#ThisDayThatYear : चेतनचा यॉर्कर चुकला, मियाँदादला फुलटॉस पडला, षटकार बसला

मुकुंद पोतदार
Thursday, 18 April 2019

भारतीय एकत्र येऊन डावपेच आखण्याविषयी उत्तेजीत होऊन चर्चा करीत होते. शेवटच्या चेंडूवर चौकार अनिवार्य अशा समीकरणासह सारा मुकाबला निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला होता. अशावेळी मी माझे स्वतःचे डावपेच आखले.

भारतीय एकत्र येऊन डावपेच आखण्याविषयी उत्तेजीत होऊन चर्चा करीत होते. शेवटच्या चेंडूवर चौकार अनिवार्य अशा समीकरणासह सारा मुकाबला निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला होता. अशावेळी मी माझे स्वतःचे डावपेच आखले. शर्मा यॉर्कर टाकणार आणि माझ्या पायाचा वेध घ्यायचा प्रयत्न करणार हे मला पक्के माहित होते. त्यामुळे मी बॅटींग क्रीझच्या बरेच पुढे थांबायचे ठरविले. माझा प्लॅन असा होता की थोडे मागे झुकायचे, शॉट मारण्यास जागा करायची आणि सर्व शक्ती पणास लावायची.

हा शॉट उत्तुंग असणार होता. 113 चेंडूंना सामोरे जाताना मी 110 धावा केल्या होत्या. मला चेंडू अगदी चांगला दिसत होता. चेंडू बॅटवर बसला तर तो सीमापार झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास मला वाटत होता. मी पुन्हा एकदा फिल्डर्सची पहाणी केली. प्रत्येक फिल्डर नेमका कुठे उभा आहे मला पक्के माहित होते, पण तिरीही मी सर्वत्र एक नजर फिरवित एक-एक करून फिल्डर मोजले. मला संधी किंचीतशी सुद्धा दवडू द्यायची नव्हती. मी थोडा वेळ घेतला, भावनांवर नियंत्रण मिळविले, मग मी स्टान्समध्ये स्थिरावलो आणि प्रार्थना म्हटली.

बिचारा चेतन शर्मा. त्याने यॉर्करच टाकायचा प्रयत्न केला असे ते म्हणतात, पण चेंडू त्याच्या हातून निसटला. किंवा कदाचीत खरी गोष्ट अशी होती की मी बॅटींग क्रीझच्या बराच पुढे होतो, त्यामुळे त्याची लेंथच चुकली. तो चेंडू कसा पडला याचे गुढ काहीही असूदे, शेवटी तो माझ्यासाठी आणि पाकिस्तानसाठी योग्य उंचीवरील फुल-टॉस ठरला. थोडासा लेग साईडला पडलेला हा चेंडू टोलविण्यासाठी मला फक्त बॅट फिरवायची होती आणि तो चेंडू मैदानाबाहेर गेला.

त्यानंतर एकच गलका झाला. आम्ही जिंकलो होतो, पाकिस्तान जिंकले होते, तौसिफ जिंकला होता, मी जिंकलो होतो. काय जबरदस्त मॅच झाली ! माझ्या आयुष्यातील हा सर्वांत संस्मरणीय क्षण आहे.

जिगरबाज हे विलक्षण सर्वार्थाने चपखल बसेल असा पाकिस्तानचा फलंदाज जावेद मियाँदाद याने त्याच्या आत्मचरित्रात हे वर्णन केले आहे. Cutting Edge : My Autobiography मधील हे उतारे आहेत. 18 एप्रिल 1986 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शारजामध्ये ऑस्ट्रेलियाशिया कपसाठी फायनल झाली. त्यातील निर्णायक क्षणाचा आज वर्धापनदीन आहे. यात मियाँदाद ज्याच्या हिरो ठरला व जो झिरो झाला त्या चेतन शर्माची प्रतिक्रिया ऐकून मग फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात.

बदनामी में भी नाम : चेतन

चेतन शर्माने याविषयी एका मुलाखतीत म्हटले होते की, जो कुणी मला पहिल्यांदा भेटतो त्याचा पहिला प्रश्न मियाँदादने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराविषयी असतो. असे नेहमीच घडत राहते. आता मी याची मजा लुटायला लागलोय. मी सलामोलन करीत असलो तरी जणू काही हे अलिकडेच घडले असावे अशा पद्धतीने मला याची आठवण करून दिली जाते. मला हे विसरून जायचे आहे, पण लोक मला तसे करू देत नाहीत, कारण ते सारखे विचारत राहतात. त्यामुळे माझा नाईलाज होतो. ममी मियाँदादला यॉर्क करण्याचा कसून प्रयत्न केला, मला त्याला मारण्यास सोपा चेंडू द्यायचा नव्हता, पण अखेरीस तो फुलटॉस पडला. तो सर्वोत्तम फलंदाज आहे आणि त्याने चेंडू सीमारेषेच्या पलिकडे टोलविला. देवाने मला अशा पद्धतीने फेमस करायचे ठरविले. बदनामी में भी नाम है

आज 33 वर्षांनी या प्रसंगाला उजाळा द्यायचे झाले तर शेवटच्या चेंडूवर चौकार हवा असताना षटकार गेला आणि त्यातही पाकिस्तानी फलंदाजाने भारतीय गोलंदाजाच्या बाबतीत हे केले. त्यामुळे जखमेवर किती मीठ चोळले गेले असेल याची नुसती कल्पना केली तरी बास आहे. मुख्य म्हणजे तेव्हा झटपट क्रिकेटमधील हाणामारी हास्यास्पद बनावी इतकी टोकाची व्हायची नाही.

त्या चेंडूवर षटकाराऐवजी चौकार गेला असता तर थोडे मीठ कमी चोळले गेले असते, पण यातना व्हायच्या त्या झाल्याच असत्या. ज्यांनी तो क्षण टीव्हीवर पाहिला त्यांना हे पटल्याशिवाय राहणार नाही. 246 धावांच्या आव्हानासमोर पाकने 9 बाद 242 धावा केल्या होत्या. शेवटचा चेंडू राहिला होता, शेवटची जोडी मैदानात होती. चौकार अनिवार्य होता. अशावेळी मियाँदादने षटकार खेचला. चेंडू पडून मियाँदादची बॅट फिरताच छोट्या चणीच्या  चेतनची मान फॉलो थ्रूमध्येच बरीच उंच गेली होती, क्षणार्धात टीव्हीवरील फ्रेम हलली. कॅमेऱ्याने चेंडू प्रेक्षकांत जाऊन षटकार पडल्याचे टिपले. मियाँदाद आणि तौसिफ अहमद एका हातातील बॅट वर करून आणि दुसरा हातही उंचावत जबरदस्त जल्लोष करीत जोरजोरात धावू लागले. तोपर्यंत अतीउत्साही प्रेक्षकांनी मैदानावर धाव घेतली होती.

त्या सामन्यानंतर भारतीय खेळाडू जवळपास तासभर ड्रेसिंग रूममध्ये तसेच बसून होते. त्यांना काही सूचत नव्हते. इकडे भारतीय क्रिकेटप्रेमींची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. ते बराच वेळ टीव्हीसमोरून उठले नव्हते. 

भारतासाठी ही हार मानहानीकारक ठरण्याचे कारण म्हणजे भारत जगज्जेता होता. 1983 मध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप, तर 1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस कप जिंकलेल्या याच भारतासाठी शारजा म्हणजे हारजा अशी शोकांतिका ठरली. भारत हा कट्टर प्रतिस्पर्धी असणे, त्यातही तो जगज्जेता असणे पाकिस्तानसाठी हा विजयाची गोडी कित्येक पटींनी वाढविणारे होते.

चेतन शर्माने त्यानंतर 1987च्या मायदेशातील वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅट््ट्रीक केली. त्यामुळे या षटकाराची भरपाई झाली असे म्हटल जाऊ लागले, पण पाकिस्तानविरुद्ध मियाँदादने चौकार हवा असताना षटकार मारणे, त्यामुळे विजेतेपद हुकणे असे अपयश वर्ल्ड कपमधील सामना असला तरी तेथील यशामुळे लपत नाही.

शारजा-हारजा अशी शोकांतिका ही भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी कटू वस्तुस्थिती आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकविरुद्ध कधीच पराभव झाला नाही, पण म्हणून मियाँदादने मारलेल्या षटकाराचे दुःख कमी झाले आहे का, असे विचारले तर खिन्न मन होकारार्थी मान हलविणार नाही. 

याचे कारण पाकिस्तान प्रतिस्पर्धी असेल तर यह दिल माँगे मोअर असाच मोह होतो. हेच भारत प्रतिस्पर्धी असेल तर पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना सुद्धा लागू होते. वर्ल्ड कपमध्ये आपली टीम भारताविरुद्ध नेहमी हारते याचे पाक क्रिकेटप्रेमींचे दुःख मियाँदादच्या षटकाराकडे पाहून पळून जात नाही.

खेळाच्या इतिहासात म्हणूनच अशा काही घडामोडी सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवलेल्या जातात. कुणासाठी ते सुखांतिका ठरते, तर दुसऱ्यासाठी शोकांतिका.

संक्षिप्त धावफलक :
भारत : 50 षटकांत 7 बाद 245 (कृष्णम्माचारी श्रीकांत 75-80 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार, सुनील गावसकर 92-134 चेंडू, 6 चौकार, दिलीप वेंगसरकर 50-64 चेंडू, 1 षटकार, किर्ती आझाद 0, कपिल देव 8, चेतन शर्मा 10, रवी शास्त्री 1, चंद्रकांत पंडित नाबाद 0, इम्रान खान 10-2-40-2, वसिम अक्रम 10-1-42-3, अब्दुल कादीर 10-2-49-1) पराभूत विरुद्ध पाकिस्तान : 50 षटकांत 9 बाद 248 (मुदस्सर नझर 5, मोहसीन खान 36, रमीझ राजा 10, जावेद मियाँदाद नाबाद 116-114 चेंडू, 3 चौकार, 3 षटकार, सलीम मलिक 21, अब्दुल कादीर 34, तौसीफ अहमद नाबाद 1, कपिल देव 10-1-45-1, चेतन शर्मा 9-0-51-3, मदन लाल 10-0-53-2, मनींदर सिंग 10-0-36-1, रवी शास्त्री 9-0-38-0, महंमद अझरुद्दीन 2-0-14-0)


​ ​

संबंधित बातम्या