शेवट काय तर; सगळं मुसळ केरात !

ज्ञानेश भुरे
Wednesday, 12 September 2018

भारतीय क्रिकेट चाहत्याला असं वाटणं सहाजिक होते. अर्थात, त्याला कारणही तसंच होतं. इंग्लंड संघ हा काही चौखुर उधळलेला घोडा नव्हता. त्यांना वेसण घालणं सहज शक्‍य होते. काय होतं या संघात. नाव घेण्यासारखे अनुभवी फलंदाज फक्त दोन..ऍलिस्टर कूक आणि ज्यो रुट, झटपट क्रिकेट अंगात भिनलेले जोस बटलर, जॉनी बेअरस्टॉ होते. म्हणायला त्यांच्याकडे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, आदिल रशिद, मोईन अली, बेन स्टोक्‍स, पदार्पण करणारा सॅम करन असे गोलंदाज होते. त्यामुळे ताकदीच्या तुलनेत कोहली सेना एक पाऊल पुढे होती असे म्हणायला जागा होती. आपण लढलो देखील. हरलो...पण, झुंजलो असे म्हणायला आपण मोकळे झालो. एक वेळ हे खरं देखील आहे. पण, शेवट काय झाला, सगळं मुसळ केरात ! 

घरच्या मैदानावर वारेमाप यश मिळविल्यावर भारतीय संघाचे परदेशातील दौऱ्यात कौशल्य पणाला लागणार हे सर्वश्रुत होते. त्यात यावर्षी मायदेशात आपण फार काही मालिका खेळणार नव्हतो. परदेशातील अधिक मालिका आपण या मोसमात खेळणार आहोत. कदाचित हे अपयश "बीसीसीआय'ला ठाऊक असावे. त्यामुळेच त्यांनी मध्येच वेस्ट इंडिजचा कार्यक्रम आखला. असो, हा वेगळा विषय झाला. सध्या आपण इंग्लंड दौऱ्याविषयीच बोलू. 

भारत आणि इंग्लंड संघांची तुलना करायची झाल्यास इंग्लंड हा संघ काही विजय मिळवेल असा नव्हता. उलट भारतीय संघ ताकदवान वाटत होता. विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्‍य रहाणे अशी कुठल्याही गोलंदाजांला दरारा वाटावा असे फलंदाज होते. गोलंदाज तर दृष्ट काढावे असे होते. आजपर्यंत पाहिलेली भारताची ही सर्वोत्तम अशी गोलंदाजांची फळी होती. कोण नव्हतं, भुवनेश्‍वर होता, महंमद शमी, इशांत शर्मा, जसप्रित बुमरा, उमेश यादव असा इंग्लंडच्या हवामानाला आपलेसं करणारे गोलंदाज होते. अश्‍विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीची साथ होती. हार्दिक पंड्या नावाचा चर्चेत राहिलेला अष्टपैलू होता. असे सगळे होते, पण, शेवट काय झाला. सगळं मुसळ केरात ! 

इंग्लंड दौऱ्यात भारतीय खेळाडूंनी प्रयत्न केले नाहीत, असे नाहीत. पहिला कसोटी सामन्यात जिंकणार असे वाटत असताना भारतीय संघाने पराभव ओढवून घेतला. दुसरा कसोटी सामना जिंकायच्या बेतात असतानाच हातातोंडाशी आलेला विजयाचा घास इंग्लंडने काढून घेतला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मुसंडी मारली. विजय मिळविला. मनाच्या एका कोपऱ्यात हायसं वाटलं. चला, फलंदाजांना सूर गवसला होता. गोलंदाज भरात होतेच. त्यांना आवश्‍यक होती फलंदाजीची साथ. तीच मिळत नव्हती. विराट कोहली एकटाच लढत होता. तिसऱ्या कसोटीत पुजाराला सूर गवसला, रहाणेने आशा दाखवली. म्हटलं, चला आता आत्मविश्‍वास मिळविलेला भारतीय संघ उर्वरित दोन्ही कसोटी सामने जिंकून आपण मालिका खिशात घालणार असं उगाच वाटायला लागलं होतं. 

भारतीय क्रिकेट चाहत्याला असं वाटणं सहाजिक होते. अर्थात, त्याला कारणही तसंच होतं. इंग्लंड संघ हा काही चौखुर उधळलेला घोडा नव्हता. त्यांना वेसण घालणं सहज शक्‍य होते. काय होतं या संघात. नाव घेण्यासारखे अनुभवी फलंदाज फक्त दोन..ऍलिस्टर कूक आणि ज्यो रुट, झटपट क्रिकेट अंगात भिनलेले जोस बटलर, जॉनी बेअरस्टॉ होते. म्हणायला त्यांच्याकडे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, आदिल रशिद, मोईन अली, बेन स्टोक्‍स, पदार्पण करणारा सॅम करन असे गोलंदाज होते. त्यामुळे ताकदीच्या तुलनेत कोहली सेना एक पाऊल पुढे होती असे म्हणायला जागा होती. आपण लढलो देखील. हरलो...पण, झुंजलो असे म्हणायला आपण मोकळे झालो. एक वेळ हे खरं देखील आहे. पण, शेवट काय झाला, सगळं मुसळ केरात ! 

या मालिकेच्या पराभवानं भारताला काही शिकवलं असेल, तर शहाणपणं. अर्थात, ते आलं तरं. भारतीय संघ मायदेशात वाघ असतो हे सांगायची गरज नाही. क्रिकेटचं गमभमन गिरवायला लागलेलं शेंबड पोरंही हे सांगेल. पण, परदेशात काय ? आपण पाहिलंच...इंग्लंड दौऱ्यात 4-1 असा पराभव पदरी पडला. भारताला या मालिकेनं सहाव्या, सातव्या क्रमांकावरील खेळाडूचं अर्थात अष्टपैलू खेळाडूचं महत्व पटवलं.

अष्टपैलू काय असतो, हे इंग्लंडच्या स्टोक्‍स, वोक्‍स, करन, मोईन यांनी दाखवून दिलं. शेवटपर्यंत फलंदाजी कशी करायची हे इंग्लंडनं या दौऱ्यात शिकवलं. अखेरच्या कसोटीत त्यांच्या गोलंदाजांनी सयंम आणि दम कसा टिकवायचा, तसेच धोरणी निर्णय कसे घ्यायचे हे शिकवलं. हातातील काम टाकून कूकची फलंदाजी बघावी इतकी ती देखणी कधीच नव्हती. देखणा होता तो त्याचा संयम. त्याचबरोबर एकेरी धावाचं महत्व या सामन्यात पटलं असावं. किती एकेरी धावा आपण द्याव्यात. या एकेरी धावांनी आव्हानाचा डोंगर कधी वाढला हेच भारताला कळलं नाही. दैनिकात कामं करताना शेवटी पाने लावण्याची वेळ येते, तेव्हा सिंगलच्या बातमीचं महत्व कळावं तसच भारताचं झाला. धावाफलक चौकार, षटकांरांनीच वाढतो असं नाही, तर त्यासाठी धावा पळायच्याही असतात, ही बेसिक शिकवणी घ्यायची वेळ आली आहे असे वाटते. त्यामुळेच 463 धावांचं आव्हान झालं. दडपण आलं आणि ते घ्यावं कोणी, तर विराट कोहलीनं. पाचव्या कसोटीपर्यंत एकांड्या शिलेदारासारखं लढणारा हा मोहरा शून्यावर परतला. पुजारानेही नांगी टाकली. धवनचं काय तर सांगायलाच नको. हात फक्त मिशीवर ताव मारायला आणि झेल घेतला की मांडी थोपटायला आहेत अशी अवस्था त्याची या दौऱ्यात झाली होती. लोकेश राहुल आणि रिषभ पंत लढले...आपल्यातील लढवय्या त्यांनी दाखवला. चहापानाच्या आसापास 34 षटकांत 173 धावा म्हणजे षटकामागे 5 धावांची गती. राहुल, पंत दोघे स्थिरावलेले होते. चेंडू फुटबॉलएवढा दिसत होता. एकदिवसीय सामन्याची सवय असलेल्या आजच्या तरुण पिढीला हे आव्हान अशक्‍य नव्हतं. जिंकणार नव्हतो...पण, थोडी आक्रमकता दाखवली असती, तर इंग्लंडचे गोलंदाजही गडबडले असते. कारण, एक तर दमटं हवेने ते थकले होते. ब्रॉड जखमी झाला होता. त्यामुळे नवा चेंडू घेण्याचं धाडस रुट दाखवत नव्हता. समोरच्यावर फक्त दबाव आणायचा होता. तेच जमलं नाही. इंग्लंडचेच खेळाडू ते क्रिकेट त्यांच्या रक्तात भिनलेलं. ही जोडी किती खेळेल...कधी तरी दमेल हे त्यांनी ताडलं होतं.

त्यामुळेच फिरकी मारा कायम ठेवला. त्यांची शक्‍यता खरी ठरली, राहुलची एकाग्रता भंगली, पंतही संयम गमावून बसला. रशिदच्या फिरकीने हे दोन्ही मोहरे टिपले. अर्धे काम सोपे झाले. रुटने लगेच नवा चेंडू घेतला. खरे, तर तळातील फलंदाज असताना नवा चेंडू घेत नाहीत. पण, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. त्यांना दिवसभर प्रतिक्षा असलेला विजय मिळवायचा होता. त्यांनी त्यांचे काम केले. पण, आपण काय केलं. राहुल आणि पंतने घेतलेले श्रम सगळे वाया दवडलं. शेवट एकच सगळं मुसळ केरात ! 


​ ​

संबंधित बातम्या