नेमबाजी स्पर्धेत दुर्वा शिंदेला सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

दुर्वा शिंदे हिने 19 वर्षाखालील 10 मीटर ओपन साईट या क्रीडा प्रकारात आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत 400 पैकी 329 गुण मिळवून सुवर्णपदक पटकाविले. तसेच याच गटात आरपीडीची झोया मेहमुद रखांजी हिने 293 गुणांची कमाई करत कास्य पदकावर नाव कोरले.

सावंतवाडी - जिल्ह्यातील चार नेमबाजांनी विभागस्तरीय नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी आपली पात्रता सिध्द केली. यात येथील पंचम खेमराज महाविद्यालयाची दुर्वा शिंदे हिने 19 वर्षाखालील 10 मीटर ओपन साईट या क्रीडा प्रकारात 400 पैकी 329 गुण मिळवून सुवर्णपदक पटकाविले. 

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा विभागीय क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे विभागस्तरीय नेमबाजी स्पर्धेचे आयोजन 9 व 10 ला करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा या पाच जिल्ह्यातील नेमबाज सहभागी झाले होते.

ही स्पर्धा 10 मीटर ओपन साईट, 10 मीटर पीप साईट व 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली. यात मागील वर्षीची राष्ट्रीय नेमबाजीत रौप्यपदक विजेती खेळाडू दुर्वा शिंदे हिने 19 वर्षाखालील 10 मीटर ओपन साईट या क्रीडा प्रकारात आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत 400 पैकी 329 गुण मिळवून सुवर्णपदक पटकाविले. तसेच याच गटात आरपीडीची झोया मेहमुद रखांजी हिने 293 गुणांची कमाई करत कास्य पदकावर नाव कोरले. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात मिलाग्रीस हायस्कूलचा नववीमध्ये शिकणारा विद्यार्थी शार्दुल शिरसाट (बांदा) याने 400 पैकी 298 गुण मिळवून कास्य पदकाचा मानकरी ठरला. त्याचप्रमाणे 319 गुणांसह रौप्य पदक पटकाविले. 

उपरकर शुटिंग रेंजवर सराव 
सर्व खेळाडुंची निवड 23 ते 25 या कालावधीत कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. हे खेळाडू उपरकर शुटिंग रेंजवर नेमबाजीचा सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 


​ ​

संबंधित बातम्या