INDvsENG: मातीच्या ढेकळात बॅटिंग करत इंग्लिश दिग्गजानं केली पिचची भविष्यवाणी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 2 March 2021

माजी कर्णधार मायकल वॉन याने सोशल मीडियावरुन खेळपट्टीसंदर्भात पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलीय. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय सर्वाधिक चर्चा सुरुय ती खेळपट्टीची. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला. त्यानंतर खेळपट्टीसंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दोन्ही संघातील खेळाडू याच मैदानात रंगणाऱ्या चौथ्या सामन्याची तयारी करत असताना खेळपट्टीचा मुद्दा अजूनही चर्चेत आले. अखेरच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने सोशल मीडियावरुन खेळपट्टीसंदर्भात पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलीय. त्याने अजब-गजब फोटो शेअर करुन खेळपट्टीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणलाय.  

मायकल वॉन (Michael Vaughan) ने भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी इन्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीची थट्टा केली आहे. मायकल वॉन याने चौहूबाजूनं हिरवळ असलेल्या ठिकाणी मातीच्या ढेकळात खेळतानाचा एक फोटो शेअह केलाय. चौथ्या कसोटीसाठी चांगली तयारी सुरु आहे, या कॅप्शनसह त्याने हा फोटो शेअर केलाय.  

यापूर्वीही शेअर केला होता फोटो

इंग्लंडच्या पराभवाला खेळपट्टी कारणीभूत असल्याचा दावा मायकल वॉन सुरुवातीपासून करत आलाय. यापूर्वी त्याने शेत नांगरत असलेल्या एका शेतकऱ्याचा फोटो शेअर करुन अहमदाबादच्या खेळपट्टीवर टीका केली होती. चौथ्या दिवसाची तयारी जोरदार सुरु आहे. पाचव्या दिवशी चेंडू टर्न होण्याची अपेक्षा आहे, अशा आशयाचे शब्द लिहून त्याने खेळपट्टीवर ताशेरे ओढले होते.  


​ ​

संबंधित बातम्या