विराट सेनेला मोठ्या पराभवाची चाहूल

सुनंदन लेले
Monday, 10 September 2018

लंडन : अ‍ॅलिस्टर कुक आणि ज्यो रुटने मोठी शतके झळकावताना रचलेली 259 भागीदारी यजमान इंग्लंड संघाची पाचव्या कसोटी सामन्यावरची पकड अजून मजबूत करून गेली. 8 बाद 423 धावसंख्येवर डाव घोषित करताना इंग्लंडकडे 463 धावांची आघाडी जमा झाली होती. भारताकरता दुसर्‍या डावाची सुरुवात फारच खराब झाली. कर्णधार कोहलीसह 3 फलंदाज बाद करण्यात ब्रॉड - अँडरसन जोडीला यश आले आणि पाचव्या कसोटीत पराभवाची स्पष्ट चाहूल भारतीय संघाला लागली. चौथ्या दिवसाचा खेळ संपताना विराट सेनेची अवस्था 3 बाद 58 अशी झाली होती.

चहापानानंतरही ज्यो रुटने मानसिक खच्चीकरण करायला डाव चालू ठेवला. सॅम करन बाद झाल्यावर ज्यो रुटने डाव घोषित केला. गंमत म्हणजे हनुमा विहारीला तीन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले. जडेजाने तीन फलंदाज बाद केले आणि सुंदर गोलंदाजी करूनही शमीला 2 बळींवर समाधान मानावे लागले. 

भारतीय डावाची सुरुवात भयानक झाली. शिखर धवन आणि पुजाराला अँडरसनने त्यामानाने सरळ चेंडूवर पायचित केले. बाद झाले त्या चेंडूवर दोघा फलंदाजांचे पायच हलले नाहीत. अधोगती पुढे चालू राहिली. कप्तान विराट कोहली ब्रॉडचा बाहेर जाणार्‍या चेंडूचा पाठलाग करताना झेलबाद झाला. इंग्लंड संघाने कोहलीचा महत्त्वाचा बळी जोरदार आरडा ओरडा करून साजरा केला. मालिकेत 597 धावा जमा करणारा कोहली शेवटच्या डावात पहिल्या चेंडूवर बाद झाला. 3 बाद 2 धावसंख्येवरून लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने पुढे पडझड होऊन दिली नाही.  3 बाद 58 धावसंख्येवर दिवसाचा खेळ संपला. राहुल 46 आणि रहाणे 10 धावांवर नाबाद राहिले. 

चौथ्या दिवशीच्या खेळाचे मुख्य आकर्षण अर्थातच अ‍ॅलिस्टर कुक होता. खेळाला सुरुवात झाल्यावर खेळपट्टी अजून संथ झाली असल्याचे बघायला मिळाले. त्यातून भारताचा मुख्य गोलंदाज ईशांत शर्माच्या घोट्याला दुखापत झाल्याने तो मैदानावर आला नाही. हाती असलेल्या सर्व अस्त्रांना गोलंदाजी देऊनही भारतीय कप्तान विराट कोहलीला कुक- रुटची जोडी फोडता आली नाही. दोघांनी अगदी सहजी फलंदाजी करत पहिले दोन तास गोलंदाजांना यशापासून लांब ठेवले. उपहाराअगोदर वीस मिनिटे अ‍ॅलिस्टर कुकचे 33वे शतक झोकात पार पडले. प्रेक्षकांनी तब्बल 5 मिनिटे उभे राहून कुकला टाळ्या वाजवत मानवंदना दिली. 

ज्यो रुटला दोन वेळा जीवदान लाभले. एकदा जडेजाच्या गोलंदाजीवर प्रचंड वेगाने आलेला झेल अजिंक्य रहाणेला पकडता आला नाही. दुसर्‍या वेळेला ज्यो रुटच्या बॅटची कड चेंडूने घेतली असताना विकेट किपर रिषभ पंत अर्धवट मधे गेल्याने चेतेश्वर पुजाराला झेल पकडता आला नाही. रुटने त्याचा योग्य फायदा घेत उपहारानंतर शतक पूर्ण केले. साडेतीन तास भारतीय गोलंदाज जोडी फोडायला प्रयत्न करत होते. अखेर पदार्पण करणार्‍या हनुमा विहारीला एकाच षटकात दोनदा यश मिळाले. प्रथम षटकार मारायच्या प्रयत्नात ज्यो रुट 125 धावांवर झेल बाद झाला. पाठोपाठ अ‍ॅलिस्टर कुकची 147 धावांची मोठी खेळी संपली जेव्हा रिषभ पंतने झेल पकडला. भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी जाऊन कुक बरोबर हात मिळवला.

​ ​

संबंधित बातम्या