...तोपर्यंत धोनीला निवृत्त होऊ देणार नाही; निवड समितीचे स्पष्टीकरण 

वृत्तसंस्था
Saturday, 31 August 2019

महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूला वगळण्याचा प्रश्‍नच येत नाही, ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी यष्टीरक्षणाचे सर्व पर्याय तपासण्यासाठी धोनीने आम्हाला संधी दिली आहे. झटपट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे भवितव्य सुरक्षित हाती असल्याची जाणीव होताच तो आपला निर्णय घेईल, अशी माहिती निवड समितीच्या सदस्याने दिली. 

नवी दिल्ली - महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूला वगळण्याचा प्रश्‍नच येत नाही, ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी यष्टीरक्षणाचे सर्व पर्याय तपासण्यासाठी धोनीने आम्हाला संधी दिली आहे. झटपट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे भवितव्य सुरक्षित हाती असल्याची जाणीव होताच तो आपला निर्णय घेईल, अशी माहिती निवड समितीच्या सदस्याने दिली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी धोनीचा समावेश करण्यात आला नाही त्यानंतर सर्वत्र पुन्हा त्याच्या निवृत्तीबाबतची चर्चा सुरु झाली. या संदर्भात बोलताना निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, धोनीबाबत प्रत्येक दिवशी काही ना काही चर्चा घडत असते आणि ती अफवा असल्याचे नंतर स्पष्ट होते. धोनी हा संघहित जपणारा खेळाडू आहे आणि तो अशा अफवांना उत्तर देत नाही. 

धोनीला वगळण्याचा प्रश्‍नच येत नाही. वास्तविक पहाता त्याने पुढील ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी सर्व पर्यायांची चाचणी घेण्यासाठी वेळ दिला आहे. मर्यादित षटकांच्या खेळात रिषभ पंत जर जखमी झाला तर आम्हाला अजून ठोस पर्याय सापडलेला नाही. त्यामुळे धोनी अजून एका बाजुला उभा राहिला आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी त्याने कोणत्या कारणासाठी दोन महिन्यांची सुट्टी घेतली होते ते सर्वांनाच माहित आहे, असे निवड समितीच्या सदस्याने सांगितले. 

इंग्लंडमधील विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर धोनीबरोबर कोणती चर्चा झाली का? या प्रश्‍नावर निवड समितीचा हा सदस्य म्हणाला, आम्ही त्याच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही किंवा पुढील रोडमॅपबाबतही बोलणे झालेले नाही. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी ऐनवेळी पंत जखमी झाला तर ऐनवेळी काय करायचे यासाठी तयारी करण्यासाठी धोनीने आम्हाला वेळ दिला आहे तो पर्यंत तो स्वतः सदैव तयार असेल. 

धोनीची उपयुक्तता संघ व्यवस्थापनालाही माहित आहे. अखेरच्या षटकांसाठी अजूनही आपल्याकडे सर्वोत्तम फिनिशर नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दडपण किती असते हे खेळाडूच जाणू शकतात. विश्‍वकरंडक स्पर्धेत काही सामन्यात सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर धोनीने डाव सावरला होता. उपांत्य फेरीतही त्याने टीम इंडियाचे जहाज किनाऱ्यावर जवळपास नेले होते, पण दूर्दैवाने तो धावचीत झाला, अशीही पुष्टी जोडण्यात आली. 

असा आहे धोनी 
350 एकदिवसीय आणि 98 ट्‌वेन्टी-20 सामने अशी कारकिर्द असलेल्या धोनीने इतके सामने जिंकून दिले आहेत की त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी तेवढे सामने आयुष्यात पाहिले नसतील, त्यामुळे धोनी आता रिषभ पंत यानंतर अजूनही आम्हाला पर्याय सापडलेली नाही हे सत्य आहे, असे निवड समितीच्या या सदस्याने ठामपणे सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या