ENGvsWI : दुसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडची मालिकेत बरोबरी 

टीम ई-सकाळ
Monday, 20 July 2020

तीन कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी बरोबरी साधली आहे.    

मँचेस्टर येथील इंग्लंड-विंडीज यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सलामीवीर डॉम सिब्ले (176)आणि बेन स्टोक्स (120) यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 9 गड्यांच्या बदल्यात 469 धावांवर मजल मारली आणि डाव घोषित केला. यानंतर फलंदाजी साठी आलेल्या पाहुण्या विंडीजच्या संघाला 287 धावांवर रोखत इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. व दुसऱ्या डावात 129 धावा करत इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाला 312 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करता न आल्यामुळे इंग्लंड-विंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला आहे. त्यामुळे तीन कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली आहे.    

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील साउथहॅम्प्टन येथील पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच, मँचेस्टर येथील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या सुरवातीला पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ चालू करण्यास विलंब झाला. परंतु त्यानंतर वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोरी बर्न्स, जॅक क्रॉली आणि जो रूट यांच्यानंतर बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ले या दोघांनी 126 धावांची भागीदारी करत पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाला पडझडीपासून रोखले. तर दुसऱ्या दिवशीच्या खेळात डॉम सिब्ले आणि बेन स्टोक्स यांनी केलेल्या 260 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला 469 धावसंख्या उभारता आली. व डाव घोषित करत इंग्लंडने विंडीज संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने बिनबाद 16 धावा केल्या होत्या. 

भारतातील उगवता काळ हा बॅडमिंटनसाठी चांगला - पुलेला गोपीचंद   

त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या खेळात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का सॅमने दिला. सॅमच्या गोलंदाजीवर जॉन कॅम्पबेल 12 धावांवर असताना पायचीत झाला. मात्र त्यानंतर पावसाला सुरवात होऊन दिवसभर संततधार चालूच राहिल्याने तिसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्याची वेळ सामानाधिकारी व पंचांवर आली. त्यामुळे मालिकेत 1 - 0 ने मागे असलेल्या इंग्लंडला या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला लवकर बाद करून सामन्यावर पकड मिळवण्याची मोठी संधी हुकली. मात्र त्यानंतर चौथ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडच्या गोलंदाजांनी विंडीज संघाला 287 धावांवर रोखले. व दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 129 धावांवर दुसरा डाव घोषित करून 312 धावांचे लक्ष वेस्ट इंडिज संघाला दिले. 

ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-20 विश्वकरंडक अखेर लांबणीवर...आयपीएलचा मार्ग मोकळा

शेवटच्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळात 312 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 198 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांपैकी दुसऱ्या कसोटी सामन्यात 113 धावांनी वेस्ट इंडिज संघावर विजय मिळवला आहे. या विजयमामुळे इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी साधली. पहिल्या डावात 3 विकेट घेणाऱ्या इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या डावात देखील धारदार गोलंदाजी करत 42 धावांच्या बदल्यात 3 विकेट घेतले. तर ख्रिस व्हॉक्स, बेन स्टोक्स आणि डॉम ने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. व सॅमने एक विकेट घेतली. 312 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ब्रूक्स (62) आणि ब्लॅकवुड (55) यांच्याव्यतिरिक्त कोणताही खेळाडू फार काळ मैदानावर टिकू शकला नाही.        

दरम्यान, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विंडीज संघाने, साउथहॅम्प्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघाला धूळ चारत विजय मिळवला होता. तर हा दुसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला आहे. त्यामुळे शेवटचा आणि तिसरा सामना वेस्ट इंडीज संघाने जिंकल्यास विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये 32 वर्षानंतर कसोटी मालिका जिंकेल. यापूर्वी 1988 मध्ये विंडीज संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4 - 0 ने हरवले होते. यापूर्वीच्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ 157 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांपैकी 49 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर 57 सामन्यांत इंग्लंड पराभव पत्करावा लागला आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या