जागतिक मैदानी स्पर्धा - दिनाने प्रथमच जिंकली दोनशे मीटरची शर्यत

नरेश शेळके
Friday, 4 October 2019

- जागतिक मैदानी स्पर्धेत दिनाने यात सुवर्णपदक जिंकून प्रथमच वरिष्ठ पातळीवरील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली

 - पाच महिन्यांपूर्वी येथेच आशियाई विजेतेपद मिळवून जागतिक स्पर्धेची पात्रता मिळविणाऱ्या पी. यू. चित्राला महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही

- हतोडाफेकीत दोघांना ब्रॉंझ 

दोहा - महिलांच्या दोनशे मीटर शर्यतीत प्रमुख खेळाडूंनी घेतलेली माघार ग्रेट ब्रिटनच्या दिना अशर स्मिथच्या चांगलीच पथ्यावर पडली. येथील खलिफा स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत दिनाने यात सुवर्णपदक जिंकून प्रथमच वरिष्ठ पातळीवरील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. 
शंभर मीटर शर्यतीतील विजेती शेली ऍन फ्रेझर-प्रिसे, ऑलिंपिक विजेती एलेन थॉम्पसन, गत दोन स्पर्धांतील विजेती नेदरलॅंडची डाफने शिफर्स, आयव्हरी कोस्टची मेरी जोस टा लू यांनी सहभागी न होण्याचा आणि बहामाच्या शॉन मिलर युबोने चारशे मीटरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्यावर दिनाच सुवर्णपदकाची दावेदार होती. यंदा हे मैदान तिच्यासाठी लकी ठरले आहे. कारण मे महिन्यात येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत तिने दोनशे मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. माजी ज्युनिअर विश्वविजेती असलेल्या 24 वर्षीय दिनाने सातव्या लेनमधून प्रारंभ केला आणि प्रतिस्पर्धी धावपटूंना संधीच दिली नाही. तिने 21.88 सेकंदात शर्यत पूर्ण करून नवीन ब्रिटिश विक्रमही प्रस्थापित केला. हे ग्रेट ब्रिटनचे दोनशे मीटरमधील पहिलेच सुवर्णपदक, तर एकूण दुसरे पदक होय. यापूर्वी 1983 च्या स्पर्धेत कॅथी कूकने ग्रेट ब्रिटनसाठी ब्रॉंझपदक जिंकले होते. अमेरिकेच्या ब्रिटनी ब्राऊनला रौप्य, तर स्वीत्झर्लंडच्या माजींगा कम्बुंदजीला ब्रॉंझपदक मिळाले. स्वीत्झर्लंडने प्रथमच या शर्यतीत पदक जिंकण्याची किमया केली. 

चित्राची मजल पहिल्या फेरीपर्यंतच 
पाच महिन्यांपूर्वी येथेच आशियाई विजेतेपद मिळवून जागतिक स्पर्धेची पात्रता मिळविणाऱ्या पी. यू. चित्राला महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. दोन वर्षांपूर्वी भुवनेश्वर येथेही आशियाई विजेतेपद मिळविणाऱ्या चित्राला प्राथमिक फेरीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ती उपांत्य फेरी गाठू शकली नसली तरी तिने नोंदविलेली 4 मिनिटे 11.10 सेकंद ही तिची आता वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ठरली. या स्पर्धेला तिला आशियाई विजेती म्हणून प्रवेश देण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने निवड होऊनही भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने तिची निवड केली नव्हती. शर्यतीपूर्वी तिचे प्रशिक्षक अमरीशकुमार यांनी विश्वास व्यक्त केला होता, की ती उपांत्य फेरी नक्की गाठेल. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. 

हतोडाफेकीत दोघांना ब्रॉंझ 
पुरुषांच्या हतोडाफेकीत हंगेरीच्या बेन्स हलास्झने पहिली फेक करताना त्याचा पाय रिंगच्या (सर्कल) बाहेर पडला होता. मात्र, पंचाच्या ही चूक लक्षात आली नाही, त्यामुळे त्याला फायदा मिळाला, अशी तक्रार पोलंडच्या वोसीच नोविस्कीने केल्यानंतर ज्युरी ऑफ अपीलने चौकशी केल्यावर ही तक्रार मान्य केली आणि दोघांना ब्रॉंझपदक देण्याचा निर्णय घेतला. कारण पहिल्या फेकीच्या वेळी नोंदविलेल्या अंतरामुळेच बेन्सला ब्रॉंझपदक मिळू शकले, अन्यथा वोसीच मानकरी राहिला असता. त्यामुळे दोघांना ब्रॉंझपदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

"सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्नपूर्ती झाल्यासारखे वाटत आहे. टोकियो ऑलिंपिकचा विचार केला तर आणखी एक वर्ष शिल्लक असून बरीच मेहनत करायची आहे. सुवर्णपदक जिंकल्याने मी स्टार झाले असे वाटत नाही, कारण मला सर्वोत्तम ऍथलिट व्हायचे आहे, त्यासाठी माझी तयारी सुरू आहे.' 

 

निकाल ः पुरुष - हतोडाफेक ः पॉवेल फाजदेक (पोलंड, 80.50 मीटर), क्वीन्टीन बिगोट (फ्रान्स, 78.19 मीटर), बेन्स हलास्झ (हंगेरी, 78.18 मीटर), वोसीच नोविस्की (पोलंड, 77.69 मीटर), 110 हर्डल्स - ग्रॅंट होलोवे (अमेरिका, 13.10 सेकंद), सेर्गेई शुभेनकोव्ह (एएनए, 13.15 सेकंद), पास्कल लाग्रादे (फ्रान्स, 13.18 सेकंद). 
महिला - 200 मीटर - दिना अशर-स्मिथ (ग्रेट ब्रिटन, 21.88 सेकंद), ब्रिटनी ब्राऊन (अमेरिका, 22.22 सेकंद), माजींगा कम्बुंदजी (स्वीत्झर्लंड, 22.51 सेकंद). 


​ ​

संबंधित बातम्या