एक विराट, बाकी भुईसपाट; भारताने मालिकाही गमाविली

सुनंदन लेले
Sunday, 2 September 2018

साउदम्पटन : चौथ्या दिवशी इंग्लंडचे उरलेले दोन फलंदाज 11 धावांमधे बाद झाले आणि भारतासमोर चौथ्या डावात 245 धावा करायचे आव्हान उभे ठाकले. नेहमीप्रमाणे भारताचे दोनही सलामीचे फलंदाज जास्त प्रतिकार न करता तंबूत परतले. पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजाराही लवकर बाद झाला. पाऊले पराभवाची वाट चालू लागतात की काय अशी शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली असताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानात जमली. शतकी भागीदारी करून कोहली 58 धावांवर बाद झाला तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. चहापानानंतर भारताच्या उरलेल्या फलंदाजांना बाद करायला इंग्लंडला जास्त घाम गाळावा लागला नाही.

साउदम्पटन : चौथ्या दिवशी इंग्लंडचे उरलेले दोन फलंदाज 11 धावांमधे बाद झाले आणि भारतासमोर चौथ्या डावात 245 धावा करायचे आव्हान उभे ठाकले. नेहमीप्रमाणे भारताचे दोनही सलामीचे फलंदाज जास्त प्रतिकार न करता तंबूत परतले. पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजाराही लवकर बाद झाला. पाऊले पराभवाची वाट चालू लागतात की काय अशी शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली असताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानात जमली. शतकी भागीदारी करून कोहली 58 धावांवर बाद झाला तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. चहापानानंतर भारताच्या उरलेल्या फलंदाजांना बाद करायला इंग्लंडला जास्त घाम गाळावा लागला नाही. भारताचा दुसरा डाव 184 धावांवर संपवला आणि इंग्लंडने चौथा कसोटी सामना 60 धावांच्या फरकाने जिंकला. 5 सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा विजय असल्याने इंग्लंडने मालिकाही जिंकली.

चौथ्या दिवसाची सुरुवात जबरदस्त झाली. पहिल्याच चेंडूवर मोहंमद शमीने स्टुअर्ट ब्रॉडला झेल बाद करवले. सॅम करन शक्य नसलेली दुसरी धाव पळताना धावबाद झाला तो वाढदिवस साजरा करणार्‍या ईशांत शर्माच्या चांगल्या फिल्डींगमुळे. विजयाकरता 245 धावांचा पाठलाग करायचे भले मोठे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर उभे झाले. अपेक्षा होती चांगल्या सुरुवातीची. पण स्टुअर्ट ब्रॉडच्या काहीशा खाली राहिलेल्या चेंडूवर लोकेश राहुल बोल्ड झाला. राहुल सलग 4 कसोटी सामन्यातील 8 डावांमधे चांगली खेळी करायला अपयशी ठरला. चेतेश्वर पुजाराला अँडरसनने पायचित केले. आणि जरा बरा खेळू लागलेल्या अँडरसनने झेल द्यायला लावले. 

3 बाद 22 अशा नाजूक अवस्थेत संघ असताना अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला. मोईन अली गोलंदाजांच्या बुटांनी तयार झालेल्या खराब जागेत चेंडू टाकून विराट कोहलीला सतत प्रश्न विचारत होता. दोन वेळा विराट विरुद्ध पायचीतचे अपील फेटाळले गेले. दोनही वेळेला इंग्लंडने तिसर्‍या पंचांकडे दाद मागितली. त्याचा फायदा असा झाला की 30 षटकांच्या आताच इंग्लंडचे दोनही रेफरल्स वापरून संपले. 

ज्यो रुटने मोईन अली सह दुसरा फिरकी गोलंदाज आदिल रशिदलाही वापरून बघितले. रहाणे आणि विराट कोहलीने मोकळ्या जागेत हळुवार चेंडू ढकलून बर्‍याच एकेरी धावा घेतल्या. धावफलक  हलता ठेवल्याने ज्यो रुटच्या समस्या वाढू लागल्या. अँडरसनला फ्लिकचा कडक चौकार मारून विराटने अर्धशतक पूर्ण केले तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या तर इंग्लंडच्या खेळाडूंनी  नकारार्थी माना हलवल्या. कोहली - रहाणेची जमलेली जोडी इंग्लंडला त्रास द्यायला लागली होती. 

शतकी भागीदारी झाली होती आणि कोहली - रहाणे चहापानापासून पाच मिनिटे दूर असताना मोईन अलीने कोहलीला खतरनाक चेंडू टाकला. खराब जागेतून भसकन वळणारा चेंडू कोहलीच्या ग्लोव्हजला चाटून कुकच्या हातात विसावला. 58 धावांवर विराट बाद झाला तेव्हा निम्म्या धावा झाल्या होत्या निम्म्या करायच्या बाकी होत्या. चहापानाला 4 बाद 126 धावसंख्येवर अजिंक्य रहाणेवर (नाबाद 44 धावा) भारताच्या आशा विसंबल्या.

चहापानाला भारताच्या आशा जिवंत होत्या त्या केवळ अजिंक्य रहाणे नाबाद खेळत असल्याने. हार्दिक पंड्याचे फलंदाज म्हणून अपयशाचे सत्र पुढे चालू राहिले. पहिल्या डावाप्रमाणेच पंड्या दुसर्‍या डावातही शून्यावर बाद झाला. रिषभ पंतने वेगळा पवित्रा घेतला. मोईन अलीला एक षटकार आणि दोन चौकार पंतने मारले. क्षेत्ररचना पांगवली गेल्यावर मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा काढण्याचा शहाणपणा पंतला सुचला नाही. मोईन अलीने मोठा फटका मारायच्या मोहात पंतला बाद केले आणि पुढच्याच षटकात अर्धशतक करून खेळणार्‍या अजिंक्य रहाणेला पायचित केले. 

प्रमुख फलंदाज तंबूत पाठवल्यावर गोलंदाजांना बाद करणे कठीण गेले नाही. बेन स्टोकसने ईशांत शर्माला पायचित केले. त्यानंतर अश्विनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण भारताला पराभव स्वीकारावा लागला.


​ ​

संबंधित बातम्या