INDvsENG : मोटेराची भव्यता, महानाट्याची उत्सुकता;

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

स्टेडियम आणि खेळपट्टी नवी असल्यामुळे सर्वच अनभिज्ञ आहेत, त्यामुळे सादर होणारे महानाट्याचे प्रयोग आणि क्‍लायमॅक्‍स याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 
 

अहमदाबाद : क्रिकेटविश्‍वातील सर्वांत मोठ्या रंगमंचावर एका महानाट्याची सुरुवात उद्यापासून होत आहे. एक लाखाहून अधिक क्षमता असलेल्या नव्या करकरीत मोटेरा स्टेडियमचा रंगमंच सज्ज आहे आणि भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी हे महानाट्य त्यावर सादर होणार आहे. स्टेडियम आणि खेळपट्टी नवी असल्यामुळे सर्वच अनभिज्ञ आहेत, त्यामुळे सादर होणारे महानाट्याचे प्रयोग आणि क्‍लायमॅक्‍स याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.

भारताचे पारडे जड असले कसोटी अजिंक्‍यपद अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी भारताला या महानाट्यात हिरोचीच भूमिका बजावावी लागणार आहे. उद्यापासून सुरू होणारा हा सामना तसेच याच स्टेडियमवर होणारा मालिकेतील चौथाही सामना यापैकी एकही सामना भारताला गमावणे परवडणारे नाही. त्यासाठी प्रकाशझोतातील सामना जिंकून भारताला एक पाऊल पुढेच राहावे लागणार आहे.
प्रशासनाने निम्मे प्रेक्षक सामना बघू शकतील अशी परवानगी दिल्याने 55 हजार प्रेक्षक कसोटी सामन्याचा आनंद लुटणार आहेत.

राष्ट्रपतींची उपस्थिती

सामन्याला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. बीसीसीआयने बाकी संलग्न क्रिकेट संघटनांच्या मोजक्‍या पदाधिकाऱ्यांनाही खास सामना बघायला निमंत्रित केले आहे असेही समजते

फिरकीला सहाय्य

सामन्याच्या दोन दिवस अगोदरच रोहित शर्माने नव्या स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल असे अगोदरच स्पष्ट केलेले आहे. त्यानुसार नाणेफेक जिंकणारा कर्णधार फलंदाजी करायचा निर्णय घेईल.

ईशांतचा 100 वा सामना
1. भारताकडून ईशांत शर्मा 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने 100 कसोटी सामने खेळण्याची मजल मारणे खूप आव्हानात्मक आहे. अगोदर फक्त कपिल देव यांनी तो विक्रम करून दाखवला आहे. 

2. इंग्लंड संघव्यवस्थापन जीमी अँडरसन - स्टुअर्ट ब्रॉडची जोडी मैदानात उतरवण्याच्या विचारात आहे. बेन फोक्‍स्‌ विकेट किपिंग कायम करेल आणि जॉनी ब्रेअरस्टॉ कदाचित रोरी बर्न्सच्या जागी सलामीला फलंदाजीला येईल असा अंदाज आहे.

3. भारतातील हा फक्त दुसरा दिवस रात्रीचा कसोटी सामना होणार आहे ज्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. भारतात होणारा दवाचा त्रास पाहता गुलाबी चेंडूचा रंग नीट राहवा म्हणून त्यावर लॅकरचा पापुद्रा असतो. गरम हवा आणि खेळपट्टीचा या चेंडूवर काय परिणाम होतो आणि त्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना मिळतो का हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हवामानाचा अंदाज : दिवसा 35 अंश तपमान आणि त्यात संध्याकाळी होणारी 10 अंशांची घट या परस्परविरोधी हवामानाशी जुळवून घेण्याचे आव्हान. द

वाचे नव्याने आव्हान खेळपट्टीचा अंदाज : खेळपट्टीवर फारसे गवत नाही, त्यामुळे उत्तरार्धात फिरकी गोलंदाज प्रभावी; मात्र नव्या चेंडूवरील वेगवान गोलंदाज जास्त प्रभावी ठरण्याची शक्‍यता.

गुलाबी चेंडू आणि दव : खेळपट्टीवर गवत फारसे नाही, मैदानाचा उर्वरित भाग हिरवागार आहे. संध्याकाळी दव पडल्यास त्या वेळी मैदानातून जाणारा चेंडू ओला होईल. हा ओलसर झालेला गुलाबी चेंडू जवळापस मातीच असलेल्या या खेळपट्टीवर काय करामत करणार हेही लक्षवेधक असेल.

लक्षवेधक

कोहलीचे यापूर्वीचे कसोटी शतक 2019 मध्ये ईडन गार्डनवर प्रकाशझोतातील कसोटीत

बांगलादेशविरुद्धच्या या कसोटीनंतर 34 डावात कोहलीचे शतक नाही. सर्वाधिक लांबलेला कसोटी शतकाचा दुष्काळ

इशांत शंभरावी कसोटी खेळणार. ही कामगिरी करणारा भारताचा दुसराच मध्यमगती गोलंदाज. यापूर्वी कपिलदेव (131)

प्रकाशझोतातील कसोटीत मध्यमगती गोलंदाजांच्या 354 विकेट; तर फिरकीच्या 115

मोटेरावरील यापूर्वीची कसोटी भारत आणि इंग्लंड यांच्यात. 2012 मधील या कसोटीत भारताची नऊ विकेटनी सरशी
    
रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 48 पैकी 26 कसोटीत विजय. मायकेल वॉनच्या विक्रमाशी बरोबरी.

लक्ष्य इंग्लंड

तिसरी कसोटी आजपासून
ठिकाण  : सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा अहमदाबाद
थेट प्रक्षेपण : दुपारी 2 : 30 पासून स्टार स्पोर्टस्‌
मालिकेतील स्थिती  : 1:1


​ ​

संबंधित बातम्या