प्रो कबड्डी ः दिल्ली-बंगाल लढतीतून मिळणार नवा विजेता

शैलेश नागवेकर
Saturday, 19 October 2019

- प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचा पडदा तीन महिन्यांनंतर उद्या (ता. 19) नव्या विजेत्याचे नाव करंडकावर कोरून खाली येणार आहे

- प्राथमिक साखळीतील अव्वल दोन संघ दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स एकमेकांशी पंगा घेण्यास सज्ज होत आहेत.

- तीन वर्षांपूर्वी ज्या ट्रान्स स्टेडियममध्ये विश्‍वकरंडक कबड्डीचा अंतिम सामना झाला होता, तिथेच प्रो कबड्डीचा निर्णायक सामना भारतीय कबड्डीच्या नव्या पिढीच्या कर्तृत्वावर मोहर उमटवणारा ठरणार आहे

अहमदाबाद - प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचा पडदा तीन महिन्यांनंतर उद्या (ता. 19) नव्या विजेत्याचे नाव करंडकावर कोरून खाली येणार आहे. प्राथमिक साखळीतील अव्वल दोन संघ दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स एकमेकांशी पंगा घेण्यास सज्ज होत आहेत. निकाल कोणताही लागला, तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक सामना खेळून कबड्डीला जिंकवायचा विडा दोन्ही संघांनी उचलला आहे. 
अंतिम सामन्यात खेळणारे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ज्याचे नशीब जोरावर असेल तो यशस्वी होईल, अशी बंगाल संघाचे प्रशिक्षक बी. सी. रमेश यांची ही भावना; तर कबड्डी किती शिस्तप्रिय पद्धतीने खेळता येते, हे दिल्लीचे प्रशिक्षक किशनकुमार हुडा यांचे वक्तव्य आव्हानाच्या भाषांपलीकडचे असले, तरी दोन्ही संघांतील खेळाडूंची क्षमता आणि संपूर्ण लीगमध्ये केलेला खेळ पाहता थरारक सामन्याची मेजवानी मिळणार, याची खात्री आहे. 
तीन वर्षांपूर्वी ज्या ट्रान्स स्टेडियममध्ये विश्‍वकरंडक कबड्डीचा अंतिम सामना झाला होता, तिथेच प्रो कबड्डीचा निर्णायक सामना भारतीय कबड्डीच्या नव्या पिढीच्या कर्तृत्वावर मोहर उमटवणारा ठरणार आहे. 

संघ सहकाऱ्यांतील सामना 
किशन हुडा भारतीय संघाचे कर्णधार असताना त्यांच्या संघातून बी. सी. रमेश खेळत होते. आता हेच दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी प्रशिक्षक असले तरी नाते सहकाऱ्याचेच राहील, असे वातावरण अंतिम सामन्यापूर्वी होते. 

वरचढ कोण? 
गटातील प्रत्येकी 22 सामन्यांनंतर दिल्लीने पहिले, तर बंगालने दुसरे स्थान मिळवले. दिल्लीने अन्य सर्व 11 संघांविरुद्ध विजय मिळवलेले असले, तरी त्यांना बंगालला हरवता आलेले नाही. दोघांमधला एक सामना टाय झाला होता; तर दुसऱ्या सामन्यात बंगालने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे एकूणच कामगिरी पाहता दिल्लीचे पारडे जड असले, तरी झुकते माप बंगालकडे आहे. 

विशाल मानेला इतिहासाची संधी 
विशाल माने खेळत असलेला दिल्लीचा संघ उद्या जिंकला, तर तीन वेगवेगळ्या संघातून जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरेल. यू मुम्बा आणि पाटना संघातून खेळताना त्याने करंडक उंचावला आहे. अंतिम सामन्यात खेळणारा तो सर्वात अनुभवी आहे. त्याचा हा पाचवा अंतिम सामना आहे. यू मुम्बा संघातून आणखी दोनदा उपविजेता राहिलेला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या