पाचही सामने खेळले पाहिजेत असे नाही : ब्रॉड 

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज जेम्स अँडरसन खांद्याच्या दुखापतीतून आता कुठे स्थिरावत आहे. कौंटी क्रिकेट खेळताना ब्रॉडलाही दुखापत झाली होती. मात्र, दोघेही कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त आहेत. मात्र, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडू नये, म्हणून या दोघांना आलटून पालटून वापरण्याचा इंग्लंड मंडळाचा विचार आहे. 

लंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाचही सामन्यांत वेगवान गोलंदाजांना आलटून पालटून संधी देण्याचा विचार इंग्लंड क्रिकेट मंडळ करत असून, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निर्णयाचे स्वागत केले आहे. 

इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज जेम्स अँडरसन खांद्याच्या दुखापतीतून आता कुठे स्थिरावत आहे. कौंटी क्रिकेट खेळताना ब्रॉडलाही दुखापत झाली होती. मात्र, दोघेही कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त आहेत. मात्र, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडू नये, म्हणून या दोघांना आलटून पालटून वापरण्याचा इंग्लंड मंडळाचा विचार आहे. 

ब्रॉड म्हणाला, "वेगवान गोलंदाजांवर भार पडतोच असे नाही. नाणेफेक, खेळपट्टी कशी मिळते यावर बरेच काही अवलंबून आहे. अर्थात, सहा आठवड्यांत पाच कसोटी सामने खेळायचे असतील, तर मंडळाची "रोटेशन' पद्धती मला योग्य वाटते. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल, तर वेगवान गोलंदाजांना फार काही करावे लागत नाही. पण, जेव्हा चेंडू स्विंग होतो तेव्हा त्यांची जबाबदारी वाढते.'' 

या संदर्भात संघ व्यवस्थापनाने या विषयी चर्चा सुरू केली आहे. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय कुणा एका खेळाडूला धरून घेतलेला नाही, असे ब्रॉडने सांगितले असले, तरी त्याने सहा आठवड्यांत पाच कसोटी सामन्यांचा उल्लेख करून व्यग्र कार्यक्रमाविषयी जणू टिप्पणीच केली आहे. 

ब्रॉड या विषयी अधिक माहिती देताना म्हणाला, "एखाद्या सामन्यासाठी मला वगळले म्हणजे माझे क्रिकेट संपले असे होत नाही. आम्ही कौंटी क्रिकेट खेळू शकतो. या निर्णयामुळे नवीन गोलंदाज पुढे येतील आणि अन्यत्र खेळत राहिल्याने आपणही चर्चेत राहू. त्यामुळे "रोटेशन'चा बाऊ करण्याची गरज नाही. पाच सामने खेळायचे म्हटल्यावर छोटे छोटे बदल हे होणारच. गोलंदाजांनी ते समजू घ्यायला हवेत.''

संबंधित बातम्या