माणदेश मॅरेथॉन स्पर्धेत औरंगाबादचा धनवंत रामसिंग, पुण्याची नयन किरदक विजेते

आयाज मुल्ला/फिराेज तांबाेळी
Monday, 2 December 2019

माणदेश हाफ मॅरेथाॅन स्पर्धेव्यतरिक्त दोन किलोमीटर व पाच किलोमीटर अंतराच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

वडूज/ गाेंदवले : माणदेश मॅरेथॉन 21 किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात धनवंत रामसिंग (औरंगाबाद) तर महिलांच्या गटात नयन किरदक (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वडूज रनर्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोंदवले (ता. माण) येथून या स्पर्धेला सुरवात होऊन त्याचा समारोप येथे झाला. स्पर्धेतील 21 किलोमीटर अंतरासाठी झालेल्या स्पर्धेत विविध वयोगटांतील सुमारे एक हजार स्त्री-पुरुष स्पर्धक सहभागी झाले होते.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
पुरुष गटात झालेल्या या स्पर्धेत धनवंत रामसिंग याने एक तास 11 मिनिटे सहा सेकंदात हे अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. अदिनाथ भोसले (सातारा) याने एक तास 13 मिनिटे 28 सेकंदात अंतर पूर्ण करून द्वितीय, बाळू पुकळे (पुकळेवाडी) याने एक तास 13 मिनिटे 32 सेकंदात हे अंतर पूर्ण करून तृतीय क्रमांक मिळविला.

महिला गटात नयन किरदकने एक तास 38 मिनिटे दोन सेकंदात अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. स्मिता शिंदेने दोन तास 35 सेकंदात अंतर पूर्ण करून दूसरा, शैलजा पाटणकरने दोन तास दोन मिनिटे 44 सेकंदात अंतर पूर्ण करून तृतीय क्रमांक मिळविला.
 
याशिवाय दोन किलोमीटर व पाच किलोमीटर अंतराच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. यशस्वितांना ऑलिंपिक धावपटू ललिता बाबर-भोसले, उद्योग मंत्रालयाचे उपसचिव नामदेव भोसले, अनुराधा देशमुख, वडूज रनर्स फाउंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह तसेच काठी अन्‌ घोंगडं देऊन गौरविण्यात आले. 

गोंदवल्यातून प्रारंभ 

गोंदवले : पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात वॉर्मअप होताच जल्लोषी संगीताच्या तालावर आबालवृद्धांचा झुंबा डान्स सुरू झाला...पारंपरिक गजीनृत्याची झलक होताच हलगीच्या कडकडाटात मान्यवरांनी झेंडा दाखवताच पाणी आणि आरोग्याच्या संवर्धनासाठी माणदेश धावला.
रनर्स फाउंडेशन आयोजित पहिल्या माणदेश मॅरेथॉन आज (रविवार) पहाटे सहा वाजता सुरू झाली. येथील श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळेच्या पटांगणात पहाटे सव्वापाच वाजता राष्ट्रगीताने या स्पर्धेच्या कार्यक्रमाला सुरवात झाली.

त्यानंतर माणदेशी लोककला म्हणून देशभर नावाजलेल्या गजीनृत्याची झलक कलाकारांनी सादर केली. 
प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, रनर्स फाउंडेशनचे डॉ. संदेश गलंडे व मान्यवरांनी झेंडा दाखवताच स्पर्धकांनी धावण्यास सुरवात केली. यावेळी डॉ. महेश काटकर, डॉ. अजित इनामदार, डॉ. प्रदीप पालवे, डॉ. भारती पोळ, डॉ. बी. जे. काटकर, डॉ. एस. डी. कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, लक्ष्मण कोडलकर, डॉ. संजय डोंबे, दिलीप पोळ, विनीत कुलकर्णी, डॉ. संदीप पोळ, डॉ. मनोज काटकर, डॉ. नीलिमा बोराटे, पोलिस पाटील संघटनेचे महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


​ ​

संबंधित बातम्या