दुबई बुद्धिबळ स्पर्धा : द्रविडने ग्रॅण्डमास्टरला रोखले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 April 2019

नागपूरच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने विजयी मोहिम कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदविला. महिला चेसमास्टर मृदूल डेहनकरनेही स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली

नागपूर, ता. 3 : नागपूरचा फिडेमास्टर शैलेश द्रविडने दुबई खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा ग्रॅण्डमास्टर व्ही. विष्णू प्रसन्नाला बरोबरीत रोखून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. नागपूरच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने विजयी मोहिम कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदविला. महिला चेसमास्टर मृदूल डेहनकरनेही स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. 

दुबई चेस ऍण्ड कल्चरल क्‍लबतर्फे सुरू असलेल्या स्पर्धेत 22 व्या पटावर शैलेशने ग्रॅण्डमास्टर व्ही. विष्णू प्रसन्नाविरुद्ध उत्कृष्ट संरक्षण व आक्रमकतेच्या जोरावर महत्त्वपूर्ण अर्धा गुण वसूल केला. दोन फेऱ्यांमध्ये दीड गुणांची कमाई करणाऱ्या शैलेशची लढत तिसऱ्या फेरीत भारताचा आणखी एक ग्रॅण्डमास्टर देबाशिष दासविरुद्ध होणार आहे. रौनकनेही (दोन गुण) आगेकूच कायम ठेवत भारताचा फिडेमास्टर एल. आर. श्रीहरीला पराभूत केले. तिसऱ्या फेरीत रौनकपुढे भारताचा ग्रॅण्डमास्टर एस. पी. सेथुरामणचे आव्हान राहील. 

भारतीय बुद्धिबळपटूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेणाऱ्या दिव्यानेही सलग दुसरा विजय मिळविताना भारताच्या ओ. टी. अनिलकुमारला पराभूत केले. तिसऱ्या फेरीत दिव्याची लढत उझबेकिस्तानचा ग्रॅण्डमास्टर अब्दुसत्तोरोव्ह नोदिरबेकविरुद्ध होईल. पहिल्या फेरीत पराभूत झालेल्या मृदुलनेही यशस्वी "कमबॅक' करीत दुसऱ्या फेरीत पॅलेस्टाईनच्या कार्मेल जलघुमला मात दिली. मृदूलचा तिसरा सामना भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. ऋत्विक राजाविरुद्ध होईल.


​ ​

संबंधित बातम्या