ENGvsPak : पाक कर्णधाराची एकाकी झुंज; जिमीच्या भेदक माऱ्यामुळे संघावर ओढावली फॉलोऑनची नामुष्की

सुशांत जाधव
Monday, 24 August 2020

जेम्स अँड्रसनने नसीम शाहच्या रुपात डावातील पाचवा बळी टिपत पाहुण्या पाकिस्तानचा पहिला डाव 273 धावांत आटोपला. अझर अलीने 272 चेंडूत 21 चौकाराच्या मदतीने 141 धावांची नाबाद खेळी केली. 

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात साउथहॅम्पटनच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पाक  कर्णधार अझर अलीने एकाकी झुंज दिली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मोहम्मद रिझवानच्या (53) धावांच्या साथीनं अझर अलीने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. जेम्स अँड्रसनने नसीम शाहच्या रुपात डावातील पाचवा बळी टिपत पाहुण्या पाकिस्तानचा पहिला डाव 273 धावांत आटोपला. अझर अलीने 272 चेंडूत 21 चौकाराच्या मदतीने 141 धावांची नाबाद खेळी केली. 

तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर इंग्लंडची मजबूत पकड

इंग्लंड संघाने आपला पहिला डाव 8 बाद 583 धावांवर घोषीत केला. डोंगराऐवढ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शान मसूदला जेम्स अँड्रसनने अवघ्या 4 धावांवर चालते केले. अबीद अली 1 धाव करुन तंबूत परतला. पहिला गडी गमावल्यानंतर मैदानात उतरलेला कर्णधार अझर अली शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. बाबर आझम (11), असद शफीक (5), फवाद आलम (21), मोहम्मद रिझवान (53),   यासिर शाह (20), शाहीन आफ्रीदी (3), मोहम्मद अब्बास (1) तर नशीम शाहला खातेही उघडता आले नाही. 

 बीसीसीआयने धोनीला योग्य वागणूक दिली नाही; वाचा सविस्तर

इंग्लंडकडून जेम्स अँड्रसन सर्वाधिक 5 बळी मिळवले. स्टुअर्ट ब्रॉडने 2, क्रिस वोक्स आणि डॉमिनिक बेसने प्रत्येकी एक-एक विकेट घेत जिमीला उत्तम साथ दिली. तिसऱ्या दिवशीच्या खेळात पाकिस्तानचा पहिला डाव 273 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने त्यांना फॉलोऑन दिला आहे. 310 धावांची पिछाडी भरुन काढून सामना आपल्या बाजूने वळवणे किंवा अनिर्णित ठेवणे पाकिस्तानी संघासाठी मोठे आव्हान असणार आहे. झॅक क्रॅव्लेनं केलेले द्विशतक (267) आणि जोस बटलरने केलेली 152 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 8 बाद 583 धावा केल्या आहेत. शाहीन आफ्रिदी, यासिर शाह आणि आलम यांनी प्रत्येकी दोन-दोन तर नशीम शाह आणि शफिकला एक-एक बळी मिळाला होता. 
 


​ ​

संबंधित बातम्या