'या' क्रिकेट स्पर्धेतून मैदानात उतरणार डिविलियर्स   

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने (सीएसए) देखील स्थानिक पातळीवर 3 टी स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची घोषणा केली आहे.

कोरोना विषाणूच्या महामारीमूळे जगभरात क्रीडा क्षेत्राची वाताहत झालेली आहे. त्यानंतर आता कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून नवीन नियमांची अंमलबजावणी करत, क्रीडा क्षेत्र हळूहळू सुरु होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील या महिन्यापासून पुन्हा चालू होणार आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यामध्ये या महिन्यातील 8 तारखेपासून कसोटी मालिकेस सुरवात होणार आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने (सीएसए) देखील स्थानिक पातळीवर 3 टी स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची घोषणा केली आहे. 18 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला या दिवशी 'एकता कप' स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. 

ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट वर कोरोनाचे सावट 

कोरोनाच्या काळानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने नियोजित केलेल्या या 3 टी स्पर्धेत तीन संघ सामील होणार आहेत. आणि या प्रत्येकी संघात 8 खेळाडू भाग घेणार आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू ए बी डिविलियर्स देखील खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी मागील महिन्यातील  26 जूनला दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने क्रिकेट मंडळाला खेळाडूंच्या सरावासाठी परवानगी दिली होती. त्यानंतरच सोमवारी 29 जून पासून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी सरावास सुरवात केली होती. 

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण : डी सिल्वाची कसून चौकशी, आता उपुल थरंगाचा नंबर ?   

18 जुलै रोजी खेळवण्यात येणाऱ्या 3 टी स्पर्धेसाठी ईगल्स, किंगफिशर्स आणि काईट्स असे तीन संघ असणार आहेत. ज्यामध्ये ईगल्स संघाचे नेतृत्व ए बी डिविलियर्स करणार आहे. आयडन मार्करम, लुंगी नगिदी, एंडिले फेहलुकवायो, रासी व्हॅन डर ड्यूसे, जूनियर डाला, कायली व्हेरिन आणि सिसंदा मॅगाला हे खेळाडू  ईगल्स संघात असणार आहेत. तर कगिसो रबाडा हा किंगफिशर्स संघाचा कर्णधार असून, फाफ डू प्लेसिस, ख्रिस मॉरिस, तबरेज शमसी, रीजा हेंड्रिक्स, जनेमन मालन, हेन्रिक क्लासन आणि ग्लेनटन स्टेरमन या खेळाडूंचा किंगफिशर्स संघात समावेश असेल. याव्यतिरिक्त क्विंटन डिकॉक हा काईट्स संघाचे प्रतिनिधित्व करणार असून, डेव्हिड मिलर, तेनबा बावमा, एरिक नोर्खिया, ड्वेन प्रेटोरियस, बुरेन हेंड्रिक्स, जे जे स्मट्स आणि लुथो सिम्पला हे खेळाडू काईट्सच्या संघातून खेळणार आहेत.     

 


​ ​

संबंधित बातम्या