IND vs ENG: बर्थडे बॉयची विकेटमागे कमाल; पंत-रोहितला चपळाईनं धाडलं माघारी (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 15 February 2021

त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघाने 100 धावांच्या आतच 5 विकेट गमावल्या.

चेन्नईच्या एम चिदंबरम मैदानात सुरु असलेल्या  भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवशी आपल्या बर्थडे बॉयनं  बेन फोक्स विकेटमागे चपळाई दाखवत भारतीय संघाच्या सलामीवीर रोहितसह आक्रमक खेळी करण्याची क्षमता असलेल्या पंतला यष्टिचित केले. विकेटमागे त्याने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगीच आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर वासीम जाफर, किरण मोरे यांच्यासह अन्य दिग्गजांनी त्याच्या कामगिरीचं कौतुक केले आहे. 

त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघाने 100 धावांच्या आतच 5 विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील चौथ्या षटकात जॅक लीचने रोहित शर्माला चकवा दिला. रोहित शर्मा क्रिजच्या किंचित बाहेर गेला आणि फोक्सने चपळाईनं बेल्स उडवत त्याला चालते केले. पहिल्या डावात नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या पंतलाही लीचने गंडवले. पुढे जाऊन फटका खेळण्याचा पंतचा डाव फसला आणि यष्टीमागे फोक्सनं आपली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला पंतची विकेट मिळवून देण्यात मोलाची मदत केली.

INDvsENG : पंतनं मैदानातच खाल्ली रोहितची 'थप्पड', सेहवागनं शेअर केला व्हिडिओ  

बर्थ डे दिवशी केलेल्या भन्नाट कामगिरीनंतर बेन फोक्सवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसते आहे. बेन फोक्सच्या विकेटमागची कामगिरी लक्षवेधी वाटली. पहिल्या डावात त्याने एकही अवांतर धाव दिली नाही. भारतीय मैदानावर परदेशी यष्टिरक्षकाला एवढी अप्रतिम कामगिरी करणं शक्य नसते, असे ट्विट जाफरने केले आहे. किरण मोरे यांनी भारतात उत्तम यष्टिरक्षण करणारा सर्वोत्तम विकेट किपर अशा शब्दांत बेन फोक्सच कौतुक केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या