सचिनमुळे फेमस झालेला कोरोनाच्या जाळ्यात; बिचाऱ्याने नोकरीही गमावली!

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सारखाच हुबेहूब दिसणारा बलवीर चंद याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सारखाच हुबेहूब दिसणारा बलवीर चंद याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यासोबतच बलवीर चंदच्या कुटुंबातील इतर तिघांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. बलवीर चंद हा सचिन तेंडुलकरचा डुप्लिकेट म्हणून परिचित आहे. पंजाबमधील शहलोन या गावचा असलेल्या बलवीर चंदला, भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर सारखा दिसत असल्याने बरीच प्रसिद्धी मिळाली होती. 

'कोरबो लोरबो जीतबो रे..'साठी शाहरूख-गंभीरमध्ये हे ठरलं होतं तर...

सचिन तेंडुलकर सारखा दिसत असल्यामुळे बलवीर चंदने यापूर्वी अनेक जाहिरातींमध्ये सचिनचा डुप्लिकेट म्हणून काम केले आहे. तसेच या सोबत मुंबईतील एका फूड चेन कंपनीने बलवीर चंदला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बलवीर चंदला आपली ही नोकरी गमवावी लागली असून, त्याला आणि त्याच्या कटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. बलवीर चंदसह त्याची पत्नी, मुलगी आणि मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला बलवीर चंदवर आर्थिक संकटासोबतच कोरोनाचे संकट देखील कोसळले आहे. 

सचिन तेंडुलकरचा डुप्लिकेट म्हणून गेली २२ वर्षे आपली उपजीविका भागवणारा बलवीर चंद, मुंबईच्या विक्रोळी उपनगरात भाड्याने फ्लॅटमध्ये राहून आपली गुजराण करत असे. मात्र त्यानंतर नोकरी गेल्याने भाडे भरणे अवघड झाल्यामुळे बलवीर चंदने कुटुंबियांसोबत आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेल्वने प्रवास करून गावी पोहचल्यावर २१ जून रोजी डॉक्टरांनी ५० वर्षीय बलवीर चंदला कोरोना झाल्याचे सांगितले. 

आयपीएलला खो घालण्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने खेळला हा डाव

यासंदर्भात बोलताना बलवीर चंदने, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन मध्ये आपण ज्या फूड कंपनीत काम करत होतो त्यांनी व्यवसाय बंद झाल्यामुळे आपल्यासहीत अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या समोर कोणताच पर्याय नसल्याने गावी प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे बलवीर चंदने सांगत, प्रवासादरम्यान अधिकतर लोक कोरोनाबद्दल निष्काळजी असल्याचे म्हटले आहे. तर १९८९ मध्ये सचिन जेंव्हा पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यासाठी गेला होता, त्यावेळेस इतरांनी आपणाला सचिन सारखे दिसत असल्याचे सांगितल्याचे बलवीर चंदने सांगितले.                                       

 


​ ​

संबंधित बातम्या