किपचोगेने घडविला इतिहास, दोन तासांत मॅरेथॉन केली पूर्ण

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

केनियाचा मॅरेथॉनमधील विश्‍वविक्रमवीर इलियुड किपचोगेने एक इतिहास घडवत दोन मिनिटांच्या आत मॅरेथॉन धावणारा जगातील पहिला धावपटू ठरला आहे.

व्हिएन्ना : तब्बल 65 वर्षापूर्वी सर रॉजर बॅनीस्टर यांनी एक माईल अंतर चार मिनिटांत धावण्याचा विश्‍वविक्रम करून इतिहास घडविला होता. अशाच प्रकारचा एक इतिहास केनियाचा मॅरेथॉनमधील विश्‍वविक्रमवीर इलियुड किपचोगेने केला असून तो दोन मिनिटांच्या आत मॅरेथॉन धावणारा जगातील पहिला धावपटू ठरला आहे. त्याने हे अंतर 1 तास 59 मिनिटे 40 सेकंदात पूर्ण केले. ऑलिंपीक विजेता असलेल्या इलियुडने इतिहास घडविला असला तरी ही त्याची धाव स्पर्धत्मक नसल्याने ही कामगिरी विश्‍वविक्रम म्हणून गणल्या जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने म्हटले आहे. 

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामधील पार्टर पार्क 9.4 किलोमीटर परिसरात किपचोगेने हा इतिहास घडविला. त्यावेळी त्याच्यासोबत 41 पेस मेकर धावपटू विविध टप्यावर धावत होते. त्यापैकी प्रत्येकी सात धावपटू एका वेळी धावत असे. त्यातील पाच धावपटू किपचोगेच्या पुढे तर उर्वरीत दोन आजू-बाजूला धावत होते. त्यांच्या जागा लेसर मार्करने निश्‍चित केल्या गेल्या होत्या. दोन मिनिटांच्या आता धावायचे असल्याने त्याने प्रत्येक किलोमीटरसाठी 2 मिनिटे 50 सेकंदाचे सातत्य ठेवले होते. शेवटचा किलोमीटर त्याने एकटयाने पूर्ण केला. "इनेओस (Ineos) 1:59 चॅलेंज' असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते. ही मोहिम लंडनमधील बॅटरसी पार्क येथे आयोजित करण्याचे निर्धारीत करण्यात आले होते. अखेर स्थान बदलून व्हिएन्ना येथे घेण्यात आले. दोन मिनिटांच्या आता मॅरेथॉन पूर्ण करण्याचा हा दुसरा प्रयत्न होय. 2017 मध्ये इटलीतील मोन्झा येथे 34 वर्षीय किपचोगेने हा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी 26 सेकंदाने इतिहास हुकला होता. काही दिवसापूर्वीच किपचोगेने बर्लीन मॅरेथॉन जिंकली होती. या कामगिरीमुळे किपचोगेवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विश्‍वविक्रम नाकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने इतिहास घडला अशा शब्दात त्याचे अभिनंदन केले. 

'मला फार आनंद होत आहे. क्रीडा क्षेत्रात आणखी एक विक्रम करण्यासाठी मानवाला 65 वर्षे लागली. रॉजर बॅनीस्टर यांच्या विक्रमानंतर मी मॅरेथॉन दोन मिनिटांच्या आत धावून विक्रम केला, त्याचा आनंद आहे. यामुळे मानवाला कोणत्याही मर्यादा नाहीत, हे यावरून सिद्ध झाले. आजच्या कामगिरीनंतर अनेक धावपटू अशी कामगिरी करतील अशी अपेक्षा करतो', असे मत इलीयुड किपचोगे याने व्यक्त केले.

इलीयुडची शर्यती दरम्यान कामगिरी 
5 किमी. - 14 मि.10 सेकंद 
10 किमी - 28 मि.20 सेकंद 
15 किमी - 42 मि.34 सेकंद 
20 किमी - 56 मि.47 सेकंद 
21 किमी - 59मि.35 सेकंद 
25 किमी - 1 तास 10 मि.59 सेकंद 
30 किमी - 1तास 25 मि.11 सेकंद 
35 किमी - 1तास 39 मि. 23 सेकंद 
40 किमी - 1 तास 53मि.36 सेकंद 


​ ​

संबंधित बातम्या