भारतीय कबड्डीतील गेहलोतांची घराणेशाही संपुष्टात 

वृत्तसंस्था
Friday, 3 August 2018

मुंबई : भारतीय कबड्डीतील गेल्या जवळपास तीन दशकांच्या गेहलोतशाहीला अखेर न्यायालयानेच धक्का दिला. भारतीय कबड्डीवर आपल्याच घराण्याची हुकूमत राहावी म्हणून सर्वकाही केलेल्या गेहलोत यांच्या पत्नीची निवड दिल्ली उच्च न्यायालयाने अवैध ठरवली. त्याचबरोबर भारतीय कबड्डी महासंघाच्या गेल्या दोन निवडणुका अवैध ठरवत महासंघावर प्रशासकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय झाला. 

मुंबई : भारतीय कबड्डीतील गेल्या जवळपास तीन दशकांच्या गेहलोतशाहीला अखेर न्यायालयानेच धक्का दिला. भारतीय कबड्डीवर आपल्याच घराण्याची हुकूमत राहावी म्हणून सर्वकाही केलेल्या गेहलोत यांच्या पत्नीची निवड दिल्ली उच्च न्यायालयाने अवैध ठरवली. त्याचबरोबर भारतीय कबड्डी महासंघाच्या गेल्या दोन निवडणुका अवैध ठरवत महासंघावर प्रशासकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय झाला. 

दिल्लीतील नामवंत कबड्डीपटू अर्जुन पुरस्कार विजेते महिपाल सिंग यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय कबड्डीतील घराणेशाहीस दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना जनार्दनसिंग गेहलोत यांनी आपली पत्नी मृदुल भादुरिया यांच्याकडे अध्यक्षपद सोपवले होते. एवढेच नव्हे तर राजस्थान कबड्डी संघटनेचे अध्यक्षपद सोडताना गेहलोत यांनी आपला मुलगा तेजस्विनी सिंग यांच्याकडे सूत्रे सोपवली होती. 1984 मध्ये गेहलोत यांची अध्यक्षपदी नियुक्ती, त्यानंतर एकही निवडणूक न होता 2013 पर्यंत अध्यक्षपदावर कायम असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता. 

भारतीय कबड्डीत गेहलोतशाहीविरुद्ध छुपा राग होता; मात्र त्यांना आव्हान देण्याची कोणीही तयारी दाखवत नव्हते. अखेर महिपाल यांनी हे आव्हान स्वीकारत दिल्ली न्यायालयात याचिका सादर केली होती. त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारला प्रमुख प्रतिवादीही केले होते. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यकारी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी ऐतिहासिक निर्णय देताना भादुरिया यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत देण्यात आलेले भत्तेही परत करण्याची सूचना करण्यात आली आहे. भादुरिया अध्यक्ष होतानाच गेहलोत आजीवन अध्यक्ष झाले होते. त्यांची निवडही रद्द करण्यात आली आहे, असे महिपाल यांचे वकील भारत नागर यांनी सांगितले. 

दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कबड्डी महासंघावर तातडीने प्रशासकांचीही नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 2013 तसेच 2017 ची भारतीय कबड्डी महासंघाची निवडणूकही रद्द ठरवली आहे. त्याचबरोबर जिल्हा, राज्य संघटनांची सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतीय कबड्डी महासंघाचा कारभार प्रशासकच पाहतील, असेही निर्णयात म्हटले असल्याचे नागर यांनी सांगितले. 

भारतीय कबड्डीतील गेहलोत यांची हुकूमशाही संपवण्यासाठी लढणाऱ्यांचा आज विजय झाला आहे. सर्व निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार असल्यामुळे आता कबड्डीत स्वच्छ प्रशासन येण्यास मदतच होणार आहे. 
- एम. व्ही. प्रसाद बाबू, न्यू कबड्डी फेडरेशनचे सचिव 

आजचा दिवस नक्कीच अविस्मरणीय आहे. पाच वर्षे लढताना अनेकांची साथ लाभली, त्यांचा ऋणी आहे. कबड्डीवरील प्रेमाखातर अनेकांची मदत लाभली. कबड्डी हाच आम्हाला एकत्र जोडणारा दुवा होता. अनेकांच्या शुभेच्छांमुळेच ही लढाई जिंकू शकलो. 
- महिपाल

संबंधित बातम्या