स्वंयपाकीणीच्या मुलीने जिंकली क्रॉस कंट्री शर्यत

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

अपंगत्व असल्याने वडील घरीच असतात, त्यामुळे घरचा गाडा चालविण्यासाठी आई एका केटरर्सकडे स्वंयपाकाचे काम करते. अशा या दाम्पत्याची मुलगी म्हणजे रविवारी झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत अव्वल स्थान मिळविणारी प्राजक्ता गोडबोले.

नागपूर : अपंगत्व असल्याने वडील घरीच असतात, त्यामुळे घरचा गाडा चालविण्यासाठी आई एका केटरर्सकडे स्वंयपाकाचे काम करते. अशा या दाम्पत्याची मुलगी म्हणजे रविवारी झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत अव्वल स्थान मिळविणारी प्राजक्ता गोडबोले. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत हरियाणातील सोनीपत येथून नागपुरात शारिरीक शिक्षणाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मोहित श्री मुकेशने बाजी मारली. 

दहा किलोमीटर अंतराची शर्यत आयोजित करण्याचा निर्णय दोन दिवसापूर्वी झाल्याने त्याचा परिणाम महिलांच्या निकालावर झाला. माजी विजेती निकीता राऊत व गतविजेती ऋतुजा शेंडे यांची अर्ध्या अंतरानंतर पिछेहाट झाली. नियमीतपणे अर्ध मॅरेथॉन शर्यतीत भाग घेणाऱ्या प्राजक्ताने अर्धे अंतर पार केल्यावर वेग वाढविण्यास सुरुवात केली आणि आपल्या चौथ्या प्रयत्नात सहजपणे विजेतेपद मिळविले. गेल्या वर्षीपर्यंत पाच किलोमीटरची शर्यत असताना तिला कधीही प्रथम तीन क्रमांकात स्थान मिळविता आले नाही. यापूर्वी ती मोखारे महाविद्यालयाचे प्रतिनीधीत्व करीत होती. ती म्हणाली, घरची आर्थिक स्थिती फार बिकट आहे. मात्र, त्याचा कामगिरीवर कधी परीणाम झाला नाही. बक्षीसाची रक्कम आहार व सराव, स्पर्धेसाठी आवश्‍यक असणाऱ्या इतर बाबींवर खर्ची होते. त्यामुळे कुणाचे सहकार्य मिळाले तर निश्‍चितच आणखी चांगली कामगिरी करता येईल. 

पुरुषांत मोहित मुकेश आणि गतविजेता अजित बेंडे हे एकत्र धावत होते. अडीच किलोमीटर अंतर शिल्लक असताना मोहितने हलकी आघाडी घेतली आणि हिच आघाडी निर्णायक ठरली. पुरुषांत जे.एम. पटेल भंडाराने तर महिलांत एस. बी. सिटीने सांघिक विजेतेपद मिळविले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते लखीराम मालविय यांनी शर्यतीला झेंडी दाखवली. पीडब्ल्यूएस महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्रीतील पहिले विजेते डॉ. यशवंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी डॉ. कल्पना जाधव, डॉ, माधवी मार्डीकर, विजय दातारकर, सुरेंद्र तिवारी, संजय चौधरी उपस्थित होते. संचालन डॉ. शरद सूर्यवंशी यांनी केले. यातून प्रथम सहा धावपटूंची धारवाड येथे चार आक्‍टोबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. 

निकाल : (पुरुष - 10 कि.मी.) : मोहित मुकेश (अजित वाडेकर शा. शि. महाविद्याय, नागपूर - 32 मि.05.07 सेकंद), अजित बेंडे (जेसीपीई, 32 मि.34.11 सें.), संदेश शेबे (मुकूंदराज स्वामी महा. पचखेडी, 32 मि.40.15 से.), विकेश शेंडे (जे. एम. पटेल भंडारा), आकाश भोयर (रेणुका महाविद्यालय), निलेश हटवार (आर्टस, कॉमर्स महा. नागपूर). 
सांघिक विजेतेपद : जे.एम. पटेल भंडारा - 45गुण, रेणुका महाविद्यालय - 107 गुण, एनएमडी गोंदीया - 110 गुण. 
महिला (10 कि.मी.) : प्राजक्ता गोडबोले (जे. एम. पटेल भंडारा, 36 मि.51.85 से.), निकीता राऊत (चक्रपाणी महाविद्यालय, नागपूर - 39 मि.15.20 से.), ऋतुजा शेंडे (डीएनसी, 39 मि.42.81 से), गीता चाचेरकर (लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळ), स्वाती पंचबुधे (एचबीटी, नागपूर), मीना कळंबे (एस. बी. सिटी). 
सांघिक ः एस. बी. सिटी - 61 गुण, चक्रपाणी महाविद्यालय - 70 गुण, डीएनसी - 95 गुण. 

"शर्यत पाच एैवजी दहा किलोमीटरची होणार असे एैकले त्याचवेळी जिंकण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. कारण जितकी जास्त अंतराची शर्यत होणार तितका मला फायदा आहे. प्रथमच विजेतेपद मिळविल्याचा आनंद आहे. मात्र, आता आंतर विद्यापीठ स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार'                    -प्राजक्ता गोडबोले 

"क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना जिंकल्याचा आनंद आहे. मात्र, दुखापतीमुळे पंधरा दिवसापूर्वी धावू शकेल की नाही, याविषयी शंका होती. अजितने शेवटपर्यंत चांगली लढत दिली. मात्र, आघाडी टिकवून ठेवायची या प्रशिक्षक सचिन हुलके यांच्या शब्दामुळे अखेर विजयी होऊ शकलो'                                                 -मोहित मुकेश 

लक्षवेधक:
- महिलांत 2014 नंतर नागपूर जिल्ह्याबाहेरील महाविद्यालयाचे प्रतिनीधीत्व करताना प्रथमच विजयी. यापूर्वी 2014 मध्ये ज्योती चौहान (सी. जे. पटेल तिरोडा). 
- पुरुषांत 2013 नंतर नागपूर जिल्ह्याबाहेरील महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद. त्यावेळी एनएमडी गोंदीयाला विजेतेपद. 
- पुरुषांत 2001 नंतर परप्रांतातील खेळाडूला विजेतेपद. त्यावेळी पीजीटीडीचा सतपाल सिंग विजयी. 
- एस. बी. सिटीला 2016 नंतर पुन्हा विजेतेपद.


​ ​

संबंधित बातम्या