Asian Games : समाधान मानायचे की...उचल घ्यायची 

ज्ञानेश भुरे
Tuesday, 4 September 2018

आशियाई स्पर्धा आली की आपण पथकाच्या संख्येपासून चर्चेला सुरवात करतो. मोठ्या आकड्याचे पथक पाठवले म्हणजे आपली पदके वाढतात असे कधीच झालेले नाही. पथकातील खेळाडूंची संख्या आणि मिळविलेली पदके यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त राहिले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेचे रविवारी सूप वाजले. लोकसंख्येत आघाडीवर असणाऱ्या चीनने खेळाच्या मैदानावरही आपणच अव्वल आहोत हे 132 सुवर्णपदकांसह एकूण 289 पदके मिळवून दाखवून दिले.

लोकसंख्येच्या आघाडीवर चीन खालोखाल असणारा भारत देश मात्र 15 सुवर्णपदकांसह एकूण 69 पदके मिळवून आठव्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे चीन 1982 नवी दिल्ली आशियाई स्पर्धेपासून जाकार्ता 2018 आशियाई स्पर्धेपर्यंत पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तेव्हापासून त्यांच्या एकूण पदकांची संख्येत चढउतार झाले आहेत. पण, 1994 पासून इन्चॉन 2014 आणि जाकार्ता 2018 स्पर्धेत त्यांची सुवर्णपदके घटली. यानंतरही त्यांचे आघाडीचे स्थान मात्र कुणी हिसकावून घेऊ शकले नाहीत. चीनने आतापर्यंत 1487 सुवर्ण, 1020 रौप्य, 758 ब्रॉंझ अशी 3265 एकूण पदके मिळविली आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात जपानचाही एकूण पदकाचा आकडा तीन हजारच्या पुढे गेला आहे. दक्षिण कोरियाने दोन हजारचा टप्पा ओलांडला आहे. या तिघांनंतर सर्वाधिक 665 पदके भारताची आहेत. तरी आपण सहाव्या क्रमांकावर आहेत. इराण, कझाकस्तान या छोट्या देशांनी सुवर्णपदकांच्या शर्यतीत आपल्याला मागे टाकले आहे. जाकार्तातही हेच चित्र दिसून आले आहे. इंडोनेशिया, उझबेकिस्तान, इराण या देशांनी आपल्याला सोन्याच्या शर्यतीत मागे टाकले. 

पदकांच्या शर्यतीचा उल्लेख आलाच आहे तर या वर्षी बहारिनची प्रगती डोळ्यात भरण्यासारखी आहे. त्यांनी या वेळी 12 सुवर्णपदके मिळविली. गेल्या स्पर्धेपेक्षा त्यांनी सहा सुवर्णपदके अधिक मिळविली. यजमान इंडोनेशियाने 31 सुवर्णपदके मिळविताना आपली 1962 मधील 11 सुवर्णपदकांची सर्वोच्च कामगिरी मागे टाकली. किर्गिझस्तान, उझबेकिस्तान यांनीही आपली सुवर्णपदके वाढवली. आपण मात्र पहिल्या आशियाई स्पर्धेच्या 15 सुवर्णपदकाच्या कामगिरीशी बरोबरी केल्याचे समाधान मानत आहोत. जाकार्ता स्पर्धेतील आणखी एक विशेष म्हणजे जपानने डायव्हिंग प्रकारातील दहाच्या दहा सुवर्णपदके मिळविली. याच प्रकारात सहा रौप्यपदकेही त्यांच्या नावावर आहेत. आपण असे कुठे वर्चस्व राखले. कुठेच नाही...आपण इन्चॉनपेक्षा आपली पदके वाढली यावर समाधान मानत आहोत. सेनेक्‍स वाढावा असे आपण सांगत आहोत. आपली फक्त दोन पदके वाढली आहेत याचा कुणी विचारच करत नाही. 

आशियाई स्पर्धा आली की आपण पथकाच्या संख्येपासून चर्चेला सुरवात करतो. मोठ्या आकड्याचे पथक पाठवले म्हणजे आपली पदके वाढतात असे कधीच झालेले नाही. पथकातील खेळाडूंची संख्या आणि मिळविलेली पदके यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त राहिले आहे. त्याचबरोबर इतक्‍या मोठ्या पथकावर होणारा खर्च वेगळा. हा खर्च कमी म्हणून की काय सर्धेतील पदक विजेत्यांवर रोख पारितोषिकांची खैरात होते. हे चित्र अन्य देशात कधीच दिसून येत नाही. अगदी ऑलिंपिक स्पर्धेत इतिहास घडविला तरी असे घडत नाही. एक स्पर्धा संपली, की त्यांची पुढच्या स्पर्धेची तयारी सुरू होते. आधीच्या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंपैकी वेगळे खेळाडू पुढील स्पर्धेत दिसतात. तरी त्यांचे यश पूर्वीसारखेच असते हे महत्त्वाचे. हा सगळा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे भारतीय ऑलिंपिक संघटना, केंद्रिय क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा संघटना या सर्वांनी या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. 

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आपण जाकार्तातील भारतीय कामगिरीचा विचार केला, तर आपल्यालाही हे मुद्दे पटल्याशिवाय राहणार नाही. या अठराव्या आशियाई स्पर्धेसाठी पथक पाठविण्यासाठी चर्चेला सुरवात झाली, तेव्हा सुरवातीला आकडा दोन हजारावर होता. भारतीय ऑलिंपिक संघटनेने तो कमी करत नऊशेपर्यंत आणला. क्रीडा मंत्रालयाने काटछाट करत तो कसाबसा पाचशेपर्यंत आला. पण, असे करताना काही संघटना, काही खेळाडू दुखवले गेले. अशा दुखावलेल्या प्रत्येकाने न्यायालयाची पायरी चढली. न्यायालयीन लढाई जिंकत त्यांनी आशियाई स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला. काही प्रवेशिका ऐनवेळी आल्यामुळे संयोजकांनी त्या स्विकारल्या नाहीत. अन्यथा हा आकडा आणखी वाढला असता. मुळात आपल्याकडे क्रीडा संस्कृती नाही, ती आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर कशी हे आधी सांगा. लिअँडर पेसपासून आपल्याला प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत किमान एक पदक मिळायला लागले, तेव्हा कुठे भारतात अन्य खेळ खेळले जातात याकडे लक्ष जाऊ लागले. मग वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्‍वरी आली, नेमबाज राज्यवर्धनसिंह राठोड, अभिनव बिंद्रा, सुशील कुमार, मेरी कोम, योगेश्‍वर दत्त, साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू अशा खेळाडूंनी ऑलिंपिक पदके मिळविली. अन्य खेळांकडे लक्ष वाढू लागल्याचे हे उदाहरण होते. तरी आपण क्रिकेटच्या पुढे जात नाही आणि राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडूंनी मिळविलेल्या यशाकडे दुर्लक्ष करतो. या दोन्ही स्पर्धेत टेबल टेनिसपटूंनी मिळविलेल्या यशाचे व्हायला हवे तेवढे कौतुक झाले नाही. त्यामुळेच आशियाई स्पर्धेसाठी पथक पाठविताना संख्या वाढविण्यापेक्षा ज्या खेळात हमखास पदक आहे अशा खेळांची निवड करून खेळ किंवा सहभाग निश्‍चित करावा. तेव्हा कुठे पथक संख्या आणि पदक यातील फरक कमी होण्यास सुरवात होऊ शकेल. 

जाकार्तात काय झाले... हेच झाले. न्यायालयाची पायरी चढून गेलेल्या सर्व खेळात आपण पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकलो नाही. याला अपवाद रोईंगमधील वर्षा आणि श्‍वेताच्या यशाचा म्हणता येईल. कुराश, वुशू, पेनसॅक सिलट, सेपक टकरॉ, सॉफ्ट टेनिस, बोलिंग, स्पोर्ट क्‍लायबिंग हे आपले खेळच नाहीत. यांचा जीव केवढा आणि आपण त्यावर इतका खर्च का करतो. कुराश खेळात पदक मिळाले. पण, पुढे काय हा खेळ आपल्याकडे प्रगती करणार का ? त्याचे भविष्य काय ? मला विचाराल, तर ते शून्य आहे. मी या खेळातील पदक विजेत्यांना नाराज करत नाहीये. पण, आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही. असती, तर विजेंदरच्या ऑलिंपिक पदकानंतर बॉक्‍सिंगचा प्रसार झाला असता. काही अंशी तो झाला देखिल. पण, या प्रगतीत संघटकांच्या महत्वाकांक्षेची माशी शिंकली. बॉक्‍सिंग खेळ भारतात अखेरचा घटका मोजत होता.

अगदी अखेरच्या क्षणी तो तरून गेला. ही आपल्या देशातील खेळाची स्थिती आहे. त्यामुळेच आशियाई असो वा ऑलिंपिक स्पर्धा भारताला जी काही पदके मिळतात यात खेळाडूचा 95 टक्के वाटा असतो. अन्य पाच टक्के वाटा हा त्यांना मिळणाऱ्या सहकार्याचा असतो. पेस, बिंद्रा, राज्यवर्धन यांचे यश हेच दाखवून देते. देशात फारशा पायाभूत सुविधा किंवा प्रोत्साहन मिळत नसताना त्यांनी हे यश मिळविले आहे. आपल्या खेळाडूला पायाभूत सुविधा मिळण्यापासून झगडावे लागते. प्रशिक्षकांच्या नियुक्तीसाठी भांडावे लागते. याचे उदाहरण जाकार्तातील स्क्वॉश संघाचे देता येईल. स्क्वॉश संघातील खेळाडू या वेळी पूर्णवेळ प्रशिक्षकाशिवाय गेले होते. इथे मला अजून एक उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे जलतरण या क्रीडा प्रकाराचा. जलतरणात सर्वाधिक पदके असताना आपले खेळाडू तेथे दिसतच नाहीत. एखाद दुसरा कधी तरी पात्र ठरतो. मग, संघटक आणि सरकार यांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. जलतरणात आपले खेळाडू कशी प्रगती करतील यावर एकत्रित चर्चा होण्याची गरज आहे. जलतरणात आपला सहभाग वाढला, तर टप्प्या टप्प्याने आपली पदके वाढू शकतात या सकारात्मक विचाराने पावले उचलली जायला हवीत. 

ऍथलेटिक्‍स, नेमबाज, कुस्ती, बॅडमिंटन या खेळात आपल्याला अपेक्षित यश मिळाले. ऍथलेटिक्‍सने आपली सुवर्णपदकांची संख्या वाढवली. नेमबाजांनी पुन्हा एकदा आशा उंचावल्या. कुस्तीने आपण सुशील, साक्षीशिवाय पदक जिंकू शकतो हे दाखवून दिले. बॅडमिंटनमध्ये इतिहास घडला. पण, सुवर्णपदकाच्या लढतीत सिंधू पुन्हा एक पाऊल मागे राहिली याची खंत कायम राहिल. कबड्डीत हमखास असलेली सुवर्णपदके फाजील आत्मविश्‍वासाने गमावली. आतापर्यंत दोन सुवर्णपदके नक्की मानली जात होती. भविष्यात आता असे म्हणता येणार नाही. हे सत्य स्विकारून पुढे जाण्याची तयारी ठेवली, तर आपण प्रगती करू शकू. अन्यथा ही देखील सुवर्णपदके हातची जाणार यात शंका नाही. हॉकीत हेच झाले. पुरुष उपांत्य फेरीत गडबडले, महिला अंतिम फेरीपर्यंत पोचल्या. सुवर्णपदक दूरच राहिले. पदक गमावल्याचे काही नाही, ऑलिंपिक पात्रता कठिण झाली. आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. हा सगळा विचार करताना मन एका निष्कर्षावर येऊन थांबते तो म्हणजे आपल्याला क्रीडा मानसोपचारतज्ज्ञाची नितांत गरज आहे. सगळ्या सुविधा खेळाडूला मिळाल्या हव्यात. पण, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ ही काळाची गरज आहे आणि ती प्राधान्याने पूर्ण करणे आवश्‍यक आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा स्पर्धांतील यशा नंतर खेळाडूंना रोख पारितोषिके देण्याची प्रथा मोडायला हवी. खेळाडूंना आर्थिक मदत करू नये असे मला म्हणायचे नाही. पण, त्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम देण्यापेक्षा त्यांना आवश्‍यक त्या सुविधा मिळविण्यासाठी त्याचा थेट उपयोग केला जावा. नाही, तर पदक जिंकले म्हणून आता रोख पारितोषिकांची खैरात करायची आणि नवी आशियाई स्पर्धा आली की सरकारच्या मदतीची वाट बघायची. त्यामुळेच आधीच जर त्यांच्या सुविधांवर खर्च केला गेला, तर स्पर्धेच्या वेळी सरकारची मदत थोडी उशिरा आली, तरी त्याचा फटका बसणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडू पूजा (व्यक्ती पूजा) थांबली पाहिजे. आशियाई स्पर्धा ही देशाची स्पर्धा आहे. तेथे तुमच्या देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. खेळाडूंचे वैयक्तिक मानांकन महत्वाचे नाही. त्यामुळे अशा स्पर्धेत सहभागी होताना खेळाडूने राष्ट्रीय प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच उतरायला हवे. आपले खेळाडू वैयक्तिक प्रशिक्षक बरोबर घेऊन जाण्याचा हट्ट करतात. तो पुरवला देखिल जातो. मग, सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनी काय करायचे. प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक प्रशिक्षकांना मान्यता द्यायची झाली, तर सरकारच्या खर्चावर किती बोजा वाढणार आहे याचा विचार कोण करणार. काही खेळाडू आपल्या पालकांना घेऊन जाण्याचा आग्रह धरतात. हा वाद यापूर्वी झाला होता. या वेळी देखील तो होता होता वाचला. खेळाडूंच्या पालकांना भारतीय पथकात सामावून घेणे हे खूप झाले. सरकारने खेळाडूवर स्पर्धेच्यावेळी खर्च करणे समजू शकतो. पण, त्यांच्या पालकांचा किंवा वैयक्तिक प्रशिक्षकांचा खर्च का करायचा ? 

या सगळ्या गोष्टी एकामेकांशी जोडल्या गेल्या आहेत. शेवटी त्याचा संबंध भारतीय संघाच्या कामगिरीशी येतो. जाकार्तात आपाण 15 सुवर्णपदकांसह 69 पदके मिळविली. आता या यशावर फक्त समाधान मानायचे की एक पाऊल पुढे टाकून ही पदके आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा हे आपल्या हातात आहे. या यशाचा आणि अपयशाचा विचार करून प्रगतीसाठी योग्य निर्णय घ्यायचा आहे. शेवटी खेळ आपला, देश आपला, मर्जी ही आपलीच. 


​ ​

संबंधित बातम्या