तीन करंडक जिंकत ध्रुव मोहितेची घोडदौड कायम

मुकुंद पोतदार
Wednesday, 29 August 2018

 ऍमिओ करंडक राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील घोडदौड कायम ठेवत कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने तिसऱ्या फेरीत दोन विजयांसह तीन करंडक जिंकले. रविवारी पहिल्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविल्यानंतर त्याने दुसरी शर्यत जिंकली.

चेन्नई : ऍमिओ करंडक राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील घोडदौड कायम ठेवत कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने तिसऱ्या फेरीत दोन विजयांसह तीन करंडक जिंकले. रविवारी पहिल्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविल्यानंतर त्याने दुसरी शर्यत जिंकली.

मद्रास मोटर स्पोर्टस क्लबच्या ट्रॅकवर ध्रुवने शनिवारी पोल पोझीशन ते चेकर्ड फ्लॅग अशी सफाईदार कामगिरी नोंदविली होती. त्याने आठ शर्यतींत पाचवा विजय मिळविला. शनिवारच्या विजयामुळे रविवारी पहिल्या शर्यतीत रिव्हर्स ग्रीडनुसार त्याला आठव्या क्रमांकावरून सुरवात करावी लागली. ही शर्यत जिंकत बंगळूरच्या पदार्पण करणाऱ्या शुभोमॉय बालने ठसा उमटविला. दुसऱ्या क्रमांकावरून शर्यत सुरू करण्याचा फायदा उठवित त्याने आघाडी घेतली. बांगलादेशच्या अफ्फान सादात याने दुसरा क्रमांक मिळविला. ध्रुवला सिद्धार्थ मेहदीरत्ताने रोखले होते. त्यातच मागून जीत जाबाखचे त्याच्यावर दडपण होते. अशावेळी ध्रुवने संधीची वाट पाहात सहाव्या लॅपपर्यंत प्रतिक्षा केली. रिव्हर्स ग्रीडनंतर तिसरा क्रमांक मिळविणे ध्रुवसाठी बहुमोल ठरले. त्याचा प्रतिस्पर्धी सौरव तांत्रिक बिघाडामुळे शर्यत पूर्ण करू शकला नाही.

दुसऱ्या शर्यतीत ध्रुवची पोल पोझीशन नक्की होती. याचे कारण शुक्रवारी त्याने पात्रता फेरीत पहिल्या दोन क्रमांकाच्या वेळा नोंदविल्या होत्या. त्याच्यासमोर गुणतक्त्यातील प्रतिस्पर्धी ठाण्याच्या सौरव बंदोपाध्याय याचे आव्हान होते. सौरव दुसऱ्या क्रमांकावरून शर्यत सुरु करणार होता. अशावेळी ध्रुवने वेगवान, पण नियंत्रित सुरवात करीत सौरवचे पहिल्या आणि मग दुसऱ्या कॉर्नरलाही त्याला ओव्हरटेक करण्याचे मनसुबे हाणून पाडले. त्यानंतर लॅपगणिक आघाडी वाढवित ध्रुवने शर्यत जिंकली. सौरवला दुसरा क्रमांक मिळाला, शुभोमॉयने तिसऱ्या क्रमांकासह आणखी एक पोडीयम फिनीश नोंदविला.

ध्रुवने सांगितले की, आज पहिल्या शर्यतीत संधीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. आक्रमकतेच्या प्रयत्नात चूक करून चालणार नव्हते. प्रशिक्षक रायोमंड बानाजी यांनी मला मोलाचा सल्ला दिला होता. प्रत्येक शर्यत जिंकलीच पाहिजे असे नाही, तर पोडीयम फिनीश सुद्धा चालू शकतो. रिव्हर्स ग्रीडच्या शर्यती नेहमीच अटीतटीच्या होतात. त्यात आघाडीचे चित्र सतत बदलत असते.

फोक्सवॅगन मोटरस्पोर्टस इंडियाचे प्रमुख शिरीष विस्सा यांनी सांगितले की, तीन फेऱ्यांमधील चित्र पाहता नवोदीत ड्रायव्हर्स अनुभवी स्पर्धकांच्या तोडीची वेळ नोंदवित आहेत. चुरशीच्या शर्यतींमुळे ड्रायव्हर्सना रेसिंगचे धडे मिळत आहेत. पुढील फेरी ग्रेटर नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्कीटवर होणार आहे. तेथे ऍमिओ कार प्रथमच धावतील. त्यामुळे आम्ही उत्सुक आहोत.

सविस्तर निकाल –

तिसरी फेरी – दुसरी शर्यत – 1) शुभोमॉय गील (बंगळूर 15 मिनिटे 40.496 सेकंद), 2) अफ्फान सादात (बांगलादेश 15:41.536), 3) ध्रुव मोहिते (कोल्हापूर 15:41.784), 4) जीत जाबाख (हैदराबाद 15:44.491), 5) सिद्धार्थ मेहदीरत्ता (लखनौ 15:49.453), 6) अनमोल सिंग साहील (गाझियाबाद 15:49.946), 7) प्रतिक सोनावणे (पुणे 15:51.763), 8) एच. एम. तुहीद अन्वर (बांगलादेश 15:57.588), 9) राहुल थॉमस (चेन्नई 15:58.779), 10) अक्षय भिवशेट (गोवा 16:05.618), 11) अमेय दांडेकर (मुंबई 16:04.019), 12) जय संघार्जका (मुंबई 16:12.266), 13) अनुराजन वेलमुरुगन (चेन्नई 16:26.079), 14) जी. रेणुका (बंगळूर 16:30.633), 15) शिवानी पृथ्वी (दावणगेरे 16:31.126)

तिसरी फेरी – तिसरी शर्यत – 1) ध्रुव (15:38.206), 2) सौरव (15:45.963), 3) शुभोमॉय (15:48.007), 4) अफ्फान (15:49.499), 5) प्रतिक (15:50.801), 6) अनमोल (15:53.510), 7) जीत (15: 53.942), 8) सिद्धार्थ (15:56.866), 9) तुहिद (16:05.328), 10) अनुराजन (16:07.993), 11) अमेय (16:09.195), 12) अक्षय  

16:11.182), 13) रेणुका (16:27.371), 14) शिवानी (16:30.563), 15) संघार्जका (16:31.990), 16) आयुष टैनवाला (मुंबई 16:34.805).


​ ​

संबंधित बातम्या