पदकाच्या शर्यतीत भारतीय मल्ल राहणार आघाडीवर

दिनेश गुंड
Sunday, 19 August 2018

इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे कालच शानदार सोहळ्याने आशियाई स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. आता आजपासून प्रत्यक्ष स्पर्धांना सुरवात होईल. प्रत्येक खेळाडू देशासाठी पदक जिंकण्याकरता सर्वस्व पणाला लावून खेळतील. कुस्तीतील या पदकाच्या शर्यतीत या वेळी भारतीय मल्लदेखील आघाडीवर राहतील यात शंका नाही.

इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे कालच शानदार सोहळ्याने आशियाई स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. आता आजपासून प्रत्यक्ष स्पर्धांना सुरवात होईल. प्रत्येक खेळाडू देशासाठी पदक जिंकण्याकरता सर्वस्व पणाला लावून खेळतील. कुस्तीतील या पदकाच्या शर्यतीत या वेळी भारतीय मल्लदेखील आघाडीवर राहतील यात शंका नाही. स्पर्धेतील 57 ते 125 किलोंपासून सहाही वजनी गटात आपले मल्ल भारी पडतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेला अनुभव, सध्याची तयारी आणि आशियाई स्पर्धापूर्व मिळविलेली पदके यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास दुणावलेली आहे. 

आपला प्रत्येक मल्ल सर्वोत्तम कामगिरी करेल यात शंका नाही. संदीप तोमर (57 किलो)2016 आशियाई अजिंक्‍यपद आणि 2013, 2016 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मल्ल आहे. उत्तम दर्जाचा स्टॅमिना आणि खड्या स्थितीतील कुस्तीतून ताबा मिळविण्याचे अफलातून तंत्र अवगत असलेल्या संदीपसमोर मंगोलिया आणि इराणच्या मल्लांचे आव्हान राहील. त्यानंतर 65 किलो वजनी गटात बजरंग पुनिया याच्याकडून पदकाचा रंग बदलण्याची खूप मोठी आशा आहे. 2014 मध्ये हा रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मात्र या मल्लाने मागे वळून बघितलेले नाही. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना त्याने तीन सुवर्णपदके मिळविली आहेत. जबरदस्त आत्मविश्‍वासाने तो मॅटवर उतरेल. गुरू योगेश्‍वर दत्त यांना सुवर्णपदकाची भेट देण्यासाठी आतुर झालेल्या बजरंगसमोर इराण आणि जपानी मल्लाचे आव्हान असेल. 

भारताच्या सर्वाधिक नजरा असतील सुशील कुमार याच्यावर. डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील 74 किलो वजनी गटात खेळणार आहे. सध्या याच्याकडे फॉर्म नसला, तरी हा असा मल्ल आहे की ज्याचा फॉर्म केव्हाही येऊ शकतो. सुशीलला ऑलिंपिकच्या ब्रॉझ, रौप्यपदकाबरोबर 2006च्या आशियाई स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदक मिळविले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविलेले सुवर्णपदक त्याच्यासाठी प्रेरक ठरू शकते. सुशील सध्या फॉर्ममध्ये नसला, तरी अनुभवाच्या जोरावर महाबली सत्पालांचा हा पठ्ठा आशियाई स्पर्धेतील आपल्या पदकाचा रंग सोनेरी करण्यासाठी उत्सुक आहे. अर्थात, त्याच्यासमोर इराण, जपान, कझाकस्तान यांचे आव्हान असेल. 

याचबरोबर पवन कुमार, मौसम खत्री, सुनील कुमार यांचीदेखील कामगिरी कौतुकास्पद होईल. एकूणच इराण, मंगोलिया, कझाकिस्तान यांचे आव्हान असले, तरी भारतीय मल्ल या वेळी त्यांच्यासमोर ठामपणे उभे राहतील. भारतीय मल्ल 2014च्या आशियाई स्पर्धेतील कामगिरीपेक्षा सरस कामगिरी करतील यात शंका नाही. 

संबंधित बातम्या