग बाद केलेच. वर अश्विन अक्षर पटेल आणि बुमराला बाद करून एका डावात 5 फलंदाजांना बाद करायचा पराक्रम केला. 

गुलाबी बॉल नेहमीपेक्षा थोडा जास्त वेगाने येतो आणि चेंडू वळणार का सरळ जाणार हे समजत नाही. अश्विन आणि अक्षरने तोच कच्चा दुवा हेरून मारा केला आणि आम्हाला सतत दडपणाखाली ठेवले. पण आम्ही तयारी करून परत येऊ. मागील दोन कसोटीतल्या चुका मानगुटीवर बसू न देता सुधारणा कराव्या लागतील. अजून काही तरणोपाय नाही.
- ज्यो रूट, इंग्लंड कर्णधार

या सामन्यात फलंदाजीचा दर्जा चांगला नव्हता हे मान्य करावे लागेल. खेळपट्टी खराब नव्हती, चांगली फलंदाजी करता आली असती. 30 पैकी 21 फलंदाज न वळलेल्या चेंडूवर बाद झाले आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दोन्ही संघांतील फलंदाजांनी खेळपट्टीवर उभे राहण्याचे प्रयत्न केले नाहीत. दोन दिवसांत कसोटी सामना संपला कसा मलाच समजत नाही.
- विराट कोहली, भारतीय कर्णधार

घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करता आली याचा खूप आनंद आहे. मी फक्त टप्पा आणि दिशा पकडून स्टंपात मारा करतो आणि फलंदाजाला चुका करायला भाग पाडतो. मी जरा वेगाने चेंडू टाकतो म्हणून मला रिषभ पंत वसीम भाई म्हणतो, कारण माझा आर्मर चेंडू वसीम अक्रमसारखा आत येतो असे त्याचे म्हणणे आहे.
- अक्षर पटेल

लक्षवेधक

  • इंग्लंडचा भारतातील नीचांक 81 धावांचा (यापूर्वी मुंबईत 102, 2011)
  • रविचंद्रन अश्‍विनचे चारशे कसोटी बळी पूर्ण, हा टप्पा 77 कसोटीतच गाठलेला दुसरा गोलंदाज. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन
  • अश्‍विनने सर्वात कमी कसोटीत 300 बळी घेतले होते
  • अक्षर पटेलकडून दुसऱ्याच कसोटीत दहा खेळाडू बाद करण्याचा पराक्रम,
  • भारत - इंग्लंड मालिकेपूर्वी शंभर वर्षात डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रसंग एकदाही घडला नव्हता. या मालिकेत प्रथम अश्वीनकडून आणि आता अक्षर पटेलकडून
  • परदेशात निम्मा संघ बाद केलेला ज्यो रूट हा इंग्लंडचा सहावा कर्णधार. त्यात रूटची कामगिरी सर्वोत्तम. यापूर्वी सी ऑब्री स्मिथ (19 धावा 5, वि. दक्षिण आफ्रिका - 1888-89)
  • निम्मा संघ बाद केलेल्या कर्णधारात रूटची कामगिरी तिसऱ्या क्रमांकाची. 

​ ​

संबंधित बातम्या