पाच हजार मीटर शर्यतीत इद्रिस सलग दुसऱ्यांदा विजेता

नरेश शेळके
Wednesday, 2 October 2019

- दोन वर्षांपूर्वी लंडन येथे पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून मो फराहची जागतिक मैदानी स्पर्धेतील विजयी सांगता मोडीत काढणाऱ्या इथिओपियाच्या मुख्तार इद्रीसने सुवर्णपदक कायम ठेवण्यात यश मिळविले

- महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत केनियाच्या 28 वर्षीय बिट्रीस चेपकोएच चांगली सुरवात करूनही विश्वविक्रमापासून दूर राहिली

- पुरुषांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत नॉर्वेच्या कार्स्टन वारहोमने आपण येथे सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकाविले

- पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत भारताच्या अविनाश साबळेने नवीन राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठली.

दोहा - दोन वर्षांपूर्वी लंडन येथे पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून मो फराहची जागतिक मैदानी स्पर्धेतील विजयी सांगता मोडीत काढणाऱ्या इथिओपियाच्या मुख्तार इद्रीसने सुवर्णपदक कायम ठेवण्यात यश मिळविले. या शर्यतीत सलग दोन सुवर्णपदक जिंकणारा तो फराह आणि इस्माईल किरुईनंतर तिसरा धावपटू ठरला. नॉर्वेचा कार्स्टन वारहोम चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदाकाच मानकरी ठरला. 
वर्षभरातील कामगिरी पाहता पात्रता निकषाच्या आधारावर मुख्तार इद्रीसला येथे प्रवेश मिळू शकला नसता. मात्र, विद्यमान विजेता असल्याने त्याला वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आणि त्याने या संधीचे सोने केले. शर्यत प्रारंभ होताच 25 वर्षीय मुख्तारने आघाडी घेण्यास सुरुवात केली. काही फेऱ्यांनंतर त्याने सहकारी सेलेमोन बरेगा आणि तेलेहून बेकेलेला आघाडी घेण्याची संधी दिली. केनियन किंवा इतर आफ्रिकन धावपटूंना रोखून धरण्याची इथिओपियन धावपटूंची पारंपरिक पद्धत आहे. सहाशे मीटर शर्यत शिल्लक असताना नॉर्वेच्या 19 वर्षीय जेकब इंगेब्राईटसनने आघाडी घेऊन सर्वांना चकित केले होते. मात्र, मुख्तारने लंडनप्रमाणेच येथेही शेवटचे दीडशे मीटर अंतर शिल्लक असताना वेग वाढविला आणि आपल्या कारकिर्दीतील एक संघर्षपूर्ण शर्यत जिंकली. बरेगाला रौप्य तर कॅनडाचा राष्ट्रीय विक्रमवीर महम्मद अहमद ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. पाच हजार मीटरमध्ये केनियाने आतापर्यंत सात सुवर्णपदक जिंकली आहेत. मात्र, आजच्या अपयशामुळे सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा पदकाविना वंचित राहावे लागले. 

बिट्रीसचा विश्‍वविक्रमाचा प्रयत्न हुकला 
महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत केनियाच्या 28 वर्षीय बिट्रीस चेपकोएचने सुरुवातीचे एक किलोमीटर अंतर तीन मिनिटांच्या आत पूर्ण करून स्वतःचाच विश्वविक्रम मोडण्याचे तिने संकेत दिले होते. मात्र, नंतरच्या फेऱ्यात तिचा वेग मंदावल्याने ती विश्वविक्रमापासून दूर राहिली असली तरी तिने गेल्या स्पर्धेत अमेरिकेच्या इमा कोबर्नने नोंदविलेला स्पर्धा विक्रम जवळ-जवळ पाच सेकंदांनी मोडीत काढला. गेल्या स्पर्धेत बिट्रीसला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. इमाला येथे रौप्यपदक मिळाले. 

हलीमाने केले सर्वांना चकित 
दक्षिण आफ्रिकेची वादग्रस्त धावपटू कॅस्टर सेमेन्यामुळे महिलांची आठशे मीटर शर्यत सर्वांनाच परिचित झाली आहे. मात्र, तिच्यावरील बंदीमुळे नवीन विजेती ठरणार होती. त्यात गतस्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेत्या अमेरिकेच्या अजी विल्सनवर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, छोट्या चणीच्या युगांडाच्या हलीमा नकायीने सुवर्णपदक जिंकून सर्वांना चकित केले. यापूर्वी कधीही युगांडाच्या धावपटूंना पहिल्या आठमध्ये स्थान मिळविता आले नव्हते. 

हर्डल्समध्ये बेंजामीन, सांबाचे अपयश 
पुरुषांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू विन्सटन बेंजामीन यांचा मुलगा आणि येथे अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारा राय बेंजामीन, कतारचा आशियाई विजेता अब्दे रहमान सांबा यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल, अशी अपेक्षा होता. मात्र, नॉर्वेच्या कार्स्टन वारहोमने आपण येथे सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्यासाठी आलो आहोत, हे दाखवून दिले. रायला रौप्य तर सांबाला ब्रॉंझ मिळाले. 

राष्ट्रीय विक्रमासह  अविनाश अंतिम फेरीत 
पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत भारताच्या अविनाश साबळेने नवीन राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठली. मूळ बीड जिल्ह्यातील असलेला अविनाश इतर खेळाडूंच्या अडथळ्यामुळे शर्यतीदरम्यान दोनदा थांबला. त्यामुळे आघाडीचा जत्था 20-25 मीटर पुढे निघून गेला होता. तरीही त्याने शेवटी इतर आठ खेळाडूंना मागे टाकले आणि सातवे स्थान मिळविले. त्याने 8 मिनिटे 25.23 सेकंदाचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करताना स्वतःचाच पतियाळा येथे नोंदविलेला 8 मिनिटे 28.94 सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. अविनाशला झालेल्या अडथळ्याविषयी संघ व्यवस्थापनाने केलेली तक्रार मान्य करून तांत्रिक समितीने त्याला विशेष बाब म्हणून अंतिम फेरीत स्थान दिल्याची माहिती भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली. 

निकाल ः (पुरुष) ः 5000 मीटर ः मुख्तार इद्रीस (इथिओपिया, 12 मि.58.85 सेकंद), सेलेमोन बरेगा (इथिओपीया, 12 मि.59.70 सेकंद), महम्मद अहमद (कॅनडा, 13 मि.01.11 सेकंद), चारशे हर्डर्ल्स - कार्स्टन वारहोम (नॉर्वे, 47.42 सेकंद), राय बेंजामीन (अमेरिका, 47.66 सेकंद), अब्दे रहमान सांबा (कतार, 48.03 सेकंद). 
महिला ः तीन हजार स्टीपलचेस - बिट्रीस चेपकोएच (केनिया, 8 मि.57.84 सेकंद), इमा कोबर्न (अमेरिका, 9 मि.02.35 सेकंद), गेसा क्रुस (जर्मनी, 9 मि.03.30 सेकंद), 800 मीटर - हलीमा नकायी (युगांडा, 1 मि.58.04 सेकंद), रिवीन रॉजर्स (अमेरिका, 1 मि.58.18 सेकंद), अजी विल्सन (अमेरिका, 1 मि.58.84 सेकंद). 


​ ​

संबंधित बातम्या