कबड्डीतील कवित्व

ज्ञानेश भुरे
Sunday, 16 September 2018

जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत मैदानावर मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागल्यानंतर आतापर्यंत भारतीय कबड्डीतील कवित्व कायम आहे. कोर्टवर (मैदान) जेवढ्या घडामोडी घडल्या नाहीत तेवढ्या घडामोडी कोर्टात (न्यायालय) घडत आहेत.  भारतीय कबड्डीतील एकाधिकारशाहीची प्रथम पकड झाली. कबड्डी प्रशासनाला लॉबीत बसण्याची वेळ आली. म्हणजेच सध्या कारभार न्यायालय नियुक्त प्रशासक चालवत आहे. या एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठविणारी टीम आपल्या परीने डाव टाकत आहे; पण खेळाडू मात्र संभ्रामावस्थेत आहेत.

जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत मैदानावर मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागल्यानंतर आतापर्यंत भारतीय कबड्डीतील कवित्व कायम आहे. कोर्टवर (मैदान) जेवढ्या घडामोडी घडल्या नाहीत तेवढ्या घडामोडी कोर्टात (न्यायालय) घडत आहेत.  भारतीय कबड्डीतील एकाधिकारशाहीची प्रथम पकड झाली. कबड्डी प्रशासनाला लॉबीत बसण्याची वेळ आली. म्हणजेच सध्या कारभार न्यायालय नियुक्त प्रशासक चालवत आहे. या एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठविणारी टीम आपल्या परीने डाव टाकत आहे; पण खेळाडू मात्र संभ्रामावस्थेत आहेत.

भारतात क्रीडा संस्कृती अजिबात नाही. ती रातोरात रुजूदेखील शकणार नाही. जोवर सरकारचा खेळाकडे आणि संघटक, खेळाडूंचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तेव्हाच हे शक्‍य आहे. कबड्डीची चर्चा करताना हा उल्लेख मुद्दाम करण्याचे कारण म्हणजे कबड्डीची जी अवस्था आज झाली आहे, त्याला सर्वस्वी संघटना आणि नंतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या मक्तेदारीस खतपाणी घालणारे अन्य प्रशासक आणि खेळाडू जबाबदार आहेत. कबड्डी खेळाला इथपर्यंतची ओळख करून देण्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे; पण आता संघटना आणि संघ यात महाराष्ट्र कुठेच दिसत नाही. कबड्डी खेळाला सातासमुद्रापार नेण्याचे शिवधनुष्य सुरुवातीपासून महाराष्ट्रानेच उंचावले. बुवा साळवी यांच्या रूपाने कबड्डीला महान सेनापती लाभला होता. महाविद्यालयीन स्तरापर्यंत कबड्डी खेळताना आणि नंतर मैदानाबाहेरून कबड्डीचा आनंद घेताना बुवांचे काम जवळून पाहिले आहे. अगदी घरातून म्हटले तरी चालेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र केव्हाही कबड्डीचा विषय काढा बुवा भरभरून बोलायचे. वाढत्या वयातही त्यांचा झपाटा बघितल्यावर हा माणूस कबड्डी... कबड्डी... म्हणतच जन्माला आला असावा असे वाटायचे.

बुवाना त्या वेळी अनेकांनी साथ दिली. मदतीचे अनेक हात लाभले. राजकीय मदत होतीच; पण एक हात असा होता की, ज्याने कबड्डीपटूच्या रोजीरोटीचा प्रश्‍न मिटला. पाडगावकर... कबड्डी आणि खो-खो या अस्सल मराठमोठ्या खेळांचे अभ्यासक असणाऱ्या पाडगावकरांनी महाराष्ट्र बॅंकेत असताना खेळाडूंच्या नोकरीसाठी केलेला खटाटोप आजही विसरता येणार नाही. त्या काळातील म्हणजे सत्तरच्या दशकातील खेळाडूदेखील हे मान्य करतील. ही प्रेरणा पुढे अनेक खासगी संस्थानी घेतली आणि कबड्डीपटूंना नोकरीची दालने खुली झाली. हे सगळे घडत होते महाराष्ट्रात. कबड्डीचा खरा प्रसार केला महाराष्ट्राने... कबड्डी अंगाखांद्यावर खेळवून ती मोठी केली महाराष्ट्राने... बुवा साळवींसारखा कबड्डी महर्षी दिला महाराष्ट्राने... इतकेच नाही तर आज मॅटवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डीचे पहिले स्वप्न पाहिले आमच्या महाराष्ट्राच्या स्व. हरिभाऊ साने यांनी. साने यांनी त्या वेळी खांद्यावर ताडपत्री घेत मुंबई गाठली आणि कबड्डीचा सामना त्यावर खेळविण्याचा आग्रह धरला. कबड्डीला वलय मिळाले महाराष्ट्राच्या सदानंद शेट्ये, मधुसूदन पाटील, राजाराम पवार, वसंत सूद, अशोक कोंढरे अशा महाराष्ट्राच्या खेळाडूंमुळे. कबड्डीला ग्लॅमर लाभले ते शांताराम जाधवच्या खेळाने. अशा या सर्वांच्यामुळे कबड्डीला लळा लागला. 

...आणि मिळाली संजीवनी 
परदेश दौऱ्यापासून कबड्डी सातासमुद्रापार जायला सुरुवात झाली. पुढे आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला. आशियाई स्पर्धेतील पहिली चढाई, पहिला गुण भारतासाठी मिळविला तोदेखील महाराष्ट्राच्या अशोक शिंदे याने. सगळं काही सुरळीत सुरू होते. कबड्डीत भारत जिंकत होता. परदेशात हा खेळ अजून माणसाळला गेला नव्हता. कबड्डीचा प्रसार खुंटला असे वाटत असतानाच "प्रो-कबड्डी'चा उदय झाला. मृत्यूच्या शय्येवर पडलेल्या लक्ष्मणासाठी हनुमानाने संजीवनी वनस्पतीसाठी संपूर्ण डोंगरच आणावा, त्याप्रमाणे "प्रो-कबड्डी'चा डोंगर कबड्डीला संजीवनी देणारा ठरला. यामुळे कबड्डीला परदेशी खेळाडूंची नुसती ओळखच झाली नाही, तर परदेशात ती पसरू लागली. थेट प्रक्षेपणामुळे कबड्डी जगभरातील घराघरांत पोचली. चित्र बदलू लागले. भारतीय प्रशिक्षकांना मागणी वाढू लागली. परदेशी संघ कौशल्य आत्मसात करू लागले. कोरिया, इराणसारखे देश अग्रेसर राहिले. 2014च्या आशियाई स्पर्धेत भारताने इराणविरुद्ध दोन्ही सुवर्णपदके जिंकली; पण विजयाचे अंतर एका गुणाचे होते. तेव्हाच शंकेची पाल मनात चुकचुकली. भविष्यात भारताचे सुवर्णपदक धोक्‍यात आल्याची ती घंटा होती. ती कुणी ऐकलीच नाही किंवा ऐकूनही न ऐकल्यासारखी केले आणि मनातली भीती चार वर्षांत खरी ठरली. 

...तर ही वेळ आली नसती 
हे कधी ना कधी घडणारच होते. फक्त इतक्‍या लवकर घडेल असे वाटले नव्हते. याला सर्वस्वी संघटना आणि संघटनाच जबाबदार आहे यात कुणाचेच दुमत नसावे; पण त्याविषयी कोण बोलत नव्हतं. सुवर्णपदक मिळत होते तोपर्यंत सगळे चांगले होते; पण सुवर्णपदक हुकल्यावर सगळे तुटून पडले. जनार्दन सिंग गेहलोत यांच्या मक्तेदारीविषयी उघडपणे चर्चा होऊ लागली. यापूर्वी जकार्तातील पराभवानंतरही आज उघडपणे होणारी चर्चा त्या वेळी केली असती, तर हे घडलेच नसते. हे म्हणजे लहानपणी ऐकलेल्या गोष्टीसारखे झाले. एक मुलगा रोज बाहेरून काही ना काही चोरून आणायचा. आई लहान म्हणून त्याचे कौतुक करायची, पुढे त्याला सवय लागली. मोठा झाल्यावरही त्याची सवय गेली नाही आणि एक दिवस पोलिस त्याला पकडायला येतात. आई त्याला म्हणते तू चोऱ्या करतोस... मुलगा आईच्या जवळ जातो आणि कानाचा चावा घेतो आणि म्हणतो लहानपणी पहिल्यांदा न विचारता आणलेल्या वस्तूचे कौतुक केले नसते, तर आज ही वेळ आली नसती. तात्पर्य, काय तर जेव्हा कबड्डीतील भ्रष्टाचाराला सुरुवात झाली हे कळत होते तेव्हाच तो रोखला असता, तर आज ही वेळ आली नसती. आता तो इतका भिनलाय की तो रोखण्यासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागली. 

न्यायालयाने भारतीय कबड्डी महासंघावरील गेहलोतशाहीला ठेचून काढले आहे. महासंघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे; पण ही तेढ वेळीच सुटायला हवी. नाही तर "बीसीसीआय' आणि प्रशासक यांच्यातील अद्यापी सुरू असलेल्या लढाईप्रमाणे ती सुरू राहिली, तर तोपर्यंत आपण कबड्डीपासून दूर गेलेलो असू. मुळात हे सगळे न्यायालयाच्या बाहेरही घडू शकले असते; पण सगळ्यांचे हात दगडाखाली होते. आता बोटे चेपायला लागल्यावर सगळे बोलू लागलेत. संघ निवडीसाठी "प्रो-कबड्डी' लीग नाही, तर राष्ट्रीय स्पर्धा हाच निकष असायला हवा. "प्रो' ही व्यावसायिक कबड्डी झाली. आशियाई स्पर्धेतील कामगिरीने देशाची प्रतिमा उजळून निघत असते. त्यामुळे अशा स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धेतूनच संघ निवडायला हवा; पण आपले संघटक कबड्डी संघटना आहे हेच विसरून गेले आणि "प्रो'च्या आहारी गेले. 

मग आटापिटा कशासाठी? 
राष्ट्रीय स्पर्धांचा कार्यक्रमच विस्कळित करून टाकला. हे सगळे का घडले, याचा विचार करा. विचार केला असता तर आशियाई स्पर्धेसाठी निवडलेला संघ चुकीचा होता हे ठरवायला न्यायालयाचे पाऊल उचलावे लागले नसते. भले आशियाई स्पर्धेत खेळलेला संघ उद्या हरला, त्यातून काय साध्य होणार. संघ निवड चुकीची होती. ती कधीच सिद्ध झाली आहे; पण भारतीय खेळाडूंच्या नावावर जी काही पदके लागली आहेत ती तर कुणी काढून घेऊ शकत नाही. मग हा आटापिटा कशासाठी? प्रशासकांनी नव्याने घटना तयार करण्याची तत्परता दाखवून देशातील कबड्डी वाचवायला हवी. कबड्डी फक्त उत्तरेतील राज्ये खेळू शकतात हा भ्रम दूर करायची वेळ आली आहे आणि त्यासाठी पर्यायाने महाराष्ट्राने कंबर कसायची वेळ आली आहे. हे सगळे झटपट घडले नाही, तर कबड्डीचे आपले वैभव हॉकीप्रमाणे आपल्या हातून जाणार हे त्रिवार सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा.


​ ​

संबंधित बातम्या