अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत क्रोएशियाची बादफेरीत धडक

मंदार ताम्हाणे
Friday, 22 June 2018

रेबिकने मिळालेल्या संधीचे सोने करत सुरेख व्हॅली मारुन गोल केला आणि क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 80 व्या मिनिटाला क्रोएशियाचा कर्णधार लुका मार्डीजने अप्रतिम गोल करत संघाचा विजय जवळपास निश्चितच केला. फुल टाईम झाल्यानंतर मिळालेल्या अधिक वेळेतही इवान रॅकिटिच याने क्रोएशियासाठी तिसरा गोल नोंदवत अर्जेंटीनाच्या जखमेवर जणू मीठ चोळले

अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत क्रोएशियाची बादफेरीत धडक

क्रोएशियाने अर्जेंटिनावर 3-0 असा दमदार विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला. तर अर्जेंटिना मात्र स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. ड गटातील बादफेरीत पोहोचलेला क्रोएशिया हा पहिला संघ ठरला.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. मात्र दोन्ही संघांना संधी मिळूनदेखील गोल करता आला नाही.

30 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या एनझो पेरेस याला 12 यार्डवरुन गोल करम्याची संधी मिळूनही त्याला गोल करता आला नाही तर 33 मिनिटाला क्रोएशियाच्या मारियो मांझुकिच याचे चार फुचावरुन हेडर मारत गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो अयशस्वी ठरला आणि त्यामुळे पूर्वाधात सामन्याची परिस्थिती 0-0 अशी होती. 

उत्तरार्धात मात्र क्रोएशियाच्या खेळांडूंनी सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. 53व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा गोलकिपर विली कबाल्रो याने केलेल्या चुकीच्या शिक्षा त्यांना भोगावी लागली. त्याचाच सहकारी गॅब्रिएल मर्काडोने दिलेला बॅक पास त्याने पुढे नीट न दिल्याने चेंडू क्रोएशियाच्या रेबिकसमोर आला. रेबिकने मिळालेल्या संधीचे सोने करत सुरेख व्हॅली मारुन गोल केला आणि क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 80 व्या मिनिटाला क्रोएशियाचा कर्णधार लुका मार्डीजने अप्रतिम गोल करत संघाचा विजय जवळपास निश्चितच केला. फुल टाईम झाल्यानंतर मिळालेल्या अधिक वेळेतही इवान रॅकिटिच याने क्रोएशियासाठी तिसरा गोल नोंदवत अर्जेंटीनाच्या जखमेवर जणू मीठ चोळले आणि अर्जेंटिनाला अत्यंत लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. 

अर्जेंटीनाचा बादफेरीतील प्रवेश हा आता ड गटातील बाकीच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून आहे. ही समीकरणे जूळुन न आल्यास अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाला अपेक्षापूर्ती न करता विश्वकरंडक स्पर्धेच्या बाहेर जावे लागेल. 

अर्जेंटिनाची विश्वकरंडकात 1958 नंतर झालेली ही सर्वात मोठी हार आहे. 1958 मध्ये चेकोस्लावाने अर्जेंटिनाचा 6-0 असा पराभव केला होता. 
अर्जेंटिनाची सर्व मदार असलेल्या मेस्सीला मात्र अपेक्षांच्या दबावाखाली खेळ उंचवण्यात यश आले नाही. मेस्सीने यंदाच्या विश्वकरंडकात सर्वाधिक (12) शॉर्ट मारले आहेत मात्र अद्याप त्याला एकही गोल करता आलेला नाही. अर्जेंटिनाचे बाकीचे खेळाडूसुद्धा चांगला खेळ करु शकले नाहीत.

क्रोएशियाने यंदाच्या विश्वकरंडकातील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. यापूर्वी 1998 सालच्या विश्वकरंडकात क्रोएशियाने पहिले दोन्ही सामने जिंकले होते, त्यावेळी त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. क्रोएशियाच्या या दमदार विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल तर त्यांच्याकडून आता अपेक्षाही वाढणार यात काही शंका नाही.         

 


​ ​

संबंधित बातम्या