ICC WTC Point Table 'टॉपर' टीम इंडियाने 'प्रॉपर' इंग्लंडला केले आउट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 25 February 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर आयसीसीने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गुणतालिका शेअर केली आहे.

अहमदाबादच्या मैदानात टीम इंडियाने दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा खेळ खल्लास केला. भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केले. चेन्नईतील विजयी मोहिम अहमदाबादमध्येही कामय ठेवली. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर आयसीसीने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गुणतालिका शेअर केली आहे. यात 71 टक्के विजयासह भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. भारतीय संघाच्या खात्यावर 490 गुण जमा झाले आहेत. सहा मालिकेत टीम इंडियाने 11 सामने जिंकले असून 4 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात एका अनिर्णित सामन्याचाही समावेश आहे.

INDvsENG 'वेड्या'चे घर उन्हात; नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अंदर की बात'

न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी यापूर्वीच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळवले आहे. ऑस्ट्रेलियन संघ 69.2 टक्के विजय टक्केवारीवर तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर असून तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनमधून भारतीय संघाने त्यांना आउट केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका संघाला फायनलचे तिकीट मिळणार आहे. याचे चित्र चौथ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सच्या मैदानात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पोहचला असून भारतीय संघाला फायनलचे तिकीट मिळवण्यासाठीचा प्रवास सुलभ असाच दिसतोय. अहमदाबादच्या मैदानात रंगणारा चौथा आणि अखेरचा सामना अनिर्णित राखून किंवा सामना जिंकला तर भारतीय संघाला फायनलचे तिकीट पक्के होईल. 


​ ​

संबंधित बातम्या