Pune Half Marathon :'फेक इंडियन'च्या देशात फिटनेस क्रेझ!

डॉ. कौस्तुभ राडकर
Wednesday, 11 December 2019

"तो आला-तो पोहला-तो धावला-त्याने सायकल चालविली-तो जिंकला' इतक्‍या सहजतेने मी ही "फिनिशिंग' केली. त्या वेळी 17 तासांचा कट-ऑफ असताना मी 11 तास 41 मिनिटांत ही कामगिरी केली. त्या वेळी माझे काही मित्र मला "फेक इंडियन' असे गमतीने म्हणाले.

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलो असताना 2007च्या अखेरीस मी "आयर्नमॅन' हा शब्द ऐकला. पोहणे, सायकलिंग आणि धावणे, असे तीन क्रीडाप्रकार त्यात होते. मी मूळचा जलतरणपटू आहे. तीन खेळांपैकी पोहणे हाच सर्वाधिक खडतर भाग, धावणे सरावाने जमते आणि सायकलिंग तुलनेने सर्वांत सोपे, अशी माहिती मला देण्यात आली. त्यामुळे मी म्हणालो, "चला, प्रयत्न तरी करून पाहूयात.' 2008 मध्ये मी ऍरीझोनातील स्पर्धेत भाग घेतला.

"तो आला-तो पोहला-तो धावला-त्याने सायकल चालविली-तो जिंकला' इतक्‍या सहजतेने मी ही "फिनिशिंग' केली. त्या वेळी 17 तासांचा कट-ऑफ असताना मी 11 तास 41 मिनिटांत ही कामगिरी केली. त्या वेळी माझे काही मित्र मला "फेक इंडियन' असे गमतीने म्हणाले. मुळात एक भारतीय त्यांच्यापेक्षा इतका "फास्ट' असू शकतो, यावर त्यांचा विश्‍वासच बसला नव्हता. तेव्हा मी दोन मॅरेथॉन पूर्ण केल्या होत्या. त्याचाही मला फायदा झाला.

त्यानंतर एक मालिकाच सुरू झाली. 2008 ते 2013 या कालावधीत सात, तर 2014 ते आत्तापर्यंत 17 अशा 11 वर्षांत 24 म्हणजे वर्षाला साधारण दोन "आयर्नमॅन' शर्यती मी पूर्ण केल्या आहेत.

2013 मध्ये पुण्यात परतल्यानंतर माझ्या लक्षात आले की, आपल्याकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचा अभाव आहे. त्यासाठी मी "रॅडस्ट्रॉंग'ची मुहूर्तमेढ रोवली. "फिट इंडिया'साठी माझ्या पातळीवर जे काही करता येईल त्यासाठी मी सक्रिय झालो. हे करताना मी यास चालना देणाऱ्या उपक्रमांतही भाग घेऊ लागलो. यातूनच मी "एपीजी रनिंग' आणि पर्यायाने समविचारी धावपटू विकास सिंग यांच्या संपर्कात आलो. गतवर्षी पहिल्या स्पर्धेने "पुणे हेल्थ डे'ची साद घातली. त्यात माझे अनेक ट्रेनी सहभागी झाले. त्यांच्याकडून मला जी माहिती मिळाली ती प्रभावित करणारी होती.

आता यंदा मी तीन पातळ्यांवर सहभागी आहे. मी कार्यकारी समितीत आहे. एक्‍सपर्ट कोच म्हणूनही मी मार्गदर्शन करतो आहे. याशिवाय "पेसिंग'ही करणार आहे. दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकता अशा महानगरांमध्ये मॅरेथॉन होत आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी बाहेरगावचे धावपटू येतात. त्यांचे या स्पर्धांशी जिवाभावाचे नाते निर्माण झाले आहे. "बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन'चाही असाच लौकिक निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या स्पर्धेचे जे "व्हिजन' आहे तसे फार थोड्या स्पर्धांचे आहे. त्यामुळे पहिल्याच वर्षी स्पर्धा यशस्वी झाली. येत्या तीन वर्षांत ही स्पर्धा मॅरेथॉनच्या नकाशावर येईल, असा विश्‍वास वाटतो.

आज एक वर्ग तंदुरुस्तीसाठी झटतो आहे. फिटनेसची क्रेझच निर्माण झाली आहे. ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला प्रशिक्षण मिळत नसले, तरी सुरुवातीला फरक पडत नाही. तुम्ही पुण्यातील कोणत्याही "रनिंग ग्रुप'मध्ये दाखल होऊ शकता. त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते. ज्या पुण्यात मी राहतो तेथे हे चित्र निर्माण होणे अत्यंत सुखद आहे. खास करून अमेरिकेत शिकताना जे अनुभव आले त्या पार्श्‍वभूमीवर मी भारावून गेलो आहे.

"रनिंग हब' म्हणूनही "पुणे' हे नक्कीच "उणे' नाही, हे म्हणताना छाती अभिमानाने फुलून येते. अशा स्पर्धांमुळे "फेक इंडियन' असे गमतीने का होईना; पण ऐकून घेण्याची वेळ कुणावर येणार नाही! त्या दिशेने पावले धावायला लागली आहेत. यात "एपीजी रनिंग' करीत असलेले कार्य स्वागतार्ह असून, त्यात मी काही भूमिका पार पाडणे विलक्षण समाधान देणारे आहे. येत्या 22 डिसेंबरला "बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन'चे दुसरे पुष्प गुंफले जाईल. त्या वेळी "फिट इंडिया' चळवळीला आणखी चालना मिळेल, हे नक्की!


​ ​

संबंधित बातम्या