सर्वोत्तम कामगिरीसह अंतिम फेरीचे उद्दिष्ट ः द्युती

वृत्तसंस्था
Sunday, 22 September 2019

-गेल्या स्पर्धेत द्युतीने साखळीत 12.07 सेकंद अशी वेळ दिली होती. मात्र, ती उपांत्य फेरीही गाठू शकली नव्हती. द्युतीने 11.26 सेकंद अशी वेळ देताना 100 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे

-आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणारी द्युती एकमेव भारतीय धावपटू आहे. तिने या वर्षी जुलै महिन्यात जागतिक विद्यापीठ स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

नवी दिल्ली - जागतिक मैदानी स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह अंतिम फेरी गाठण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे भारताची धावपटू द्युती चंद हिने सांगितले. 
जागतिक मैदानी स्पर्धेस दोहा येथे 27 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाटी द्युती सध्या दोहा येथेच सराव करत आहे. लंडन येथे 2017 मध्ये झालेल्या स्पर्धेत आलेले अपयश विसरून जाऊन या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे तिने सांगितले. 
स्पर्धेविषयी बोलताना द्युती म्हणाली, ""दोहा येथील स्पर्धेत माझी सर्वोत्तम कामगिरी होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या स्पर्धेत मी उपांत्य फेरी गाठू शकले नव्हते. या वेळी मात्र अंतिम फेरी गाठण्याच्या इराद्यानेच ट्रॅकवर उतरणार आहे. माझ्यासमोरील आव्हान सोपे नसले, तरी कठीणही नाही.'' 
गेल्या स्पर्धेत द्युतीने साखळीत 12.07 सेकंद अशी वेळ दिली होती. मात्र, ती उपांत्य फेरीही गाठू शकली नव्हती. द्युतीने 11.26 सेकंद अशी वेळ देताना 100 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती म्हणाली, ""सध्या मी रात्री 7 ते 8 या वेळेत सराव करत आहे. माझी रेस याच वेळेत होणार असल्यामुळे मी सारावासाठी ही वेळ निवडली. सराव चांगला झाला आहे, बघूयात स्पर्धेत काय घडते.'' 
आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणारी द्युती एकमेव भारतीय धावपटू आहे. तिने या वर्षी जुलै महिन्यात जागतिक विद्यापीठ स्पर्धेत ही कामगिरी केली होती. जागतिक स्पर्धेत तिची साखळीतील धाव 28 सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 
------------- 
जागतिक स्पर्धा ही या मोसमातील अखेरची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेतून ऑलिंपिकसाठीची 11.15 सेकंद ही पात्रता वेळ गाठू शकेन की नाही हे सांगता येत नाही. पण, प्रयत्न नक्की करेन. पात्रता वेळ माझ्यासाठीच नव्हे, तर अन्य धावपटूंसाठीदेखील आव्हानात्मक आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी मी पुढील वर्षी प्रयत्न करेन. 
- द्युती चंद, भारताची धावपटू 


​ ​

संबंधित बातम्या