त्यादिवशी संधी मिळाली नव्हती, आज 'रो-हिट'वर होतोय शुभेच्छांचा वर्षाव!

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक तीनवेळा द्विशतक झळकवणाऱ्या रोहितला पहिले शतक झळकावण्यासाठी तीन वर्षे प्रतिक्षा करावी लागली होती. 

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आजच्याच दिवशी 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटच्या मैदानातील खेळ पूर्णपणे स्थगित असताना रोहित शर्मा घरातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळाले. इन्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून तो आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा गोष्टी करत चाहत्यांचे मनोरंजन करताना त्याला चांगला प्रतिसादही मिळाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या क्रिकेटर्सच्या पदार्पणाच्या दिवशी सोशल मीडियावर  #13YearsOfHITMAN ट्रेंडम पाहायला मिळत आहे. चाहते रोहितच्या 13 वर्षांच्या कारकिर्दीतील त्याने प्रस्थापित केलेल्या विक्रमांचा दाखला देत त्याच्यावर शुभेच्छांची बरसात करत आहेत. रोहित शर्माने आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज पाक संघातील तिघांना कोरोना; पुढे काय ऐकायला मिळणार?

कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नव्हती. या सामन्यात राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आयर्लंडचा संघ अवघ्या 193 धावात गारद झाला. त्यानंतर माफक धावांचा पाठलाग करताना सचिन-सौरव आणि गंभीर यांच्या फलंदाजीच्या जोरावर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 9 गडी राखून विजय मिळवला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून डोक्यावर कॅप चढवलेल्या रोहितला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीची संधीच मिळाली नाही. त्यानंतर 26 जून 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या आंतरराष्ट्री कारकिर्दीतील पहिली धाव काढली. या सामन्यात तो केवळ 8 धावा करुन बाद झाला होता. पदार्पणानंतर तब्बल तीन वर्षांनंतर हिटमॅन रोहितच्या भात्यातून शतकी खेळी निघाली. 28 मे 2010 मध्ये झिम्बाव्बेच्या विरुद्ध त्याने 114 धावांची बहरादार खेळी केली.

युवा क्रिकेटर्संना या गोष्टीची शिकवण द्या, सॅमीची आयसीसीला विनंती

पदार्पणाच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर नाव असेलेल्या रोहितला आज 'हिटमॅन' नावाने ओळखले जाते. वनडे, टी-20 आणि कसोटीत तो भारताच्या डावाची सुरुवात करतो. त्याच्या खेळीच्या जोरावर डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग सहज शक्य आहे, अशी भावना प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या मनात असते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन द्विशतके झळकवणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. 264 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.  


​ ​

संबंधित बातम्या